लॉकडाउन नसता तर..? तब्बल आठ लाख कोरोनाबाधित रुग्णालयांत असते..

महाराष्ट्रात सर्वाधिक ९२ रुग्ण वाढले असून गुजरातमध्ये त्याखालोखाल ५४ नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सामूहिक उपद्रव देशात अद्याप नसला रुग्णांची वाढती संख्या ही आरोग्य यंत्रणेसमोरील काळजीचे कारण बनले आहे.
covid 2019
covid 2019

नवी दिल्ली : देशात वेळेवर लॉकडाउन लावण्यात आला नसता तर आजमितीला देशातील रुग्णसंख्या ८ लाखांवर पोहोचली असती. कोरोना महासाथीविरुद्ध लढण्यासाठी हायड्रोक्लोरोक्वीन गोळ्या आणि वैयक्तिक सुरक्षा उपकरणे म्हणजे पीपीई यांची आवश्यकता ही प्रत्येक रुग्णाला असतेच असे नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

देशात या दोन्हींचीही संख्या पुरेशी आहे. मात्र या दोन्ही गोष्टी सरसकट वापरण्याच्या नाहीत, किंबहुना हायड्रोक्लोरोक्वीन हृदयविकाराच्या रुग्णांसाठी प्रसंगी घातक ठरू शकते, असा इशारा आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी दिला.

देशात गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनाच्या तडाख्यात सापडलेल्या रुग्णांची संख्या एक हजाराहून जास्त झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आजअखेर ७४५० झाली आहे. बरे झालेले रुग्ण ६४३ आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ९२ रुग्ण वाढले असून गुजरातमध्ये त्याखालोखाल ५४ नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सामूहिक उपद्रव देशात अद्याप नसला रुग्णांची वाढती संख्या ही आरोग्य यंत्रणेसमोरील काळजीचे कारण बनले आहे. विशेषत: लॉकडाउन लागू केल्यानंतरच्या काळात देशात सरासरी २९ टक्के या गतीने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 

आयसीएमआरच्या या ताज्या अहवालात म्हटले आहे की लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय जर केंद्र सरकारने मार्चच्या शेवटच्या आठवड्यात केला नसता तर 15 एप्रिलपर्यंत देशातील रुग्णसंख्या, आज जी काही हजारांवर आहे ती 15 एप्रिलपर्यंत किमान 8 लाख 20 हजारांचा टप्पा ओलांडून गेली असती. या अहवालाबाबतची माहिती विदेश मंत्रालयाकडून विदेशी पत्रकारांना देण्यात आली. विदेश मंत्रालयाचे सचिव विकास स्वरूप यांनी ही माहिती देताना याचा उल्लेख केला आहे.

लॉकडाऊन देशात अत्यंत योग्य वेळेला लागू करण्यात आले आहे असे आयसीएमआरचे प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. लॉकडाऊन जारी केले नसते तर भारतासारख्या 130 कोटी लोकसंख्येच्या प्रचंड मोठ्या देशांमध्ये करोना संक्रमण वेगाने पसरले असते आणि एक धोकादायक आणि हाहाकार उडवणाी परिस्थिती निर्माण झाली असती. तशी परिस्थिती सावरणे देश आणि राज्याच्या यंत्रणांना अत्यंत कठीण गेले असते असेही या संस्थेचे निरीक्षण आहे. करोनाची बाधा झालेला एक रुग्ण पुढच्या तीस दिवसांमध्ये किमान 406 लोकांना कोरोना महामारीचा विषारी प्रसाद देऊ शकतो, असेही  आयसीएमआरच्या एका अन्य अहवालात म्हटले आहे.

अगरवाल म्हणाले की आज घेतलेल्या बैठकीत सर्व मुख्यमंत्र्यांनी केंद्राला कोरोनाशी लढण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय पंतप्रधानांनी आयुष डॉक्टरांशीही चर्चा केली. उपचार करताना टेलीमेडिसीन प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन करताना पंतप्रधानांनी या डॉक्टरांना सांगितले की योगा ॲट होम सारख्या संकल्पना जास्त राबविण्याची गरज आहे. केंद्र सरकारने कोरोना उपचारांवरील देखरेखीसाठी आणखी १० अधिकारिता मंत्रीगट स्थापन केले आहेत.

अगरवाल म्हणाले, की रेल्वेने २५०० डॉक्टर आणि ३५००० वैद्यकीय कर्मचारी तसेच ५६५ रुग्णालय घरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. ३२५० डब्यांमध्ये ८०००० खाटांवर कोरोना उपचार कक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गेल्या चोवीस तासात १ लाख ७१ हजार ७१८ लोकांच्या कोरोना चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. या चाचण्यांचा वेग अधिक वाढवण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली.

मोदींचा मुख्यमंत्र्यांना संदेश

‘जान भी और जहान भी’ असा मंत्र देतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना संसर्गाच्या संकटावर मात करण्यासाठी रणनीती आखण्याच्या अनुषंगाने विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह बहुतांश राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी 14 एप्रिलला संपणाऱ्या लॉकडाउनची मुदत किमान पंधरा दिवसांनी, म्हणजे ३० एप्रिलअखेरपर्यंत वाढवावी अशी आग्रही मागणी केली. याबाबत केंद्रही अनुकूल असून तशी घोषणाही लवकरच केली जाऊ शकते.

विशेष म्हणजे लॉकडाउन चालू ठेवले तरी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची कामे, शेती, औद्योगिक क्षेत्र आणि मत्स्योद्योगाला यातून विशिष्ट निर्बंध घालून सूट मिळावी अशीही मागणी करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी कोरोना हॉटस्पॉटमध्ये लॉकडाउन कायम ठेवत आणि बाकीच्या ठिकाणी अंशतः यातून सूट द्या अशी विनंती पंतप्रधानांना केली. चार तासांहून जास्त वेळ चाललेल्या आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे, केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि कॅ. अमरिंदरसिंग यांच्यासह अनेक मुख्यमंत्र्यांनी विविध सूचना केल्या. केंद्र आणि राज्य सरकारांनी कोरोनाशी लढण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे परिणाम दिसण्यासाठी तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागेलच, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

लॉकडाउनचे पालन हवे
मोदी म्हणाले की, ‘‘ जान है तो जहान है, असा संदेश मी जेव्हा राष्ट्राच्या नावे प्रथम संबोधन केले तेव्हा दिला होता. पण आता प्रत्येक नागरिकाचे प्राण वाचवायचे असतील तर जान आणि जहान या दोन्हींचेही रक्षण करणे अत्यावश्यक बनले आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाउनचे प्रत्येकाने काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. तसे होईल हे तुम्ही मुख्यमंत्री म्हणून सुनिश्चित करावे.’’

काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई
देशाच्या काही भागांत डॉक्टर आणि पोलिसांवर झालेले हल्ले तसेच जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतीय राज्यांतील विद्यार्थ्यांवरील हल्ले निषेधार्ह आहेत असे सांगताना पंतप्रधानांनी औषधांचा पुरेसा साठा असल्याचेही स्पष्ट केले. जर औषधे किंवा मास्कचा काळाबाजार आणि साठेबाजी करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही मोदींनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com