चव्हाणांचे ऐकले असते तर बाबरी मशीद वाचली असती : पवारांनी दिली कबुली

...
babari masjid, shankarrao chavan, sharad pawar
babari masjid, shankarrao chavan, sharad pawar

पुणे :  उत्तर प्रदेशमध्ये बाबरी मशिद पाडण्यासाठी काही  हिंदुत्ववादी घटकांनी पुढाकार घेतला होता. त्यावेळी देशाच्या समोर नाजूक प्रश्न उभा राहिला होता. कारण यामुळे देशात सामाजिक अस्थिरता निर्माण होणार होती. यावर पेच सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बसली होती. यावेळी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेले  कल्याणसिंग यांचे सरकार ताबडतोब बरखास्त करण्याचे मत व्यक्त केले होते, अशी माहिती राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

कल्याणसिंग सरकारची धोरणे ही हिंदुत्ववादी घटकांच्या धोरणे आहेत. त्यामुळे ते बरखास्त केले तरच हा पेचप्रसंग सुटण्याची शक्यता आहे, अशी ठाम सूचना त्यांनी केली होती. पण त्या वेळी केंद्रीय मंत्रिमंडळातील  आम्ही इतर सर्वांनी चव्हाण यांच्या विरोधात मत मांडले. पण आज जेंव्हा मागे वळून पाहतो तेंव्हा चव्हाण यांचा निर्णय मान्य केला असता तर आज बाबरी मशीद वाचली असती. त्याचबरोबर रक्तपातही घडला नसता, असे मत शरद पवार यांनी आज व्यक्त केले.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, जलक्रांतीचे जनक डॉ. शंकरराव चव्हाण, सहकार महर्षी यशवंतराव मोहिते, लोकनेते राजारामबापू पाटील आणि थोर विचारवंत डॉ. रफिक झकेरिया यांच्या जन्मशताब्दीनिमित्त   
संस्मरण कार्यकर्तृत्वाचे हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी पवार यांनी चव्हाण यांच्याबद्दलचा हा अऩुभव सांगितला.

भाजपने 1992 मध्ये राममंदिरासाठी आंदोलन केले होते. कारसेवक मोठ्या प्रमाणात अयोध्येला जमले होते. बाबरी मशिदीला धोका निर्माण झाला होता. त्या वेळी पी. व्ही. नरसिंहराव हे पंतप्रधान होते. उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार होते. या सरकारने बाबरी मशीदिला धोका पोहोचवू देणार नसल्याचे आश्वासन सर्वोच्च न्यायालयात दिले होते. तरीही ती मशीद सहा डिसेंबर 1992 रोजी पडली आणि त्यानंतर देशात प्रचंड हिंसाचार झाला. याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चव्हाण यांनी काय भूमिका मांडली, यावर पवार यांनी प्रकाश टाकला.

पवार यांनी सांगितले की  चव्हाण हे अतिशय शिस्तीचे होते. त्यांच्या मंत्रिमंडळात मला काम करण्याची संधी मला मिळाली व त्यांनाही मी मुख्यमंत्री असताना माझ्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. धरणे बांधण्यात चव्हाण यांचा मोठा वाटा आहे. उजनी, जायकवाडी, विष्णुपुरी,पैनगंगा ही धरणे चव्हाण यांच्याच पुढाकाराने उभारली आहेत. त्याचबरोबर झिरो बजेट अर्थसंकल्प  ही त्यांच्याच डोक्यातून आलेली कल्पना आहे .सुरवातीला आम्ही याला विरोध केला पण नंतरच्या काळात परिस्तिथी नुसार योग्य आहे, हे आम्हाला समजले अशीही कबुली त्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com