devendra-fadanvis
devendra-fadanvis

आज देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सूत्रे असती तर...

एकाद्या संकटाच्या वेळी अमुक नेता असता तर त्याने कशी स्थिती हाताळली असती, अशी चर्चा जनमानसांत असते .आज फडणवीस मुख्यमंत्री असते तर काय झाले असते, असा प्रश्नही अनेकांच्या मनात आहे. त्याचे उत्तर या निमित्ताने अनेकांशी चर्चा केल्यानंतर मिळते.

सातारा : कोरोना विषाणूच्या संकटाने संपूर्ण जग हादरून गेले आहे. आज प्रत्येक देश या संकटाशी मुकाबला करण्यासाठी परखड पावले उचलू लागला आहे. यामध्ये भारत देशही मागे नाही. पंतप्रधानांनी नुकतीच लॉकडाऊनची घोषणा केली. या घोषणेला प्रतिसाद देत देशातील सर्व राज्यांतील व्यवहार बंद ठेऊन संसर्ग टाळण्यावर भर दिला आहे. यामध्ये महाराष्ट्रही मागे नाही. पण आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर त्यांनी नेमके काय केले असते, असा प्रश्न आज अनेकांच्या मनात घोळत आहे.

फडणवीस हे राज्याचे तरुण मुख्यमंत्री होते. सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहणाऱ्यांमध्ये ते केवळ दुसरे नेते होते. हे पदच असे असते की त्याने माणूस पाॅवरफुल्ल असतो. प्रत्येक नेत्याला त्याच्या कारकिर्दीत संकटांशी सामना करावा लागतो. त्यावरून त्या नेत्याची परीक्षा होत असते. आज शरद पवार मुख्यमंत्री असते तर किंवा फडणवीस मुख्यमंत्री असते तर काय झाले असते, असा प्रश्न जनमाणसांत चर्चेत असतो. त्याचे उत्तर या निमित्ताने अनेकांशी चर्चा केल्यानंतर मिळते. 

भाजप कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार तातडीने निर्णय घेण्याची क्षमता आणि घेतलेल्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी हे त्यांचे सूत्र पक्षात आणि सामाजिक कामातही पहायला मिळाले होते. तेच सूत्र त्यांनी कोरोना साथीशी दोन हात करताना वापरले असते. आजच्या परिस्थितीशी मुकाबाला करताना त्यांनी अनेक धाडसी निर्णय अगदी सहज घेतले असते. पोलिस, आरोग्य विभाग आणि महसूल प्रशासनाच्या मदतीने सरकार जनतेच्या आरोग्यासाठी झटत आहे. पण तरीही फडणवीस यांनी वेळेच्या आधीच काही पावले उचलली असती, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे पडले. 

तसेच केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने त्यांनी केंद्राकडूनही महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्यासाठी मोठ्याप्रमाणात निधी व इतर मदत उपलब्ध करून घेतली असती. सर्वात महत्वाचे म्हणजे ते स्वतः शहरीसह ग्रामीण भागापर्यंत जाऊन जनतेत जागृती करण्यासोबतच जनतेला धीर देण्याचे काम केले असते. थोडे कटू पण चांगले निर्णय घेतले गेल्याने महाराष्ट्रातील जनतेलाही या आणिबाणीच्या काळात थोडा अधिक दिलासा मिळाला असता.

तसेच आपल्या सोबत असलेल्या पक्षातील प्रत्येकाला ते काम करण्याची संधी देत होते. त्यानुसार कोरोनाशी दोन हात करताना त्यांनी भाजपचा प्रदेशाध्यक्ष ते बुथ प्रमुखांपर्यंत सर्वांना यामध्ये सहभागी करून घेतले असते. तसेच प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या पाठीवर हात ठेऊन त्यांना अधिक ताकतीने लोकांपर्यंत जाऊन प्रशासनही तुमच्यासोबत आहे, याची जाणीव करून द्यायला लावले असते. भारतीय जनता पक्षाचे विविध विभाग तसेच सामाजिक क्षेत्राशी संलग्न असलेल्या विविध संस्थांच्या माध्यमातून थेट जनतेपर्यंत सुसंवाद साधून कोरोना साथीच्या कठीण प्रसंगी त्यांनी सर्वसामा्न्य जनतेला मदतीचा हात देण्यासोबतच त्यांना धीर देण्याचे काम केले असते. तातडीने निर्णय घेण्याची क्षमता आणि घेतलेल्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी हे त्यांचे सूत्र पक्षात आणि सामाजिक कामातही पहायला मिळेत. तेच सूत्र त्यांनी कोरोना साथीशी दोन हात करताना वापरले असते.

गृहमंत्रीपदही त्यांच्याकडेच होते. त्यामुळे पोलिसांनाही त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करताना कोणालाही त्रास होणार नाही. याची दखल घेण्यास मात्र, निश्चित लावले असते. ते मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना पोलिसांकडून राज्यभरातील जनतेला कधीही त्रास झाला नव्हता. त्यामुळे आजच्या परिस्थिती जमाव व संचारबंदीत त्यांनी पोलिस प्रशासनाकडून अत्यंत कुशलतेने काम करून घेतले असते. त्यासाठी त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ही सहकार्य मिळाले असते.  केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने दोन्ही बाजूनी मदतीचा ओघ महाराष्ट्राला मिळाला असता. त्यातून या बंदच्या काळात सर्वसामान्य व गोरगरिब नागरीकांचे झालेले नुकसानीची ही भरपाई त्यांनी केली असती.

त्यांच्यातील महत्वाचा गुणधर्म म्हणजे ते दिलेला शब्द पाळतात. त्यांनी आपत्कालिन परिस्थितीत सर्वसामान्य जनता, उद्योजक, शेतकरी आणि कामगार यांना दिलेला शब्द त्यांनी तातडीने पाळून त्यांना आर्थिक मदतीचा हातभारही लावला असता. आज ते मुख्यमंत्री नाहीत पण प्रभावी विरोधीपक्ष नेता म्हणून ते आजही कर्तव्य बजावत आहेत. सध्याच्या परिस्थितीत जनतेसह सध्या महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या सरकारलाही ते साथ देण्याचे काम करत आहे. आजच्या घडीला सर्वांनीच एकमेकाला साथ देत कोरोनाविरोधातील लढाई जिंकायची आहे.

त्यामुळे त्यांनी विरोधकाची भुमिका थोडी बाजूला ठेऊन त्यांनी महाविकास आघाडीला काम करण्याची व कोरोना विरोधात सक्षमतेने लढा देण्याची मोकळीक दिली आहे. त्यामुळे सध्याचे सरकारही कोणतीही शंका मनात न ठेवता पोलिस, आरोग्य विभाग आणि महसूल प्रशासनाच्या मदतीने जनतेच्या आरोग्यासाठी झटताना दिसत आहेत. पण तरीही देवेंद्र फडणवीस यांच्या कार्य पध्दतीची आज भाजपच्या कार्यकर्त्यांसह व महाराष्ट्रातील जनतेला आठवण होत आहे.

विरोधी पक्षनेता म्हणून तितकेच प्रभावी- मदन भोसले, (माजी आमदार)

मदन भोसले म्हणाले, ``जागतिक पातळीवर देशात, महाराष्ट्रात कोविड 19 मुळे परिस्थिती गंभीर आहे. अन्य देशांना ती हाताळण्यास उशीर झाला त्याचे परिणाम पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार यांनी एकूणच अन्य देशांचे पूर्वानुभव लक्षात घेता जे तत्परतेने करणे गरजेचे आहे ते निश्चितच केले आहे. त्याला अनुसरून राज्य पातळीवरील विद्यमान सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील सर्व सदस्य विशेष करून आरोग्यमंत्री राजेश टोपे हेही तेवढ्याच गांभीर्याने हा प्रश्न हाताळताना दिसत आहेत. तसेच देवेन्द्रजी यांच्याकडे दूरदर्शीपणा आणि अचुकपणा, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता आहे. मात्र आता ते मुख्यमंत्री नसल्याने मुख्यमंत्रीपदाचे अधिकार राबवता येत नसले तरी प्रभावी विरोधी पक्षनेता म्हणून ते आजही कर्तव्य बजावताना दिसत आहेत. आता खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे ती आपल्यातील प्रत्येकाची. या संकटाला परतावून लावण्याचं आपल्याकडे उपलब्ध असलेलं लॉकआउट, गर्दी न करणे आणि कोरोनाची साखळी तोडणे हा एकमेव प्रभावी उपाय आहे.``

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com