IPS भाग्यश्री नवटकेंच्या धडाकेबाज कारवाया माफियांच्या कायम राहणार लक्षात! - ips bhagyshree navatke`s actions always remember to mafias | Politics Marathi News - Sarkarnama

IPS भाग्यश्री नवटकेंच्या धडाकेबाज कारवाया माफियांच्या कायम राहणार लक्षात!

दत्ता देशमुख
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

गोदावरी आणि सिंदफना या दोन प्रमुख नद्या या भागातून गेल्याने वाळू माफियांचे कुरण म्हणून माजलगाव परिसराची ओळख आहे. मात्र, आपल्या कारकिर्दीत कारवयांतून भाग्यश्री नवटके यांनी वाळू आणि गुटखा माफियांची पाचावर धारण बसविली होती. त्यामुळे त्यांची कारकिर्द लक्षात राहील अशीट ठरली. 

बीड : आयपीएस अधिकारी असलेल्या भाग्यश्री नवटके परिक्षाधिन कालावधीत उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून माजलगावला कार्यरत होत्या. तथाकथीत व्हिडीओतील वादग्रस्त संभाषणाच्या कारणावरुन त्यांची बदली झाली असली तरी त्यांनी वर्षभराच्या आपल्या येथील कार्यकाळात वाळू माफिया आणि गुटखा माफीयांवर केलेल्या कारवाया हे माफिया कधीही विसरु शकणार नाहीत.
 
बीडच्या सीमाहद्दीवरील लातूर जिल्ह्यातील असलेल्या भाग्यश्री नवटके यांची २०१३ - १४ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आयपीएस म्हणून निवड झाली. प्रशिक्षणानंतर त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सहा महिने परिविक्षाधिन पोलिस निरीक्षक पदावर काम केल्यानंतर गेल्या वर्षी याच काळात त्या माजलगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर रुजू झाल्या.

माजलगाव उपविभागात माजलगावसह वडवणी, धारुर या तालुक्यांचाही समावेश आहे. किरकोळ कारणांवरुन सामाजिक अशांततेचे प्रकार इथे नित्याचे असतात. त्यांच्याच कार्यकाळात मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले होते. पण, कार्यकुशलतेने त्यांनी आंदोलने शांततेत हातळाली.

हा भाग खऱ्या अर्थाने ओळखला जातो तो वाळू तस्करीसाठी. या भागातून गोदावरी, सिंदफना या प्रमुख नद्यांसह कुंडलिका नदीही गेलेली आहे. त्यामुळे या भागात वाळूचे प्रमाण अधिक आहे. वाळू तस्करीतून कोट्यावधींची कमाई करणारा वर्ग यात आहे. माफियांच्या मलिदा वाटप साखळीत महसूल आणि पोलिस विभागातील काही अधिकाऱ्यांसह दलालांनाही वाटा असतो.

भाग्यश्री नवटके यांनी रूजू होताच वाळू माफियांविरुद्ध मोहीम राबवित कोट्यावधींची वाळू, वाहने जप्त केली. दंडातून शासनाला मोठा महसूलही मिळाला. याच काळात बंदी असलेल्या गुटख्यांच्या साठ्यांवरही त्यांनी जोरदार कारवाया केल्या. कारवायांच्या माध्यमातून रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या हॉटेल, ढाब्यावरील दारु विक्री बंद केली. शाळा - महाविद्यालय परिसरात पिंगा घालणाऱ्या रोमिओंनाही त्यांनी पोलिसी हिसका दाखविला. खासगी सावकरी करणाऱ्यांचीही दुकानदारी त्यांनी बंद केली. सामान्यांना पोलिस ठाण्यात चांगली वागणूक भेटत असल्याने पुढाऱ्यांची दुकानेही बंद झाली. तशी, पुढाऱ्यांची शिफारस त्यांनीच बंद केली. समुपदेशनाच्या माध्यमातून अनेकांचे तुटू पाहणारे संसारांच्या रेशीम गाठी त्यांनी पुन्हा बांधल्या. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या माध्यमातून शांतता निर्माण झाली.

याच वेळी दुकानदाऱ्या बंद झाल्याने विविध घटकांत त्यांच्याबद्दल असंतोष निर्माण झाला. त्यातच त्यांच्या कथीत व्हिडीओतील वादग्रस्त संभाषणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हारल झाला आणि भाग्यश्री नवटके वादात सापडल्या. त्यांच्या बडतर्फीच्या मागणीसाठी आंदोलनेही झाली आणि त्यांची तडकाफडकी बदलीही झाली. त्यांच्या वादग्रस्त व्हिडीओतील संभाषणामुळे त्यांची बदली झाली असली तरी त्यांच्या बदलीसाठी अनेक दिवसांपासून देव पाण्यात ठेवून बसलेल्या माफियांनी मात्र सुटकेचा निश्वास सोडला आहे. आता पुन्हा नव्याने या भागात वाळू, गुटखा माफीया सक्रीय होतील आणि त्यातून पुन्हा एका साखळीला मलिदा भेटणे सुरु होईल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख