इंदापूरचे धडाकेबाज तहसीलदार पाटलांच्या बदलीने संताप

इंदापूरचे धडाकेबाज तहसीलदार पाटलांच्या बदलीने संताप

इंदापूर : वाळू तसेच गौण खनिज माफियांचा कर्दनकाळ ठरलेले इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील यांची सोलापूर महसूल तहसीलदार म्हणून बदली झाली. विशेष म्हणजे त्यांना इंदापूरला येवून दोन वर्ष झाली होती. त्यांनी तहसील कार्यालय लोकाभिमुख केल्याने त्यांच्या बदलीमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

त्यांची बदली रद्द करावी अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अशोक चोरमले, नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेता पोपट शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजेंद्र हजारे, विचार- मंथन ग्रुपचे विशाल चव्हाण, संजय शिंदे, प्रमोद राऊत यांनी केली आहे.

माहिती  अधिकार कार्यकर्ते जनार्दन पांढरमिसे यांनी बदली रद्द करावी या मागणीसाठी उद्या प्रशासकिय भवन इमारतीसमोर लाक्षणिक उपोषण करण्याची घोषणा केली आहे. या उपोषणात अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.

पाटील यांनी नक्षलवादी भागात काम करून आपल्या कामाचा ठसा उमटविला होता. माजी विभागिय आयुक्त चोक्कलिंगम, सोलापूरचे माजी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे हे त्यांचे आदर्श असून त्यांच्या कामांचे अनुकरण त्यांनी केले. सांगोला येथे आमदार गणपतराव देशमुख यांच्यासमवेत काम करताना त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.

 
त्यांनी इंदापूरचा पदभार स्विकारला त्यावेळी जिल्ह्यात तालुका पिछाडीवर होता. मात्र त्यानंतर त्यांनी कामाचा धडाका सुरू केला. वाळू माफियांची त्यांनी नाकाबंदी केली तर अवैध गौण खनिजावर त्यांनी चाप बसवून शासनाच्या महसूलात दीडपटीहून जास्त वाढ केली. अवैध वाळू व्यवसायांवर कारवाई करताना त्यांचे बारामती प्रांताधिकारी यांच्यासमवेत मतभेद झाले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्यांनी आपली कार्यपद्धती न बदलता थेट कारवाई केल्याने अनेक गावचे रस्ते व्यवस्थित राहिले. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले.

वाळू- माफियांनी त्यांची बदली व्हावी म्हणून देव पाण्यात घातले होते. त्यांच्या इंदापूर पालखी सोहळा पॅटर्नचा गौरव पालकमंत्री गिरीष बापट यांनी खुलेआम केला होता. मध्यवर्ती प्रशासकिय इमारतीचे काम देखील त्यांच्या काळात पुर्ण झाले. त्यांनी प्रशासकिय शिस्त लावल्यामुळे तालुका ऑनलाईन सातबारामध्ये जिल्ह्यात अग्रभागी आला होता.

स्वत:च्या जिवाची पर्वा न करता थेट भीमा नदी पात्रात वाळू माफियांवर केलेली त्यांची कारवाई गाजली होती. सर्व नागरिकांना ते सतत मोबाईलवर उपलब्ध होते. गतवर्षी जलसंवर्धन कामात त्यांनी श्रमदानात सक्रिय सहभाग घेतला होता. पालखी सोहळ्यासोबत ते इंदापूर ते सराटी पर्यंत चालत गेले होते. शासकिय काम व सहा महिने थांब या म्हणीस त्यांच्या काळात ब्रेक बसला होता. झटपट काम ही त्यांची खासियत होती. त्यामुळे त्यांच्या बदलीबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांच्या बदलीमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com