पाणीप्रश्नावर इंदापूर तालुक्यात वाढती अस्वस्थता : मराठवाड्याला पाणी नेणाऱ्या बोगद्याचे काम वेगात

पाणीप्रश्नावर इंदापूर तालुक्यात वाढती अस्वस्थता : मराठवाड्याला पाणी नेणाऱ्या बोगद्याचे काम वेगात

भवानीनगर ः कृष्णा पाणीतंटा लवादाने केलेल्या मनाईमुळे कृष्णा आणि कोयना नद्यांतील पाणी वळवता येणार नाही, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतेच सांगितले. त्यामुळे कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अर्थात, सरकारच्या मते ही योजना अव्यवहार्य असली तरी इंदापूर तालुक्‍यात नीरा व भीमा म्हणजे उजनीला जोडणाऱ्या बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. नीरा देवघरमधील डाव्या कालव्याचे पाणी सरकारने बंद केल्याने आणि आता उजनी व नीरेतील पाणी मराठवाड्याकडे नेले जाणार असल्याने इंदापूर तालुक्‍यात अस्वस्थता वाढली आहे.

इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात काझड, अकोले, सणसर येथे सध्या नीरा-भीमा जलस्थिरीकरणाच्या बोगद्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे. हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून या बोगद्यातील डिजिटल सुरुंगामुळे अगोदरच आमच्या विंधनविहिरींचे, विहिरींच्या पाण्याचे स्रोत बदलले गेल्याची तक्रार स्थानिक रहिवासी करीत आहेत. त्यांनी बाळगलेला संयम आता मात्र सुटण्याची चिन्हे आहेत.

त्याला कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नात दडले आहे. भातखळकरांनी विचारलेल्या प्रश्नात नीरा-भीमा-कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाबाबत जलसंपदा मंत्री महाजन यांनी कृष्णा पाणीतंटा लवादाने पाणी वळविण्यास मनाई केल्याचे उत्तर देत ही योजना आता पुढे राबविता येणार नसल्याचे स्पष्ट केले.

पावसाळ्यात कृष्णा नदीचे वाहून जाणारे 25 टीएमसी पाणी नीरेत आणून ते तेथून उजनीतून मराठवाड्याकडे नेण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने 2007 मध्ये आखला. त्यास 2009 मध्ये मान्यता मिळाली. सध्या त्यापैकी सातारा जिल्ह्यातील सोमंथळी येथील बंधाऱ्याचे काम सुरू असून इंदापूर तालुक्‍यातही नीरा व भीमा नदी दरम्यानच्या बोगद्याचे काम सुरू आहे. या बोगद्यातून नीरेत पावसाळ्यात येणारे अतिरिक्त पाणी भीमेत म्हणजे उजनीत नेऊन तेथून मराठवाड्याकडे नेण्याचे नियोजन आहे.

आता कृष्णेतून पाणी नेता येणार नसेल, तर नीरेतूनच हे पाणी उजनीकडे वळवावे लागेल. मात्र नीरा नदी पावसाळ्यात अगदी महिनाभरही दुथडी भरून वाहत नाही. अशा स्थितीत नीरेतून 25 टीएमसी पाणी वाहून नेताच येणार नाही. कारण, पावसाळ्याचे नव्हे, तर धरण भरल्यानंतरचे काहीच दिवस नीरेतून पाणी भरून वाहते. त्या काळात नदीतून पाणी गेल्यास भविष्यात नीरा नदीखालचे बंधारे भरण्याची शाश्वती उरणार नाही, अशी भीती स्थानिक शेतकऱ्यांना आहे. पूर्वीपासूनचे हक्काचे 1.80 टीएमसी पाणी अगोदरच खडकवासल्यातून मिळायचे बंद झाले, त्यानंतर आता नीरा देवघरमधून पाणी बंद झाल्याने कालव्याकाठची पिके व शेती धोक्‍यात आली आहे.

बोगद्याचे काम बंद करू : रणजित निंबाळकर
छत्रपती कारखान्याचे संचालक रणजित निंबाळकर म्हणाले, "कृष्णेतून पाणी येणार नसेल तर आता नीरेतून व उजनीतून पाणी उचलून नेण्याची सरकारची योजना दिसते. मराठवाड्याला पाणी देण्यास आमचा विरोध कधीच नव्हता. मात्र, अगोदरच इंदापूरसह माढा, माळशिरस, सांगोला, पंढरपूर, सोलापूरसह नगर जिल्ह्यातील पाणी योजनांना उन्हाळ्यात उजनी किंवा नीरेचे पाणी पुरत नाही, तर त्यात पुन्हा वाटेकरी निर्माण करून सगळीकडे वाळवंट करण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतो. त्यामुळे आता पाण्याच्या वाटपाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत इंदापुरातील शेतकरीही बोगद्याचे काम होऊ देणार नाहीत.''

"बोगद्याने पाणी पळवणार का?'
सणसरचे माजी उपसरपंच अभयसिंह निंबाळकर, दलित पॅंथरचे नेते शरद कांबळे व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते म्हणाले, ""काझड बोगद्यातील सुरुंगामुळे सणसर व परिसरातील विंधनविहिरींचे पाणी बाजूला सरकल्याने अनेक विंधनविहिरी कोरड्या पडल्या आहेत. गेल्या पन्नास वर्षांत कधीच येथे पाणी कमी पडले नाही, हा बोगदा येथील पाण्याचे नैसर्गिक स्रोत संकटात आणण्यास कारणीभूत ठरला आहे. आता या बोगद्यातूनच हक्काचे पाणी पळवले जाणार असेल, तर आम्ही हे काम होऊ देणार नाही.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com