मुंबईतील राजकीय भूकंपाची सांगलीत कंपणे 

मुळात सांगली जिल्ह्यातील भाजपची वाढ ही राष्ट्रवादीच्या सहयोगातूनच झाली आहे.
 sangli politics
sangli politics

आज सकाळी सांगलीकरांनी राजकीय भूकंपाचा अनुभव घेतला. आजपर्यंत सत्तेचा असा खेळ पाहिला नाही ! हिच प्रतिक्रिया प्रत्येकाच्या तोंडी आज ऐकायला मिळत होती. नव्या आणि जुन्या पिढीने अभूतपूर्व असा हा सत्ता खेळ पाहिला आणि "क्रिकेट आणि राजकारण काही होऊ शकते' असे नितीन गडकरी दोन दिवसांपूर्वीच जे म्हणाले होते त्याचा प्रत्यय घेतला. आणि आज दिवसभर कोलकत्त्यातील कसोटीची चर्चा मागे पडून फक्त राजकीय सामन्याची चर्चा रंगली. 

आज प्रत्येकाची सकाळच राजकीय हादऱ्याने सुरू झाली. मुख्यमंत्रिपदाची देवेंद्र फडणवीस शपथ घेत होते आणि पाठोपाठ अजितदादा यामुळे प्रत्येकाच्या डोळ्यावर विश्‍वासच बसेना. पाठोपाठ आठनंतर प्रत्येकजण आपापल्या मित्रांना फोन करून विचारत होते की, टीव्ही पाहिला काय...? राष्ट्रवादीला घेऊन देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री...अशा बातम्या एकमेकाला सांगून धक्‍कातंत्रामागच्या खेळी जाणून घेत होत्या...भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली असा मेसेज वाऱ्यासारखा जिल्ह्यात पसरला. 

अजितदादांची तीन पक्षांच्या खिचडीपेक्षा दोन पक्षांचे सरकारच अधिक चांगली कामगिरी करू शकते ही प्रतिक्रिया झळकली आणि अनेकांना विश्‍वास बसला...पण नंतर आणखी ट्विस्ट येत राहिली आणि राष्ट्रवादीचा पूर्ण नाही तर दादांचा गट तेवढा भाजपबरोबर असल्याचा खुलासा झाला आणि सकाळपासून सुरू झालेला या खेळात ब्रेकिंग न्यूजचा खेळ डे-नाईट मॅचसारखा रात्रीपर्यंत चालला होता.  रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या क्रिकेट मॅचसारखे लोक टीव्हीसमोर बसून राहिले. याचा सांगली जिल्ह्याच्या राजकारणांवर काय परिणाम होणार, याची देखील चर्चा ठिकठिकाणच्या ग्रुपमध्ये रंगली होती. 

मुळात सांगली जिल्ह्यातील भाजपची वाढ ही राष्ट्रवादीच्या सहयोगातूनच झाली आहे. खासदार संजयकाकांपासून ते पृथ्वीराज देशमुखांपर्यंत अनेकजण राष्ट्रवादीतूनच भाजपवासी झाले आहेत. या सर्वांचे अजितदादांशी खूप जवळचे संबंध असल्याचे सर्वांना माहीत आहे. सांगलीच्या आघाडीच्या 15 वर्षांच्या सत्ताकाळात अजितदादांचा सांगलीच्या राजकीय निर्णय प्रक्रियेतही प्रभाव राहिला आहे. कॉंग्रेसच्या येथील जिरवा-जिरवीत भाजपचा वापर राष्ट्रवादीने येथे करून घेतला होता. येथे भाजपला जयंत जनता पार्टी म्हणूनसुद्धा उपहासाने म्हटले गेले आहे. मात्र आजच्या अजितदादांच्या बंडानंतर सांगली राष्ट्रवादीची भूमिका अत्यंत सावध राहिली, आम्ही पक्षाबरोबर एवढीच सावध प्रतिक्रिया व्यक्‍त होत होती. पण गेले आठवडाभर महाविकासआघाडीची सत्ता आली तर अनिल बाबर यांच्यासह जयंतराव, विश्‍वजित पुन्हा मंत्री होतील अशा चर्चा रंगल्या होत्या. त्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागला आहे. 

आजच्या घडामोडींनी कॉंग्रेसलाही आपली सत्ता येईल, राज्यातील चार कामे होतील हा आशावाद जागला होता त्यावरदेखील काहीकाळ पाणी पडले आहे. तर गेले वीस दिवस आपली सत्ता येणार नाही असे वाटत असलेल्या भाजप कार्यकर्त्यांना आज 'देव पावल्या'सारखे वाटले. पेढे वाटले, फटाके उडवत थोडा सावध असेना, पण त्यांनी दबकत जल्लोष केला कारण फडणवीस सरकारचे भवितव्य 30 नोव्हेंबरला ठरणार आहे. पण काही काळ सोशल मीडियावर बॅकफुटवर गेलेले भाजप समर्थक आज फॉर्मात दिसले. तर शिवसेनेचे समर्थक आज शांतपणे हा खेळ पाहात होते...दुपारनंतर मात्र सोशल मीडियावरील दोन्हीकडील पोस्टवॉर पुन्हा सुरू झालेले दिसले. 

राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येण्याचा सांगली भाजपला मोठा फायदा होऊ शकतो कारण महापालिका, जिल्हा परिषद या मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकास निधीवर याचा परिणाम होत असतो. त्यामुळे सांगली, मिरज, कुपवाड महापालिका, इस्लामपूर, तासगाव नगरपालिका येथे भाजपची सत्ता आहे. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोषही केला. तर भाजपची सत्ता गेली तर या ठिकाणच्या सत्ता केंद्रांवर विपरीत परिणामही होऊ शकतो, पण हे दादांच्या बंडाच्या हवेवर आलेले सरकार तीस तारखेपर्यंत तरी सलाईनवर असेल आणि त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार असल्याने दबकतच एकमेकाला पेढा भरविला गेला आहे. अर्थात भाजप कोणाचीही मदत घेऊन सत्तेत असणे किंवा नसणे याचे फार मोठे परिणाम सांगलीवर होऊ शकतात आणि अजितदादांची फूट यशस्वी ठरली तरी येथील राष्ट्रवादीतील काहींची भाजपशी जवळीक वाढूही शकते. भाजपची सत्ता पुन्हा आली तर सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ हे मंत्रिपदाचे दावेदार असू शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com