इंदापूरच्या काॅंग्रेस भवनात हलवाहलव......पंजाच राहणार की कमळ फडकणार, याची उत्सुकता

इंदापूरच्या काॅंग्रेस भवनात हलवाहलव......पंजाच राहणार की कमळ फडकणार, याची उत्सुकता

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील काँग्रेसजनांसाठी महत्त्वाचे ठिकाण असलेल्या काँग्रेस भवनातील सामानाची हलवाहलव सुरू झाली. तालुक्यात ऐन राजकीय घडामोडी सुरू असताना या भवनात नूतनीकरण सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. अर्थात हे नूतनीकरण केवळ भिंतीचे होणार की तेथे काॅंग्रेसचा तिरंगा जाऊन भाजपचे कमळ फडकणार, याची उत्सुकता आहे.

ऐन निवडणूक काळात या भवनाचा उपयोग कार्यकर्त्यांसाठी होऊ शकतो. नूतनीकरणाचे काम सुरू राहिल्यास निष्ठावान कार्यकर्त्यांनी हक्काचे उठण्याबसण्याचे ठिकाण राहणार नाही. त्यामुळे या बाबींकडे काही कार्यकर्त्यांनी प्रदेश कार्यालयाचे लक्ष वेधले. पण त्या तक्रारीकडे कोणी ढूंकुनही पाहिलेले नाही.

माजी मंत्री व काॅंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील हे उद्या (चार सप्टेंबर) आपल्या आगामी राजकीय कारकिर्दीची महत्त्वाची घोषणा करणार आहेत. त्यानंतर हे भवन काॅंग्रेसचे राहणार की नाही, याचा निकाल लागेल. 

तालुक्यात 2014 चा अपवाद वगळता सन 1952 पासून काँगेसची तालुक्यावर निर्विवाद सत्ता होती. जिकडे दिवंगत माजी खासदार शंकरराव पाटील ऊर्फ भाऊ, तिकडे विजय हे राजकीय समीकरण ठरलेले असायचे. त्यामुळे पदाधिकारी,कार्यकर्त्यांची गरज म्हणून सन 1975 नंतर काँग्रेस भवनाच्या उभारणीस सुरवात झाली. सुरेशभाई शहा यांनी या इमारतीचे काम पूर्ण केल्यानंतर भवनमध्ये राबता सुरू झाला. शंकरराव पाटील, राजेंद्रकुमार घोलप व गणपतराव पाटील या तीन आमदारांचा कारभार या इमारतीने पाहिला.

त्यानंतर 1995 साली विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना काँग्रेसने तिकीट न दिल्याने त्यांनी बंडखोरी केली. त्यांनी विकास आघाडीच्या माध्यमातून पतंग चिन्हावर निवडणूक लढवून विजयी झाल्यानंतर दूधगंगा दूध उत्पादक संघात बसण्यास सुरुवात केली. त्यामुळे तालुक्यातील काॅंग्रेसचे महत्त्व कमी झाले आणि सोबत भवनकडेही मग दुर्लक्ष झाले. हर्षवर्धन पाटील हे तीन वेळा अपक्ष आमदार होऊन मंत्री झाले. मात्र चौथ्या वेळी पाटील यांनी हाताच्या चिन्हावर निवडणूक जिंकून पुन्हा मंत्री झाल्यानंतर काँग्रेस भवनला महत्त्व प्राप्त झाले.

आता या इमारतीत बदल करण्याचे ठरविण्यात आले आहे. या इमारतीचा तळमजला चांगला आहे. मात्र वरच्या मजल्यावरील सिमेंटचे पोपडे पडत असून छत व भिंतीस भेगा पडल्या आहेत. बाहेरच्या संरक्षक भिंतीस तडे गेले आहेत. कार्यकर्त्यांच्या तुलनेत सुविधा कमी पडत आहेत. त्यातच हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे प्रशस्त बांगला बांधल्याने तेथे दर रविवारी जनता दरबार सुरू केला आहे. त्यामुळे तेथील आवश्यक कागदपत्रे व सामान हलवण्यात आले आहे. तसेच भवनमधील सहा पैकी तीन कर्मचारी बंगल्यात राजकीय कामासाठी वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागेत काँग्रेस चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तीन मजली प्रशस्त इमारत उभी केली जाणार आहे.

यामध्ये तळमजला संपूर्ण व्यापारी पद्धतीने विकसित होणार आहे. तेथे दुकाने काढण्यात येणार आहेत.  तसेच दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर दोन सभागृह, कार्यालये होणार आहेत. मात्र यंदाची निवडणूक काँग्रेस भवनच्या भवितव्याची ठरणार आहे. हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभेस आघाडी धर्माचे पालन केले असल्याने विधानसभेस राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठिंबा द्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यातच काँग्रेसने त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून वंचित ठेवून त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांना महत्वाची पदे दिल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर भाजपात जाण्यासाठी दबाव वाढत आहे. त्यामुळे काँगेस भवनवर पंजा असलेला तिरंगा फडकणार की कमळ असलेला भाजपचा झेंडा फडकणार याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

या भवनाच्या जागेचा सातबारा हा तालुका काॅंग्रेसच्या अध्यक्षाच्या नावे आहे. त्यामुळे भाजपने याचा ताबा घेतल्यास तो पुढे आणखी चर्चेचा विषय होऊ शकतो. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com