`राजा व्यापारी झाल्यास जनता भिकारी`

....
chandrarao-taware
chandrarao-taware

सोमेश्वरनगर : "चुकीच्या पद्धतीने खरेदी-विक्री, ऊस नसताना नेतृत्वाने कारखाने देणे, यामुळे कारखाने अडचणीत आले. बेसुमार कर्ज वाढवायचे आणि प्रचंड सरकारी कर दाखवून कारखाना बंद पाडायचा. प्रमुख मंडळींनीच ते नातेवाइकांच्या नावावर नाममात्र भावात खरेदी केले. राजेमंडळीच खासगी कारखाने काढताहेत. राजा व्यापारी होतो, तेव्हा जनता भिकारी व्हायला वेळ लागत नाही,'' असे मत ज्येष्ठ नेते चंदरराव तावरे यांनी व्यक्त केले.

दरम्यान, ""टप्प्याटप्प्याने एफआरपी देण्याचा आणि प्राप्तिकराचे भूत उतरविण्याचा निर्णय सरकारने घ्यावा,'' असेही ते म्हणाले. येथील मु. सा. काकडे महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वाणिज्य, गुणवत्ता सुधार योजना विभाग यांच्या वतीने "महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीपुढील आव्हाने व उपाययोजना' या विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते सतीश काकडे होते.

या प्रसंगी "सोमेश्वर'चे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, "माळेगाव'चे उपाध्यक्ष चिंतामणी नवले, वीरसिंह तावरे, रूपचंद शेंडकर, दिग्विजय जगताप, बाळासाहेब जगताप, प्रा. जयवंत घोरपडे उपस्थित होते.

"हार्वेस्टर खरेदीस पुन्हा अनुदान द्यावे. कारखान्याच्या प्रदूषणावर सरकारने ठोस संशोधन करून मार्गदर्शन करावे. पाच वर्षांत ऊस घालणे, लेखापरीक्षक नेमण्याचा अधिकार कारखान्याला देणे, या 97व्या घटनादुरुस्तीच्या खासगीला अनुकूल असणाऱ्या नियमात बदल करावा,'' असेही तावरे म्हणाले.

"माळेगाव'चे अध्यक्ष रंजन तावरे म्हणाले, "अनावश्‍यक कामगारभरती व खरेदी बंद करणे, ऑनलाइन खरेदी-विक्री करणे, असे कठोर निर्णय घेतले; तरच कारखाने टिकतील. आम्ही खरेदीत बचत केल्याने 176 रुपये प्रतिटन भाव जादा दिला.

एफआरपीबाबत मतभिन्नता
साखर गोदामात यायच्या आत एकरकमी एफआरपी कशी द्यायची? एफआरपीसाठी कर्ज काढल्यावर शेतकऱ्यांनाच भरमसाट व्याज भरावे लागते. गुजरातप्रमाणे टप्प्याटप्प्याने एफआरपी दिली, तर अंतिम भाव वाढेल, असे मत चंदरराव तावरे यांनी मांडले. पृथ्वीराज जाचक यांनी, पैशाची खात्री असेल तरच शेतकरी हे ऐकतील, असे मत मांडले. तर सतीश काकडे यांनी, अडचणीतल्यांनी कारखाना मोडून एफआरपी द्यावी, असे म्हणणे नाही; पण सक्षम कारखान्यांनी दिलीच पाहिजे, असे मत मांडले.

"...तर हिंदुस्थान सोडून जाऊ'
""खासगी कारखाना असणाऱ्याने सहकारी कारखान्यांवर पाऊल टाकणार नाही, असे ठरवावे. खासगीच्या अतिक्रमणामुळे सहकाराचे कसे अहित झाले आहे, यावर समोरासमोर चर्चा करण्याची आपली तयारी आहे. या चर्चेत हरलो तर हिंदुस्थान सोडून जाऊ,'' असे आव्हान साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी दिले.

प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अच्युत शिंदे, प्रा. राणी शेंडकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रवीण ताटे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com