फडणवीस सरकारच्या चारा छावण्यात घोटाळा?

बीड, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात 2018-19 या वर्षातील दुष्काळात फडणवीस सरकारने सुरू केलेल्या चारा छावण्यात आर्थिक घोटाळा झाल्याचा ठपका ठेवत चौकशी करण्याचे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्‌टीवार यांनी दिले आहेत
Irregularities in Fodder Camps During Fadanavis Government Tenure Claims Vijay Vadettiwar
Irregularities in Fodder Camps During Fadanavis Government Tenure Claims Vijay Vadettiwar

मुंबई : बीड, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात 2018-19 या वर्षातील दुष्काळात फडणवीस सरकारने सुरू केलेल्या चारा छावण्यात आर्थिक घोटाळा झाल्याचा ठपका ठेवत चौकशी करण्याचे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्‌टीवार यांनी दिले आहेत. चारा छावण्यामधे जनावरांची संख्या खोटी दाखवून हा गैरव्यवहार करण्यात आल्याची माहीती समोर आल्याचे वडेट्‌टीवार यांनी त्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

या चारा छावण्याबाबत या जिल्ह्यातून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून आतापर्यंत 185 कोटी रूपयांची देयके रोखण्यात आल्याची माहीतीही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, या चारा छावण्यांच्या व्यवहाराची पुणे व नाशिक विभागीय आयुक्‍तांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून एका महिन्यात अहवाल सादर करण्याची सूचना त्यांना करण्यात आली आहे.

अहमदनगर मधील चारा छावण्याची चौकशी नाशिक विभागीय आयुक्‍त तर बीड व सोलापूर येथील चारा छावण्यांची चौकशी पुणे विभागीय आयुक्‍त करणार आहेत. अहवाल सादर झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. अशी माहीती वडेट्‌टीवार यांनी दिली.

या तिन्ही जिल्ह्यात 1822 चारा छावण्यात सुरू होत्या. यामधे जनावरांची संख्या खोटी दाखवून अधिकची देयके तयार करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. या छावण्यांना परवानगी देताना सर्व नियमांना बगल दिली आहे. जनावरांना टॅगिंग करणे, परवानगी असलेल्या संख्येपेक्षा अधिक जनावरे दाखविणे, अशा संशयापस्पद बाबी घडल्याचे प्रथमदर्शनी दिसते अशी शंका वडेट्‌टीवार यांनी व्यक्‍त केली. बीडमध्ये तब्बल 608 चारा छावण्या होत्या. त्यासाठी 341 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला. तर, सोलापूरातील 296 छावण्यांचे 63 कोटी रूपयांची देयके रोखली आहेत.

नगर जिल्ह्यातील 504 छावण्यांसाठी 317 कोटी रूपये देण्यात आले. मात्र, तक्रारीमुळे 41 कोटी रूपयांची देयके रोखली आहेत. सातारा जिल्ह्यातील चारा छावण्यांचे 20 कोटी रूपये, सांगलीतील 5 कोटी रूपये तर उस्मानाबाद जिल्ह्यातील छावणी मालकांचे 10 कोटी रूपयांची देयके सरकारने रोखल्याची माहीती वडेट्‌टीवार यांनी दिली. या सर्व जिल्ह्यातील 1822 छावण्यांसाठी 1200 कोटी रूपयांचा खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

. विभागीय आयुक्‍तांची चौकशी समिती
. एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश
. 185 कोटींची देयक थांबवली

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com