Beed social media war intensifies between NCP & BJP | Sarkarnama

बीडमध्ये मुंडे - सोनवणे यांच्यात सोशल मीडियावर सुरु झाले महायुद्ध  

रविवार, 24 मार्च 2019

दत्ता देशमुख : सरकारनामा ब्युरो

प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात दोन्ही उमेदवारांचे संवाद दौरे सुरु असताना त्यांच्या समर्थकांकडून सोशल मिडीयावर आपल्या उमेदवारांचे गुणगान आणि विरोधी उमेदवारांच्या उणे - दुणे काढणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. पण, सध्या चर्चेत आहेत भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या समर्थकांकडून आपल्या नेत्याचे कौतुक आणि विरोधकांवर टीका करणाऱ्या पोस्ट .

 

दत्ता देशमुख : सरकारनामा ब्युरो

प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात दोन्ही उमेदवारांचे संवाद दौरे सुरु असताना त्यांच्या समर्थकांकडून सोशल मिडीयावर आपल्या उमेदवारांचे गुणगान आणि विरोधी उमेदवारांच्या उणे - दुणे काढणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. पण, सध्या चर्चेत आहेत भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या समर्थकांकडून आपल्या नेत्याचे कौतुक आणि विरोधकांवर टीका करणाऱ्या पोस्ट .

 

बीड : प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात मोठ्या सभा नसल्याने प्रमुख भाजप उमेदवार डॉ. प्रितम मुंडे व राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचे संवाद दौरे सुरु आहेत. मात्र, याच वेळी दोघांच्या वॉर रुममधून सोशल मिडीयाचा प्रचारही जोरात आहेत. यातील आपल्या उमेदवारांचे गुणगाण आणि विरोधी उमेदवारांचे कोडकौतुक करणाऱ्या परस्पर विरोधी पोस्ट सध्या चांगल्याच व्हायरल होत असून त्यांची चर्चाही जोरात होत आहे. 

भाजपकडून खासदार प्रितम मुंडे यांची उमेदवारी निश्चित असल्याने आचारसंहिता लागण्या अगोदरच मुंडे भगीनींनी विकास कामांच्या उद॒घाटन व भूमिपुजनाच्या निमित्ताने प्रचाराचाची एक फेरी उरकुन घेतली. याच वेळी राष्ट्रवादीचा उमेदवार कोण अशी चर्चा सुरु झाली. ऐनवेळी बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर झाली. मग, सोनवणेंनीही बुथ प्रमुखांचे मेळावे सुरु केले. याच वेळी त्यांच्या सोशल मिडीया टिमनेही त्यांचा जोरदार प्रचार सुरु केला. बजरंग सोनवणे यांचा राजकीय आलेख मांडतानाच त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार खासदार डॉ. प्रितम मुंडे यांचे उणे - दुणे दाखविणारे एक पोस्टर सोशल मिडीयावर व्हारल करण्यात आले. या पोस्टरमध्ये संसदेचे छायचित्र टाकून यंदा तुम्ही कोणाला निवडणार? असा प्रश्न विचारण्यात आला.

 सुरुवातीला बजरंग सोनवणे यांच्या छायाचित्राखाली त्यांचा ग्रामपंचायत सदस्यापासून ते पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर जिल्हा परिषद सभापती व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आता आता लोकसभेचे उमेदवार असा त्यांचा चढता राजकीय आलेख मांडण्यात आला. याखाली ‘कतृत्व गाजवून एकेक पायरी गाठून पुढे आलेला शेतकरी पुत्र’ असाही उल्लेख करण्यात आला. तर, याच पोस्टमध्ये प्रितम मुंडे फोटोखाली पुढे पाच ओळींत शुन्य - शुन्य लिहून खाली सहाव्या ओळीत खासदार असा उल्लेख केला. तर, त्याखाली कधीच जिल्ह्यात नसताना केवळ वडिलांच्या जिवावर आणि भावनिकतेच्या जोरावर निवडणुक लढविणाऱ्या प्रितम ताई असा मजकूर लिहला आहे.

 राष्ट्रवादीकडून दोन - तीन दिवस ही पोस्ट व्हारल झाल्यानंतर भाजपच्या मिडीया सेलनेही याला तोडीस तोड पोस्ट व्हायरल करायला सुरुवात केली. यामध्ये संसदेचे छायाचित्रावर कसा हवा खासदार असा मजकूर टाकला. तर, सोनवणे समर्थकांच्या पोस्टला उत्तर देण्यासाठी त्यांच्या फोटोखाली सुरुवात चंदन गुत्तेदारीच्या कमाईतून, राष्ट्रवादी - भाजप - राष्ट्रवादी असा संधीसाधू प्रवास, स्वमालकीचा साखर कारखाना असलेला ‘गरिब उमेदवार’ व दिवंगत विमलताई मुंदडा व दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांना फसवून हल्ली मुक्काम राष्ट्रवादी असे टोमणे मारले आहेत. तर, प्रितम मुंडे यांच्या फोटोखाली उच्चशिक्षीत, डॉक्टर, मितभाषी, प्रामाणिक खासदार अशी प्रतिमा, पाच वर्षांत संपूर्ण खासदार निधी विकासकामी उपयोगात, बीड जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा रेल्वे प्रश्न तडीस नेला व राष्ट्रीय महामार्गांचे हजारो कोटींचे प्रकल्प जिल्ह्यात प्रगतीपथावर असा मजकूर छापला आहे. या दोन्ही पोस्ट सध्या जिल्ह्यात सोशल मिडीयावर चांगलाच धुमाकुळ घालत आहेत.