खडसेंनी भाजप सोडल्यानंतर खासदार रक्षाताई आणि घरातील इतर पदांचे काय?

खडसेंनी राष्ट्रवादीत जाण्याचा मनोमन निर्णय केला असला तरी इतर प्रश्नांचीही उत्तरे त्यांना द्यावी लागणार आहेत.
eknath khadse-raksha khadse
eknath khadse-raksha khadse

जळगाव : विविध आरोपांमुळे 2016 मध्ये युती सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून आजपर्यंत भाजपवर ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे नाराज आहेत. पक्ष सोडण्याची अधिकृत भूमिका त्यांनी जाहीर केली नसली, तरी "मला गृहीत धरू नका' असे सांगत पक्षांतराचे संकेत दिले आहेत. मात्र, पक्षांतर करताना ते शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधता, की राष्ट्रवादीचे "घड्याळ' याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या समर्थकांमध्येही याबाबत वेगवेगळे मतप्रवाह दिसून येत आहेत.

महाआघाडीतील सेना, राष्ट्रवादीसह कॉंग्रेस अशा तीनही पक्षांची खडसेंना "ऑफर' आहे. परंतु, खडसे स्वतः यापैकी शिवसेना किंवा राष्ट्रवादीचा पर्याय स्वीकारण्याच्या मानसिकतेत आहेत. अर्थात, या क्षणापर्यंत तरी खडसेंनी अधिकृतपणे भाजप सोडण्याची घोषणा केलेली नाही आणि सेना की राष्ट्रवादी, यापैकी कोणत्याही पर्यायाचा खुलासा त्यांनी केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराबाबत राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे.

अशा स्थितीत खडसेंचा स्वभाव, आतापर्यंतची राजकीय कारकीर्द, समर्थकांची भूमिका, आगामी काळातील राजकीय वाटचाल, मतदारसंघातील समीकरणं आदी बाबींचा विचार केला, तर ते सेना व राष्ट्रवादीपैकी कोणता पर्याय स्वीकारू शकता, अथवा कोणता पर्याय स्वीकारल्यास कशा शक्‍यता निर्माण होतील, याचे हे सर्वसाधारण विश्‍लेषण...

तीन पर्याय आहेत.. ते असे
1) भाजपतच राहणार?
जे घर एकेक वीट रचून बांधले, ते कसे सोडणार? असे खडसे नेहमी सांगत आले आहेत. अगदी, जनसंघापासून ते भाजपत आहेत. पक्षानेच त्यांना आमदारकी, युती शासनाच्या काळात मंत्रिपद, नंतर विधिमंडळातील गटनेतेपद, विरोधी पक्षनेतेपद व फडणवीस सरकारमध्ये 12 खात्यांचे मंत्रिपदही दिले. स्नुषा श्रीमती रक्षा यांना दुसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी दिली, त्या पक्षाच्या खासदार आहेत. जिल्हा बॅंकेत कन्या रोहिणी अध्यक्षा, दूध संघात व "महानंद'वर पत्नी मंदाताई खडसे अध्यक्षा आहेत. शिवाय, अन्य पक्षांच्या "ऑफर' असताना ऐन निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतरही पक्ष सोडला नाही आणि आता सरकार गेल्यानंतर लगेच पक्षांतर केले, अशी टीकाही त्यांच्यावर होऊ शकते. त्यामुळे, पक्षाने डावलले ही भावना खरी असली, तरी अशा स्थितीत पक्ष सोडताना त्यांना या बाबींचा विचार करावा लागेल.

2) शिवसेनेचा पर्याय
श्री. खडसे स्वतः अभ्यासू व आक्रमक तसेच लोकनेते आहेत. खडसेंच्या तोडीचा नेता आज सेनेत नाही. त्यामुळे सेनेत गेल्यास उद्धव ठाकरेंनंतर मास लीडर म्हणून खडसेंचाच लौकिक राहील. गेली 40 वर्षे ज्या विचारधारेच्या पक्षात ते होते, ती विचारधारा कायम राहील. त्यांचे समर्थक व कार्यकर्तेही हिंदुत्ववादी विचारधारेचे असल्याने त्यांनाही अडचण येणार नाही. सेनेकडे खडसेंइतका अभ्यासू, आक्रमक नेता नसल्याने सेनेलाही उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात फायदा होईल. येत्या काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये बिनसले आणि भाजप-सेना पुन्हा एकत्र आले, तरी खडसेंचे नुकसान होणार नाही. मुक्ताईनगरात खडसेंचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमदार चंद्रकांत पाटील यांना अप्रत्यक्ष शह बसून भविष्यात मुक्ताईनगर किंवा रावेर या मतदारसंघांतून खडसे विधानसभेसाठी पुन्हा सज्ज होऊ शकतील.

3) राष्ट्रवादीचा पर्याय
राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांशी खडसेंचे निकटचे संबंध आहेत. शरद पवारांनाही उत्तर महाराष्ट्रात पक्षाची मोट मजबूत करण्यासाठी लोकनेत्याची गरज आहे, ती खडसेंच्या रूपाने पूर्ण होईल. कृषिक्षेत्राचा चांगला अभ्यास असल्याने खडसेंबद्दल थोरल्या पवारांनाही आत्मीयता आहे, ती जमेची बाजू असेल. मुक्ताईनगर मतदारसंघातील जातीय समीकरणामुळेच यावेळी रोहिणी खडसेंचा पराभव झाला. राष्ट्रवादीत प्रवेशानंतर हा मराठाबहुल मतदारसंघ खडसेंसाठी कायमस्वरूपी फायद्याचा ठरू शकेल. खडसेंचे समर्थक अनिल गोटे याआधीच राष्ट्रवादीत गेले आहेत. खानदेशातील त्यांचे अन्य समर्थक आमदार, माजी आमदारही हा पर्याय सहज स्वीकारू शकतील. अर्थात, राष्ट्रवादीत पवारांनंतरही वरच्या फळीतील नेत्यांची यादी मोठी असल्याने त्यात खडसेंना "ऍडजेस्ट' व्हावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com