If the Shivsena-BJP fights together, the Congress-NCP will scare, says CM fadanvis | Sarkarnama

शिवसेना-भाजप एकत्र लढल्यास कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकेल - मुख्यमंत्री

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 डिसेंबर 2018

आगामी निवडणुकीत मतांमध्ये विभागणी होऊ नये, यासाठी शिवसेना-भाजपची युती व्हायला हवी, असे सांगतानाच शिवसेनेशी युती करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आम्ही एकत्र लढलो तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पायाखालची जमीन सरकेल, असे भाकित त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात वर्तविले. 

मुंबई  : आगामी निवडणुकीत मतांमध्ये विभागणी होऊ नये, यासाठी शिवसेना-भाजपची युती व्हायला हवी, असे सांगतानाच शिवसेनेशी युती करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आम्ही एकत्र लढलो तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पायाखालची जमीन सरकेल, असे भाकित त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात वर्तविले. 

फडणवीस म्हणाले, ""गेल्या चार वर्षांत झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप सातत्याने पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. आगामी निवडणुकीत मतांमध्ये विभागणी होऊ नये, यासाठी शिवसेना-भाजपची युती व्हायला हवी. आम्ही दोन्ही पक्ष वेगळे लढलो तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला याचा फायदा होईल. राजकारणात आम्ही वेगवेगळे पक्ष आहोत, आम्ही भाऊ आहोत. त्यात मोठा कोण आणि लहान कोण हे माध्यमांनी ठरवावे; मात्र येणाऱ्या निवडणुकीत आम्ही एकत्र लढणार असून, युती करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ.'' 

धनगर आरक्षणासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, की धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठीची शिफारस अंतिम टप्प्यात आहे. लवकरच केंद्र सरकार याबाबत निर्णय घेईल. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगरांना आरक्षण देण्याची शिफारस केली जाईल असे सांगून, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कोणत्याही समाजाचे असो सर्वांना पुढे घेऊन जाणार आहोत असेही त्यांनी सांगितले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत असेही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीससंदर्भात बोलताना ते म्हणाले, की माझ्यावरील सगळे गुन्हे हे राजकीय असून इतर कोणतेही गुन्हे नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचा वापर करून बदनामीचा प्रयत्न केला तरी सत्य लोकांसमोर येणार आहे. 

सरकार आमचेच येणार 
तीन राज्यांत भाजपला मिळालेल्या अपयशाबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, की जनतेचा भाजपवर विश्वास आहे. देशात नरेंद्र सरकार आणि राज्यात आमचे सरकार नक्की येणार आहे. छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसने मोठ्या प्रमाणात खोटी आश्वासने दिली, तर मध्य प्रदेशात कॉंग्रेसपेक्षा भाजपला जास्त मते मिळाली आहेत. देशात कॉंग्रेसची लाट वगैरे काही नाही. मध्य प्रदेशात भाजपला निसटता पराभव सहन करावा लागला. राजस्थानमध्येही भाजप आणि कॉंग्रेसच्या मतदानात किंचित फरक असल्याचे स्पष्ट करतानाच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळतील. 2019 मध्ये केंद्रात मोदींचा आणि राज्यात माझा चेहरा राहणार असेही ते म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख