इम्तियाज जलील यांचा खैरेंना टोला : खासदार बोलका,तर परिणाम चांगले 

महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या वादावर बोलतांना महापालिका बरखास्त करा आणि सगळा कारभार आयुक्तांकडे सोपवा अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली.
Khaire Jaleel
Khaire Jaleel

औरंगाबादः संसदेत बोलणारा, प्रश्‍न उपस्थित करणारा, आपले मुद्दे प्रकर्षाने  मांडणारा खासदार असेल तर त्याचे चांगले परिणाम देखील निश्‍चितच दिसतात असा टोला एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी माजी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना त्यांचे नाव न घेता लगावला.

 हिवाळी अधिवेशनात आपण उपस्थित केलेल्या प्रश्‍नांबद्दल आपले अनेक मंत्र्यांनी वैयक्तिक भेटून तसेच फोनवरून अभिनंदन केल्याचे इम्तियाज यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर इम्तियाज जलील यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकांच्या विरोधात एमआयएमच्या वतीने 20 डिसेंबर रोजी राज्यभरात काढण्यात येणाऱ्या मोर्चा विषयीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी सुरुवातीलाच इम्तियाज यांनी आपण मांडलेल्या प्रश्‍नांना कशाप्रकारे प्रतिसाद मिळाला याची काही उदाहरणे दिली.

इम्तियाज जलील म्हणाले, संसदेत पोटतिडकीने आपल्या मतदारसंघाचे, नागरिकांचे प्रश्‍न मांडले तर त्याला संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून देखील सकारात्मक प्रतिसाद येतो. मी मतदारसंघातील अनेक विषय मांडले तेव्हा मला मंत्र्यांकडून पत्र किंवा प्रत्यक्ष भेटून मला तुमच्या विषयावर कार्यवाही सुरू असल्याचे कळवण्यात आले आहे.

औरंगाबाद येथून मुंबई, दिल्लीसाठी आणखी नवी विमाने सुरू करण्यासाठी मी केलेल्या पाठपुराव्याला यश आले, त्यामुळे आज शहरातून उडाण भरणाऱ्या विमानांची संख्या वाढलेली पहायला मिळत आहे. देशांतर्गत विमानसेवे सोबतच आता आंतरराष्ट्रीय विमाने देखील औरंगाबादेतून सुरू करण्यात यावी यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.

दुबई, सिंगापूरसाठी औरंगाबादेतून दोन विमाने सुरू व्हावीत यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. संबंधित प्राधिकरण व त्यांच्या अधिकाऱ्यांकडे मी प्रस्ताव देखील दिला आहे. रोज आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणे शक्‍य नसले तरी आठवड्यातून किमान दोन विमाने औरंगाबादेतून सुरू व्हावीत अशी अपेक्षा आहे.

थायलंडमधून बरेच बौध्द पर्यटक भारतात येत असतात. त्यांच्यासाठी सिंगापूर किंवा थायंलडहून थेट औरंगाबादसाठी विमान सुरु केले तर त्याचा फायदा आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर कनेक्‍टीव्हीटी वाढवण्यास होईल असेही इम्तियाज यांनी सांगितले.

महापालिका बरखास्त करा..

महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या वादावर बोलतांना महापालिका बरखास्त करा आणि सगळा कारभार आयुक्तांकडे सोपवा अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली. 

भाजपच्या उपमहापौरांना राजीनामा कुणाकडे द्यावा हे माहित नाही का ? हे सगळे भाजपचे दबावतंत्र आहे. तर उरलेल्या चार पाच महिन्यात काय करताय येईल या विचारामुळे शिवसेनेच्या महापौरांना खुर्ची सोडवत नसल्याची टिका देखील इम्तियाज यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com