indira gandhi artical | Sarkarnama

इंदिरा गांधी : सहकाऱ्यांच्या काळजी घेणाऱ्या पोलादी नेत्या 

अनंत बागाईतकर 
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली : आपल्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांची - मग तो वरिष्ठ असो वा कनिष्ठ - अतिशय बारकाईने काळजी घेणे, ही भारताच्या पोलादी नेत्या इंदिरा गांधी यांची खासियत होती. सामान्यातल्या सामान्यांबरोबर तत्काळ तार जुळविण्याची विलक्षण कला त्यांच्या अंगी होती आणि हे त्यांचे वैशिष्ट्यच त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर व्यापून राहिलेले असल्याने त्या "लोकनेत्या' झाल्या होत्या. 

इंदिरा गांधी यांच्याबरोबर प्रत्यक्ष काम केलेली बहुसंख्य मंडळी काळाच्या पडद्याआड गेली आहेत. प्रमुख व्यक्तींमध्ये आर. के. धवन, माखनलाल फोतेदार यांची नावे घ्यावी लागतील. परंतु, अद्याप बोटावर मोजता येतील अशा काही व्यक्ती सक्रिय आहेत, ज्यामध्ये माजी खासदार सरोज खापर्डे, आणखी एक माजी खासदार जे. के. जैन यांचा समावेश होतो. त्यांनीही इंदिरा गांधी यांच्याबरोबर काम केलेले होते. त्यांच्या आठवणी आजही त्यांना भावनाप्रधान करतात. 

"इंदिराजी या अत्यंत सुसभ्य व शिष्टाचाराबाबत विशेष दक्ष असत. एकदा हैदराबाद हाऊस येथे एका परदेशी पाहुण्यांना रात्रिभोजन देण्यात आले होते. अशा भोजनांना मोजक्‍या अशा मंत्री, खासदार व अन्य प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रित केलेले असते. या भोजनाच्या वेळी एका निमंत्रित खासदार महोदयांनी प्रसंगाशी विसंगत अशा पोशाखात प्रवेश केला. एवढेच नव्हे, तर त्यांच्या बोलण्याचा आवाजही वाजवीपेक्षा मोठा होता. 

भोजनाच्या वेळी त्यांनी चमचे खाली पाडले. त्यांचा आवाज होणे स्वाभाविक होते. भोजनानंतर इंदिराजींनी राजशिष्टाचार विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्या खासदार महोदयांना पुन्हा अशा प्रसंगी निमंत्रित केले जाऊ नये, अशा सक्त सूचना दिल्या,' असे जैन यांनी सांगितले. 

"इंदिराजींना बेडमी (भरलेली पुरी) आणि बटाट्याची तरीवाली मसालेदार भाजी खूप पसंत असे. माझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळी त्या आल्या असता, भोजनाच्या वेळी थेट बेडमी आणि आलूसब्जी ठेवलेल्या ठिकाणी गेल्या आणि त्याचा आस्वाद घेतला,' असे सांगून जैन म्हणाले, की एकदा त्यांनी हे पदार्थ घरी कसे करायचे, याची चौकशी केली. मग मी त्यांना काही काळ घरी हे पदार्थ केल्यावर नेऊन देत असे. परंतु, काही मंडळींनी सुरक्षेचे कारण पुढे करून हा प्रकार बंद करवला, असे सांगतानाही जैन यांना त्यामागील राजकारणाच्या कटू आठवणी मनात आल्या. 

बरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांची त्या अतिशय काळजी घेत असत, याची एक हृद्य आठवण जैन यांच्या डोळ्यांत आजही पाणी आणते. "1977 मध्ये झालेल्या पराभवानंतर त्या 12 विलिंग्डन क्रिसेंट या लहानशा बंगल्यात राहात असत. तेथे त्यांच्या व्यक्तिगत कर्मचाऱ्यांसाठी बसण्याची जागा नव्हती की ऑफिसला जागा ! बाहेर सुरक्षारक्षकाला असलेल्या लहानशा आडोश्‍याचे रूपांतर प्रतीक्षालय व सचिवाचे टेबल ठेवण्यासाठी करण्यात आले होते. कडक थंडीचे दिवस होते. शहा आयोगापुढे हजर होण्याचे समन्स त्यांना आले होते. तेथे युक्तिवाद काय करायचा आणि लेखी निवेदन काय सादर करायचे, याची चर्चा करण्यासाठी वकिलांचा एक जथाच घरी आला. 

सायंकाळी सुरू झालेली बैठक इंदिराजींनी रात्री दहा वाजता संपवली. थंडी मी म्हणत होती. इंदिराजींकडे दोन स्टेनो टायपिस्ट होते. जुने टाइपरायटरचे ते दिवस. टायपिस्टची बोटेच चालेनात, कारण बाहेर त्या लहानश्‍या देवडीसारख्या खोलीत तो पार गारठून गेला होता. एक स्टेनो आत जाऊन डिक्‍टेशन घेऊन यायचा मग दुसरा जायचा. या टायपिस्ट मंडळींकडून काम करवून घेणे तर आवश्‍यकच होते. 

मी माझी गाडी काढली. एकाला बरोबर घेतला. नवी दिल्ली स्टेशनवर पोहोचलो. तेथे चहा विकणाऱ्याची समजूत घालून व त्या वेळी त्याला त्याच्या शेगडीला 200 रुपये दिले. गाडी हळू चालवत ती पेटती शेगडी घेऊन पुन्हा बंगल्यावर आलो आणि टायपिस्ट मंडळींना हात शेकण्याची सोय करून दिली. हे होता होता बारा साडेबारा वाजले. भूक लागली होती. त्यांची खाण्याची सोय करणे आवश्‍यक होते. पण, एवढ्या थंडीत व रात्री खाद्यपदार्थ मिळणेही दुरापास्त होते. अखेर घरी फोन करून घरात जे काही ब्रेड-बटर आणि इतर खाद्य पदार्थ होते ते जाऊन आणले आणि टायपिस्टना खायला दिले. इंदिराजींच्या किचनमधून गरम चहा मिळत होता. होता होता चार वाजले. निवेदन तयार झाले. इंदिराजींनी आतून हाक मारली. 

मी आत गेलो तेव्हा इंदिराजी स्वतः बेसिनवर कपबशा विसळताना दिसल्यावर मला अश्रू अनावर झाले.' त्यांच्या जनसंपर्काची गोष्टही जैन यांनी सांगितली. "एकदा एका धार्मिक कार्यक्रमाला त्यांना निमंत्रित करण्यात आले. ही सर्व मंडळी संघाशी निगडित असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना न जाण्याचे सुचविले. पण, त्यांनी सांगितले, की उलट अशा ठिकाणी आपण मुद्दाम गेले पाहिजे आणि त्यांना आपली भूमिका स्पष्ट सांगितली पाहिजे. कदाचित त्यांच्यातही परिवर्तन होऊ शकते !' 

चरणसिंग यांच्या सरकारला त्यांनी पाठिंबा दिला होता. एक दिवशी चरणसिंग त्यांना भेटायला येणार, असा निरोप आला. सायंकाळी सहाची वेळ होती. हंगामी असले, तरी ते पंतप्रधान होते. त्यामुळे इंदिराजी तयार होऊन बाहेरच्या फाटकावर त्यांच्या स्वागतासाठी आधीच जाऊन उभ्या राहिल्या. चरणसिंग यांच्या गाड्यांचा काफिला आला, परंतु न थांबता त्या गाड्या वेगाने पुढे निघून गेल्या. ही गोष्ट त्यांच्या मनाला विलक्षण लागली आणि तत्क्षणी चरणसिंग यांचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय त्यांनी केला. चरणसिंग हे बहुमत सिद्ध करण्यासाठी संसदेत जाऊ शकले नाहीत आणि बहुमत सिद्ध न करताच त्यांचे सरकार पडले, ही आठवण जैन यांनी सांगून पराभवानंतर त्यांना कशा रीतीने वागविण्यात आले, याचे हे उदाहरण दिले. 

सरोज खापर्डे या इंदिरा गांधींच्या विशेष निकटवर्ती होत्या. जणू काही त्या त्यांच्या कुटुंबाच्या घटकच झालेल्या होत्या. इंदिरा गांधी यांना सरंजामी वर्तन नापसंत असे त्याचाच हा किस्सा ! दर गुरुवारी राज्यसभेत त्यांचा प्रश्‍नोत्तराचा तास असे. पंतप्रधानांबरोबर साधारणपणे संसदीय पक्षाचे पदाधिकारी व संसदीय कामकाजमंत्री या वेळी बरोबर असतात. सरोजताई या नियमितपणे त्यांच्याबरोबर येत असत. एकदा इंदिरा गांधी काहीशा मागे राहिल्या व सरोजताई पुढे चालत होत्या. राज्यसभेच्या आतल्या लॉबीत एका बाकावर कमलापती त्रिपाठी हे ज्येष्ठ नेते बसलेले होते. त्यांचे मोठे प्रस्थ होते. बसतानादेखील ते त्यांचा एक पाय पुढे करून बसत म्हणजे भेटायला येणाऱ्याने प्रथम चरणस्पर्श करणे त्यांना अभिप्रेत असे. घाईत सरोजताईंनी त्यांना नुसते प्रणाम म्हटले व त्या पुढे गेल्या. त्यावर कमलापतींनी, "क्‍यूं सरोज तहजीब भूल गयी,' असा शेरा मारला. त्यावर त्या पुन्हा मागे वळल्या व चरणस्पर्श करून पुन्हा पुढे निघाल्या. तोवर इंदिराजींनी त्यांना गाठले. चालताचालताच इंदिराजी त्यांना म्हणाल्या, "सरोज तुमने भी पैर छू के राजनीती करना शुरू कर दिया ?' हा किस्सा सांगून सरोजताई म्हणाल्या, "इंदिराजींनी जो मेसेज मला द्यायचा तो दिला !' 

आणखीही एक हृद्य आठवण त्यांनी सांगितली. 1972 मध्ये त्या प्रथम राज्यसभेत निवडल्या गेल्या. त्या वेळी त्या सफेद साडीच नेसत असत. रंगीत कपडे वापरत नसत. इंदिराजींनी काही काळ निरीक्षण केल्यानंतर त्यांना खास बोलावून घेऊन म्हणाल्या, "आय डोन्ट वॉंट टु सी यू लाइक धिस !' त्यांचा रोख लक्षात आला होता, पण काहीशा आचंबित अवस्थेत असलेल्या सरोजताईंना त्यांनी पुढे स्पष्ट करून सांगितले, की सामाजिक कार्य व राजकीय कार्य करणे याचा अर्थ नीटनेटके न राहणे हा नव्हे. भारी पोशाख अपेक्षित नाही, परंतु नीटनेटके कपडे परिधान करून व्यक्तिमत्त्व प्रसन्न रुबाबदार राखले पाहिजे. इंदिरांजींनी दिलेल्या त्या बहुमोल सल्ल्यानंतर सरोजताईंनी रंगीत कपडे परिधान करण्यास सुरुवात केली. 

इंदिरा गांधी या सामान्यातल्या सामान्य माणसाच्या जवळ लीलया जात असत. संसदेतील कॅंटीन रेल्वे विभागातर्फे चालविले जाते. त्यामुळे तेथील वेटर्स हेही रेल्वेचेच कर्मचारी असतात. त्यांना अतिविशिष्ट व्यक्तींना सेवा देण्याचे प्रशिक्षणही दिले जात असते. पंतप्रधानांचे येथे दोन कक्ष आहेत. पंतप्रधानांसाठी एक कॉन्फरन्स रूम आणि लोकांना भेटण्यासाठीचा कक्ष. 9 व 10 क्रमांक असलेले हे कक्ष आहेत. या कॅंटीनमधील एक वेटर अजय याचीही इंदिरा गांधी यांच्याबद्दलची आठवण संस्मरणीय आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना एक दिवस तेथे त्याची ड्यूटी लागली. पहिल्याच दिवशी देशाच्या पंतप्रधानाच्या कक्षात जाताना त्याच्या मनावर दडपण होते. 

चहा देताना त्याच्या हाताला घाम आणि कंप सुटला होता. त्या गडबडीत चहा किंचितसा हिंदकळला. इंदिराजींचे सर्वांवर बारीक लक्ष असायचे. त्यांनी आपण होऊन चौकशी केली, नाव विचारले व प्रथमच पंतप्रधान कक्षात ड्यूटीवर आल्याचे त्यांनी त्याच्याकडून खुबीने काढून घेतले. परंतु, त्या संभाषणाने अजयची भीड चेपली आणि आत्मविश्‍वास वाढला. त्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान असेपर्यंत अजयच त्यांच्या सेवेत राहिला. त्यांना आवडणारे भाज्यांचे सूप, बेक्‍ड व्हेजिटेबल्स तो विशेष काळजी घेऊन तयार करून नेत असे. 

या नेत्यांची ही लक्षणे आहेत. सध्या असे नेते पाहण्यास मिळतात, की त्यांच्यावरील कॅमेऱ्याच्या झोताच्या मध्ये कुणी आले, तर ते हाताने त्यांना बाजूला सारतातच आणि त्या कर्मचाऱ्याची बदलीही करतात ! 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख