अजित पवार यांनी हेच आश्वासन दहा दिवसांपूर्वी दिलं असतं तर....

इंदापूरच्या जागेवरून दोन्ही काॅंग्रेसमध्ये वाद सुरू झाले आहेत. नक्की कोण काय भूमिका मांडतय, याचा घोळ काही संपत नाही. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हा तोडगा काढण्यासाठी चांगला पर्याय आज जाहीर केला. मग त्यांनी तो आधी का सांगितला नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अजित पवार यांनी हेच आश्वासन दहा दिवसांपूर्वी दिलं असतं तर....

सोमेश्वरनगर : दोन्ही पक्षाचे सर्वोच्च नेते जो निर्णय घेतील तो शिरसंवाद्य मानेन असा शब्द मी लोकसभेवेळी हर्षवर्धन पाटलांना भेटून दिला होता. आजही त्यावर ठाम आहे. परवा मेळावा झाल्यावर त्यांना पन्नास फोन केले. पृथ्वीराज चव्हाणांनीही त्यांना 'थांबा' सांगितले. एकाला विधानसभा आणि दुसऱ्याला विधानपरिषद असा मार्ग काढत होतो. परंतु ह्यांचा निर्णय आधीच झाला होता फक्त पावत्या आमच्या नावाने फाडत आहेत, असा गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. तसेच विनाकारण समाजात गैरसमज पसरवून बदनाम करू नये, असा इशाराही दिला.

इंदापूरच्या जागेवर तोडगा काढण्यासाठी अजितदादा इतके प्रयत्नशील होते तर त्यांनी तसे दहा दिवसांपूर्वीच का सांगितले नाही, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एकाला विधानसभा आणि दुसऱ्याला विधान परिषद असा मार्ग निघणे शक्य होते. मात्र तो निरोप हर्षवर्धन यांच्याकडे पोहोचला की नाही किंवा पोहोचूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, यावरही आता विविध अंदाज बांधले जात आहेत. 

सोमेश्वरनगर (ता. बारामती जि. पुणे) येथे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात पवार यांनी इंदापूर तालुक्यातील विधानसभा उमेदवारीच्या वादग्रस्त प्रश्नावरून प्रथमच मौन सोडले. त्यांनी प्रथमच इंदापूरच्या उमेदवारीचा सगळा इतिहासच उलगडला आणि हर्षवर्धन पाटील गैरसमज पसरवत असल्याचा दावा केला.

ते म्हणाले, ``लोकसभेला मी स्वतः हर्षवर्धन पाटलांच्या घरी गेलो. पृथ्वीराज चव्हाणांसह अनेक नेते तिथं होते. पाटलांनी आघाडीधर्म पाळतो पण विधानसभेला मला मतदारसंघ द्या असे सांगितले. त्यावेळी मी मी सर्वांसमोर स्पष्ट सांगितले, राहुलजी गांधी आणि पवारसाहेब जो निर्णय घेतील तो शिरसंवाद्य! परवाच्या मेळाव्यात ते साहेब, सुप्रिया व 
माझ्याबद्दल बोलताना राष्ट्रवादी शब्द पाळत नाही असं चुकीचं बोलले. आजही सर्वोच्च नेते जो निर्णय घेतील तोच मान्य असेल. दिलेला शब्द मी पाळतो.``

मेळाव्यानंतर मी त्यांना पन्नास पंचावन्न फोन केले. स्वतः त्यांच्या पुण्याच्या घरी गेलो पण ते भेटले नाहीत. परवा काँग्रेसच्या सर्व नेत्यांना हे मी दाखवलं. त्यांनी त्यांचा निर्णय घेतला होता फक्त आपल्या नावाने पावत्या फाडत आहेत. त्यांनी विनाकारण गैरसमज पसरवू नये. राजकीय मतभेद आहेत पण आम्ही काही बांध रेटलेला नाही. परवा सोनियाजी गांधी आणि पवारसाहेब यांची बैठक झाली. पृथ्वीराज चव्हाणही पाटलांना थांबा मार्ग काढतोय असे म्हणाले. संधी मिळेल त्याला विधानसभेवर घेऊ आणि दुसऱ्याला विधानपरिषदेवर घेऊ असा मार्ग निघत होता. दत्ता भरणेंवर तरी अन्याय कशाला,असा सवाल त्यांनी केला.

आदेश अंकितासाठीच

पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या विषय समितीच्या निवडीसाठी दोन्ही उमेदवार काँग्रेसचेच होते. ती पहिली बैठक तहकूब झाली. परवाच्या बैठकीवेळी राष्ट्रवादीची सगळी मतं अंकिताच्या मागे उभी करा, असे आदेश मी विश्वास देवकाते यांना दिले होते. आजीची जागा नातीला मिळावी ही इच्छा. मात्र, अंकिताने अर्ज काढून घेतला मग दुसऱ्या उमेदवारानेही अर्ज काढला. अंकिताला अखिल भारतीय साखर संघाच्या पदावर तर हर्षवर्धन पाटलांना व्हीएसआय, साखरसंघ यात साहेबांनी घेतलं आहे, असेही पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com