कोट्यावधींचा मलिदा गेल्याने कोल्हापुरात मतदारांचे हुंदके!

राज्यातील सर्वाधिक खर्चाची निवडणूक म्‍हणून कोल्‍हापूरची ओळख आहे. निवडणूक बिनविरोध (Legislative Council elections)झाल्याने मतदारांचा स्‍वप्‍नभंग झाला. रातोरात पंचतारांकित सुविधा गुंडाळून मतदारांची वाहने कोल्‍हापूरच्या (Kolhapur) दिशेने धावू लागली आहेत.
कोट्यावधींचा मलिदा गेल्याने कोल्हापुरात मतदारांचे हुंदके!
Published on

महाविकास आघाडीकडून पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) व भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांच्यात दुरंगी लढत होत होती. पंधरा दिवसांपासून मतदारांना सहलीवरही पाठवले जात होते

काहींनी तर विधान परिषदेच्या भरोशावर वाहनांचे तसेच फ्‍लॅटचे बुकिंग करूनच सहलीच्या बसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, शुक्रवारी (ता. २६) सकाळीच निवडणूक बिनविरोधची चर्चा सुरू झाली आणि पायाखालची वाळू घसरली.

माहितीची खात्री करण्यासाठी फोन खणाणू लागले. दुपारी १२ पर्यंत बिनविरोधची खात्री पटल्याने मतदारांचा मूडच बदलला. दुपारी निवडीची घोषणा झाली अन्‌ नाईलाजाने बॅगा भरून मतदारांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

सांताक्‍लॉजरूपी उमेदवार सतेज पाटील उभे असून ते मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करतील, असे मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री उदय सामंत, खासदार संजय मंडलिक यांच्यासह कैक नेत्यांनी पाटील यांचा अर्ज भरताना जाहीर केले होते. दरम्यान, सहलीवर पाठवताना मतदारांना टोकनही पोहोच केले. मात्र, निवडणूक बिनविरोध झाल्याने पुढचे हप्‍तेही थांबणार आहेत. या घडामोडीबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माफी मागत मंत्री पाटील यांनाच मतदारांकडे पाहण्याचा सल्‍ला दिला आहे.

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषदेची निवडणूक (Legislative Council elections) बिनविरोध झाली आहे. राज्यातील सर्वाधिक खर्चाची निवडणूक म्‍हणून कोल्‍हापूरची ओळख आहे.

सहलीवर जाण्यापूर्वी दोन्‍हींकडून टोकन पोहोच केले होते. महाविकास आघाडीचे उमेदवार नाशिक येथे, तर भाजप आघाडीचे उमेदवार गोवा येथे मुक्‍कामी होते. बहुतांश सदस्य सहकुटुंब, तर काहीजण पै-पाहुण्यांसह रिसॉर्टमध्ये एन्‍जॉय करत होते.

या निवडणुकीचा खर्च राज्यात नेहमीच सर्वाधिक राहिला आहे. यावेळी १२० ते १५० कोटी खर्चाची चर्चा होती. यात मतदारांना लक्ष्‍मीदर्शन करण्यासह सहकुटुंब हवाई सहली, पंचतारांकित व्यवस्‍था, प्रवासासाठी आलिशान वाहने आदींवर खर्च होत असे. मात्र, निवडणूक बिनविरोध झाल्याने हा शेकडो कोटींचा खर्च वाचला असून चांगला पायंडा पाडल्याबद्दल सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्‍त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com