नववीत असताना जसे बोलले तसे 'राजेश स्वामी, IFS' घडले, आज सर्वांना सोडून गेले!

IFS rajesh swami pass away
IFS rajesh swami pass away

सातारा : एकदा शिक्षकांनी नववीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना भविष्यात तुम्ही कोण होणार, असे विचारले. त्यावर कोणी डॉक्‍टर, कोणी इंजिनिअर मात्र, राजेश स्वामी म्हणाले, मी राजेश स्वामीच होणार. त्यांनी त्यांचे हे म्हणणे जागतिक पातळीवर सिद्ध करून दाखविले.

भारताच्या परराष्ट्र सेवेत कार्यरत असताना त्यांनी विविध उच्चस्तरीय पदांवर काम केले. परराष्ट्र अधिकारी म्हणून इजिप्त, थायलंडमध्ये तर केनियाचे ते उपउच्चायुक्त होते. या सेवा बजावताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद, तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातील शिष्टमंडळात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग असायचा. आज ते आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्यातील संवेदनशील आणि मदतशील व्यक्तिमत्व साताकरांच्या नेहमीच स्मरणात राहणार आहे.

राजेश स्वामी यांचे आज दिल्लीत किडनीच्या विकाराने निधन झाले. सातारा जिल्ह्यातील ते पहिले आयएफस अधिकारी होत. भुईंज (ता. वाई) हे त्यांचे मुळ गाव. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत तर माध्यमिक रयत शिक्षण संस्थेच्या भुईंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात झाले. कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी बी ई सिव्हिल ही पदवी प्राप्त केल्यानंतरत्यांनी काही काळ खाजगी क्षेत्रात नोकरीही केली. त्याचवेळी त्यांना अभियांत्रिकीच्या स्पर्धा परिक्षेची माहिती मिळाली. त्यादिशेने त्यांनी प्रवास सुरू केला.

राज्यसेवा परिक्षा, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षा देण्यासाठी त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन पूर्ण वेळ अभ्यास केला. कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे त्यांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास केला. दिवसरात्र 18-18 तास प्रचंड मेहनत घेतली. प्रथम त्यांची राज्य सेवा परिक्षेतून तहसिलदारपदी निवड झाली. परंतु त्यावर समाधान न मानता त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा अभ्यास सुरू ठेवला. त्यांच्या अपार मेहनतीला यश मिळाले आणि ते आयएफएस झाले. सातारा जिल्ह्यातील पहिला आयएफएस अधिकारी होण्याचा मान त्यांनी मिळविला. या सेवेत कार्यरत असताना त्यांनी इजिप्त, थायलंडमध्ये परराष्ट्र अधिकारी म्हणून सेवा बजाविली. तसेच केनियाचे उपउच्चायुक्तपदी म्हणून काम पाहिले. त्यांनी या पदाच्या माध्यमातून साताऱ्याचा झेंडा देशभर फडविला. त्यांनी दिल्ली येथील भारतीय परराष्ट्र मंत्रालयासह इजिप्त, थायलंड या देशात परराष्ट्र अधिकारी म्हणून लक्षवेधी कामगिरी केली. इजिप्त आणि थायलंडमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करताना आपल्या कर्तबगारीचा ठसा त्यांनी उमटविला. त्यामुळेच त्यांची ज्या ज्यावेळी बदली अन्य देशात झाली. त्या त्यावेळी त्यांच्या निरोप समारंभात त्या देशातील पंतप्रधानासह सत्ताधारी पक्षातील प्रमुख, विविध देशाचे राजदुत, अधिकारी, उपस्थित राहात असत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com