' ही' माहिती कळताच इंदिरा गांधींनी चित्रपट निर्मात्यांना झापले होते: असरानी

पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर तेथे आठ वर्षे प्राध्यापक म्हणून शिकवले. जय बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, डॅनी, जलाल आगा हे विद्यार्थी होते. शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर बिहारी हिंदीचा प्रभाव होता. त्यांची हिंदी सुधारण्याच्या नादात माझ्या हिंदीचा दर्जा सुमार होतो की काय? अशी भीती होती. परंतु, त्यांची हिंदीही ताळ्यावर आली, असा किस्साही त्यांनी ऐकविला.
Asarani-Gandhi-Manmohansing
Asarani-Gandhi-Manmohansing

नागपूर :  " पुणे येथील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. मात्र, पाच वर्षे काम मिळाले नाही. इंदिरा गांधी यांना ही बाब कळली. त्यांनी निर्मात्यांच्या संघटनेला बोलावून चांगलेच झापले. त्यानंतर फिल्म इन्स्टिट्यूटमधील प्रशिक्षित तंत्रज्ञ, कॅमेरामन यांना चित्रपटांमध्ये कामे मिळणे सुरू झाले. खूप संघर्षानंतर 'गुड्डी' हा पहिला चित्रपट इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक असताना मिळाला ," अशी आठवण ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी सांगितली . 

असरानी यांनी भंडारा येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना रामदासपेठ येथील 'सकाळ' कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी चित्रपटसृष्टीतील प्रवेश, गेल्या काही दशकात झालेले बदल, काश्‍मीर प्रश्‍न यावरही त्यांनी चर्चा केली.  

"डॉ. मनमोहन सिंग दूरदृष्टी लाभलेले नेते होते. परंतु, त्यांच्यावर 'ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर' चित्रपटाची निर्मिती झाली. ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर असतात का कधी?" असा सवाल उपस्थित करीत ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी दूरदृष्टी असलेल्या नेत्यांची उणीव असल्याची खंत व्यक्त केली. देशातील तरुणांना अशा नेत्यांची गरज असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

जयपूर येथील महाविद्यालयीन शिक्षणादरम्यानचा किस्सा सांगताना ते  म्हणाले,"  त्यावेळी कॉलेजमध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आले होते. कॉलेजमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळत असल्याने कॉलेजसमोर काहींनी घोषणाबाजी केली. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कॉलेजमध्ये सर्वांनाच प्रवेश देण्याच्या सूचना कॉलेज प्रशासनाला केल्या. त्यामुळे कुणीही प्रवेश घेऊ लागले अन्‌ कॉलेजचा दर्जा घसरला, अशा चुका नेते करतात."

"  काश्‍मीर प्रश्‍नही अशाच चुकातून पुढे आला असून आज देश परिणाम भोगत आहे. आज देशाला दूरदृष्टी असलेल्या नेत्यांची गरज आहे. परंतु, दुर्दैवाने अशा नेत्यांची उणीव आहे .  केवळ माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अपवाद आहे. त्यांच्या धोरणामुळे न्यूयॉर्क शहरात भारतीय वस्तू कमी दरात मिळते. सदोष शिक्षण प्रणालीमुळे आज असे चांगले नेते तयार होत नाहीत . अनेक गावांत शिक्षक नाही, असे नमूद करीत त्यांनी शिक्षणाच्या दर्जावर प्रहार केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com