सातारा जिल्हाधिकारीपदी केलेल्या कामाचा अनुभव नेहमीच मार्गदर्शक - IAS shweta singhal about satara district | Politics Marathi News - Sarkarnama

सातारा जिल्हाधिकारीपदी केलेल्या कामाचा अनुभव नेहमीच मार्गदर्शक

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीबरोबरच लोकसभेची पोट निवडणूक झाली. श्वेता सिंघल यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे या दोन्ही निवडणुका उत्कृष्टपद्धतीने व पारदर्शक पार पडल्या.

सातारा : दुष्काळ, पुरपरस्थिती व विधानसभा निवडणुकीबरोबर लोकसभा निवडणुकीचे काम सर्वांच्या सहकार्याने खूप चांगले करता आले याचा अभिमान असून सातारा जिल्हाधिकारीपदी केलेल्या कामाचा अनुभव नेहमीच मार्गदर्शक राहील, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त (पुणे महसूल विभाग) श्वेता सिंघल यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज माजी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचा निरोप समारंभ अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. या निरोप समारंभाला निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हाधिकारी (महसूल) विद्युत वरखेडकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी समिक्षा चंद्राकार, उपजिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

श्वेता सिंघल म्हणाल्या, 33 महिन्याच्या कार्यकाळात सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची माझी नेहमीच भूमिका राहिली. शासनाच्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी लोकप्रतिनिधींबरोबर अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. जिल्ह्यातील पुनर्वसनाचा प्रश्नीही मार्गी लागला असून आज माण व खटाव तालुक्यातील कॅनॉलद्वारे पाणी पोहचले आहे यासह जिल्ह्यातील अनेक कामे मार्गी लागली आहेत.  

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीबरोबरच लोकसभेची पोट निवडणूक झाली. श्वेता सिंघल यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे या दोन्ही निवडणुका उत्कृष्टपद्धतीने व पारदर्शक पार पडल्या. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाचे चांगले काम करुन या योजनेच्या अंमलबजावणीत जिल्हा अग्रेसर ठेवला. दुष्काळ व पुरपरिस्थितीतही मार्गदर्शनामुळे चांगल्या प्रकारे काम करता आले, असे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.

तत्कालिन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या. जलयुक्त शिवार योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून सातारा जिल्हा महाराष्ट्रात क्रमांक 1 वर राहिला आहे. पाणी फाऊडेशनच्या कामात स्वत: श्रमदान करुन लोकांना प्रोत्साहित केले. प्रत्येक कामामध्ये तत्कालिन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचे मार्गदर्शन राहिले भविष्यातही त्यांचे असेच मार्गदर्शन होईल, असा विश्वास कोरेगाव प्रांताधिकारी किर्ती नलावडे यांनी व्यक्त केला.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख