लॉकडाऊनमध्ये वजन वाढू द्यायचं नाही? : `दीक्षित पॅटर्न`वाल्या डाॅक्टरांचा हा सल्ला ऐकाच! - Increase the immune system that defeats the corona by doing double exercise in the lockdown. Jagannath Dixit | Politics Marathi News - Sarkarnama

लॉकडाऊनमध्ये वजन वाढू द्यायचं नाही? : `दीक्षित पॅटर्न`वाल्या डाॅक्टरांचा हा सल्ला ऐकाच!

विकास गाढवे
शनिवार, 18 एप्रिल 2020

चालणे शक्य नसेल तर स्टेशनरी सायकल, स्पॉट जॉगींग, जोर बैठका, सूर्यनमस्कार, जीणे चढणे उतरणे असे ह्रदयाची गती वाढवणारे कोणतेही व्यायाम ४५ मिनिटे करा. आजार लपवू नका असे सांगतानाच खोकतांना किंवा शिंकताना बाहीमध्ये खोका असा सल्लाही डॉ. दिक्षित यांनी दिला आहे.

लातूर : लॉकडाऊनमुळे वजन कमी करण्याची चांगली संधी चालून आली आहे. यामुळे दोन वेळा जेवण आणि पंचेचाळीस मिनिटांत साडेचार किलोमीटर चालण्याची नेहमीची जीवनशैली कायम ठेवण्यासोबत वजन कमी करण्यासाठी दुप्पट व्यायाम करा. चालणे शक्य नसेल तर ह्रदयाची गती वाढवणारा कोणताही व्यायाम करा, गरम किंवा कोमट पाणी पिण्यासह ताजे पदार्थ खाण्यातून कोरोनाला हरवणारी रोगप्रतिकारशक्ती वाढवा, असा सल्ला डॉ. जगन्नाथ दिक्षित यांनी दिला आहे.

लॉकडाऊनच्या निमित्ताने लोकांच्या जीवनशैलीत झालेला बदल व त्यानुसार आवश्यक आहार व व्यायामाची माहिती देताना डॉ. दिक्षित म्हणाले, ``पॅकफूड टाळून ताजे पदार्थ खा, जेवणाच्या सुरवातीला ड्रायफ्रुट्स किंवा एखादे फळ खावे. त्यानंतर काकडी, टोमेटो, गाजराचा समावेश असलेले वाटीभर सॅलड, वाटीभर मोड आलेले कडधान्य किंवा उकडलेली अंडी खाणे शरीरासाठी योग्य आहार ठरू शकतो. त्यानंतर भूक असेल तरच पोळी भाजी किंवा वरण भात असे पदार्थ खावेत, दूध आवडत असेल तर प्यावे.

लॉकडाऊनच्या काळात अशा क्रमाने हे अन्नपदार्थ खायचे आहेत. हे सर्व अन्नपदार्थ दोनवेळच्या जेवणात आवश्यक नाहीत. मधुमेही किंवा पूर्वमधुमेही असाल तर कोणत्याही प्रकारचे गोडफळ किंवा गोड पदार्थ खायचे नाही. भाजीपाला किंवा फळे बाजारातून आणल्यानंतर पाण्यात अर्धा ते एक तास भिजवून ठेवावीत. त्यानंतर ते पुसून किंवा वाळवून वापरावेत. मधुमेही रूग्णांनी नेहमीचा डायट प्लॅन चालूच ठेवावा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून स्वतःच्या आजारासह कोरोनापासून ते दूर राहू शकतात.

व्यायामाचा आनंद घ्या

लॉकडाऊनमुळे खूप वेळ असल्याने वजन कमी करण्यासाठी दुप्पट व्यायाम करा, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. चालणे शक्य नसेल तर स्टेशनरी सायकल, स्पॉट जॉगींग, जोर बैठका, सूर्यनमस्कार, जीणे चढणे उतरणे असे ह्रदयाची गती वाढवणारे कोणतेही व्यायाम ४५ मिनिटे करा. आजार लपवू नका असे सांगतानाच खोकतांना किंवा शिंकताना बाहीमध्ये खोका असा सल्लाही डॉ. दिक्षित यांनी दिला आहे. आजारपणात वास येत नसेल व चव कळत नसले तर डॉक्टरांचा सल्ला घ्या असेही डॉ. दिक्षित यांनी सांगितले.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे करा..

- गरम किंवा कोमट पाणी  सहन होईल तेवढे दिवसभर  प्या.
- स्वयंपाकात हळद, जीरे, धने आणि लसूनाचा समावेश करा.
- रात्रीच्या जेवणानंतर शेवटी अर्धा चमच्या हळद घातलेले दूध घ्या.
- घसा बसल्यास कोमट पाण्यात मिठ व हळद टाकून दिवसातून दोन ते तीन वेळा गुळण्या करा
- नाकात दोन थेंब चांगले तुप किंवा खोबरेल तेल टाका-
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख