indu mil | Sarkarnama

इंदू मिलचे ताबापत्र मिळाले, निधीची योजना काय ?

संजीव भागवत : सरकारनामा न्यूज ब्युरो
शनिवार, 25 मार्च 2017

मुंबई ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील इंदू मिलच्या साडेबारा एकर जागेवर आंतरराष्ट्रीय स्तराचे स्मारक उभे करण्यासाठी शनिवारी केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी इंदू मिलच्या जागेसाठीचे ताबापत्र सरकारला दिले. यामुळे या स्मारकाच्या उभारणीसाठीचे सर्व अडथळे आता दूर झाले असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी कोणत्याही भरीव निधीची तरतूद राज्याच्या नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. यामुळे हे आंतरराष्ट्रीय स्मारक उभे करण्यासाठी निधीचे काय करणार, सवाल विविध संघटना आणि तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे. 

मागील शनिवारी 18 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला तर 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडला असून या दोन्ही अर्थसंकल्पात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या उद्‌घाटनासाठी 35 कोटी रूपये सरकारकडून खर्च करण्यात आले. मात्र ही रक्‍कमही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी खास तरतूद करून ठेवण्यात आली नव्हती. त्यामुळे अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उदघाटनासाठीचा खर्च सरकारने आकस्मिक निधीतून पळविला होता. अशा स्थितीत आता सरकार इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे करण्यासाठी निधीची तरतूद कोठून करणार आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्‍नावर विरोधकांकडून कोंडीत सापडलेल्या सरकारला इंदू मिलच्या स्मारक उभारणीसाठी लागणारा निधी कुठून आणणार की सरकारला येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत केवळ घोषणाच देवून वेळ काढावा लागेल असेही बोलले जात आहे. 

विधानसभेत शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडील इंदू मिल येथील जमीन आणि त्याचे ताबापत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हस्तांतरित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब यांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम लवकरच पूर्ण होईल असे सांगितले. तर सामाजिक न्यायमंत्री निवेदनाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली. जमीन हस्तांतरित झाल्यासंदर्भात सरकारकडून बराच गाजावाजा करण्यात आला असला तरी यासाठीच्या लागणाऱ्या शेकडो कोटी निधीसंदर्भात कोणतीच भूमिका स्पष्ट केली नाही. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख