अजित पवारांनी येथील उमेदवार वेळीच बदलला नसता तर..?

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे खाते पुन्हा उघडले...
अजित पवारांनी येथील उमेदवार वेळीच बदलला नसता तर..?

पिंपरीः शिवसेनेने भाकरी न फिरविल्यामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर, राष्ट्रवादीने ती फिरवित ऐनवेळी उमेदवार बदलल्याने त्यांचा विजय झाला. मतदारसंघावर नसलेली पकड आणि वैयक्तिक करिष्म्याचा अभाव या बाबीही शिवसेनेचे आमदार उमेदवार गौतम चाबूकस्वार यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्या.
उमेदवाराऐवजी पक्ष म्हणून राष्ट्रवादीचा येथे विजय झाला आहे.

पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ४१ हजाराचे लीड देणाऱ्या पिंपरीतील पक्षाचा उमेदवाराचा विधानसभेला पराभव हा शिवसेनाच नव्हे,तर या पक्षाचे मावळचे खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांच्याही जिव्हारी लागणारा असाच आहे. त्यामुळे शहरातील तीनपैकी एक आमदार असलेल्या शिवसेनेच्या हाती आता भोपळा आला असून राष्ट्रवादीने पुन्हा खाते खोलले आहे.

शहरात तीनपैकी पिंपरीतच फक्त आघाडी विरुद्ध युती अशी थेट लढत झाली. त्यात आघाडीचे उमेदवार व माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी १९,६१८ मतांनी विजय मिळवला. गतवेळी त्यांचा चाबूकस्वारांनीच २,३३५ मतांनी निसटता पराभव केला होता. त्याचे उट्टे त्यांनी लगेच काढले. मात्र, त्यासाठी अजितदादा पवार यांची ऐनवेळची अनुभवी चाल कामी पडली.

प्रथम येथे राष्ट्रवादीने नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांना उमेदवारी दिली होती.त्यांनी अर्जही भरला होता.ऐनवेळी अजितदादांनी ती फिरवून अनुभवी अण्णांना ती दिली. धर या साम, दाम, दंड,भेद यात कमी पडण्याची शक्यता असल्याने  त्यांच्याऐवजी त्यात वरचढ असलेल्या अण्णांना उमेदवारी देण्यात आली. तेथेच एकतर्फी होऊ घातलेली लढत चुरशीची झाली.

चाबूकस्वार राहत असलेल्या पिंपरी कॅम्प भागातील मतेही त्यांना आपल्याकडे वळविता आली नाहीत. तेथील बहूतांश सिंधी मते राष्ट्रवादीचे नगरसेवक व माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांनी अण्णांकडे वळविल्याने राष्ट्रवादीच्या विजयात हातभार लागला गेला. भाजपने या मतदारसंघावर दावा केला होता. मात्र, तो मागे घेताना किमान उमेदवार बदला, असा आग्रह त्यांनी धरला होता. मात्र, तो मान्य न झाल्याचा फटका त्यांना बसला.युतीमुळे सहज विजयी होऊ, या भ्रमात राहिल्याचा दणकाही चाबूकस्वारांना बसला.त्यात वंचित व भाजपच्या बंडखोराने काही हजार मते खाल्याने त्यांचा पाय आणखी खोलात गेला. शहरातील भोसरी व चिंचवड या इतर दोन मतदारसंघांच्या तुलनेत कमी झालेले मतदान सुद्धा शिवसेनेच्या पराभवास कारणीभूत ठरले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com