Infighting Surfaced in Ratnagiri Congress | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

तालुका कार्यकारीणी बरखास्तीवरुन रत्नागिरीत काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद

राजेश कळंबटे
बुधवार, 11 डिसेंबर 2019

मंगळवारी (ता. 10) काँगे्रस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भोसले यांनी रत्नागिरी शहराध्यक्ष चव्हाण यांना लेखी पत्र पाठवून त्यात जिल्हा कार्यकारणीसह तालुका, शहर कार्यकारणीही बरखास्त केली. त्यामुळे शहरासह तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

रत्नागिरी : शहरात नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच शहर, तालुका कार्यकारीणी बरखास्तीवरुन काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. जिल्हाध्यक्षांनी दिलेल्या पदमुक्तीच्या पत्राला आक्षेप घेत राकेश चव्हाण, प्रसाद उपळेकर यांनी थेट प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांकडे तक्रार केली आहे. नगराध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीऐवजी राज्यस्तरावर अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेला पाठींबा देण्यावरुन हे वाद उफाळले आहेत.

मंगळवारी (ता. 10) काँगे्रस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भोसले यांनी रत्नागिरी शहराध्यक्ष चव्हाण यांना लेखी पत्र पाठवून त्यात जिल्हा कार्यकारणीसह तालुका, शहर कार्यकारणीही बरखास्त केली. त्यामुळे शहरासह तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राकेश चव्हाण, प्रसाद उपळेकर, भाग्येश मयेकर यांनी जिल्हाध्यक्षांच्या कारभाराचे वाभाडे काढत प्रदेशाध्यक्षांकडे लेखी तक्रार केली आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय द्या, अशी विनंतीही त्यात केली आहे. 

रत्नागिरी नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसमधील इच्छुक  स्थानिकांचा विरोध होता; परंतु, पक्षाबाबत कोणताही निर्णय घेताना जिल्हाध्यक्षांनी शहरातील कार्यकर्त्यांना विचारात घेतले नाही. त्यांच्या या मनमानी कारभाराला आक्षेप घेतल्यामुळेच आपल्याला पदमुक्त केल्याचे पत्र पाठविण्यात आले आहे,  असे शहराध्यक्ष चव्हाण यांचे मत आहे.

गेली अनेक वर्ष काँग्रेसचे काम निष्ठेने करत आलो आहोत. शहरासह जिल्ह्यात काँग्रेस वाढविण्यात जिल्हाध्यक्षांचे योगदान काय आहे असा प्रश्‍न चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. पक्षांतर्गत राजकारण करण्यापेक्षा संघटन वाढीला महत्त्व देणे गरजेचे होते. नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून ते काँग्रेस बळकट करतील असाच विश्वास होता. पण त्याला जिल्हाध्यक्षांनी तडा दिला आहे. जो अधिकार आपल्याला नाही, त्याची अंमलबजावणी त्यांनी केली आहे. हे काँग्रेसच्या शिस्तीला धरून नाही. हा पक्ष शिस्तीचा भंग केला आहे,  असे चव्हाण यांनी सांगितले. 

तालुकाध्यक्ष प्रसाद उपळेकर यांनी जिल्हाध्यक्षांना थेट आव्हान देत मला पदावरून काढण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी, माझी नियुक्ती तुम्ही केलेली नाही, त्यामुळे पद मुक्त  करण्याचा अधिकार नाही अशी भुमिका घेतली आहे. जो पद  देतो त्यांनाच, या पदावरून बाजूला करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षांनी घेतलेली भूमिका चुकीचे असून त्यांनी पक्ष संपवण्याचा विडा उचलला आहे का असा प्रश्‍न उपळेकर यांनी केला आहे.

पाठींब्यावरुन दोन मतप्रवाह

नगराध्यक्ष निवडणुकीतील पाठींब्यावरुन दोन मतप्रवाह होते. शहरातील एका गटाने शिवसेनेला पाठींबा द्यावा अशी भुमिका घेतली होती. राज्यात महाविकास आघाडी असेल तर ती रत्नागिरीतही कायम ठेवू. तसेच 2022 च्या निवडणुकीत त्याचा फायदा घेता येईल. शिवसेनेकडूनही तसे निमंत्रण काँग्रेसच्या शहर पदाधिकार्‍यांना मिळाले होते; मात्र जिल्हास्तरावरील नेत्यांकडून विरोध झाला. जिल्हाध्यक्षांनी थेट राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख