प्रभावशाली अधिकारी : आयएएस ओम प्रकाश बकोरिया महावितरणचे जॉईन्ट एम. डी . - IAS Om Prakash Bakoria Jt MD Mahavitaran | Politics Marathi News - Sarkarnama

प्रभावशाली अधिकारी : आयएएस ओम प्रकाश बकोरिया महावितरणचे जॉईन्ट एम. डी .

जगदीश पानसरे :सरकारनामा ब्युरो
शनिवार, 30 डिसेंबर 2017

महाराष्ट्रात 2017 मध्ये शासकीय सेवेतील काही आय.ए.एस. आणि आय.पी.एस. अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात कतृत्वाची मोहोर उमटवली आहे. सर्वसामान्यांचे जीवन सुकर व्हावे, जनतेच्या पैश्याचा चांगलाच वापर व्हावा, कायद्याचा वचक रहावा, नियम कायदे सर्वांसाठी समान रहावेत, यासाठी धडपडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मावळत्या वर्षातील कामगिरीचा हा आढावा.....

वीजचोरी, गळतीवर बकोरियांचा 'सर्जिकल स्ट्राईक' ;अबतक 136...

औरंगाबाद :  महावितरणचे प्रादेशिक सह व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांची राज्य शासनाने मराठवाडा विभागातील वीजचोरी आणि वीज गळती रोखण्यासाठी खास नियुक्ती केली आहे.

 15 हजार 594 कोटींची थकबाकी आणि 2 हजार 407 कोटीची वीज गळती रोखण्याचे आव्हान घेऊन महावितरणमध्ये दाखल झालेल्या बकोरियांनी एका प्रकारे सर्जिकल स्ट्राईक करत वीजचोरीला लगाम घालण्यास सुरुवात केली आहे. 

पुणे, औरंगाबाद, अकोला आणि पुन्हा औरंगाबाद असा ओमप्रकाश बकोरिया यांच्या प्रशासकीय सेवेचा प्रवास राहिला. पुणे व औरंगाबाद महापालिकेत बकोरिया यांनी धडाकेबाज काम करत गैरव्यवहार, कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारवाईचा शॉक दिला आहे. 

औरंगाबाद विभागातील मराठवाडा आणि खान्देशातील अशा अकरा जिल्ह्यांमध्ये वीज वितरण आणि वसुलीच्या बाबतीत मोठ्या अडचणी होत्या. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाने औरंगाबाद येथे प्रादेशिक सह व्यवस्थापकीय संचालक हे विशेष पद निर्माण करून त्यावर ओम प्रकाश बकोरिया यांची नियुक्ती केली. 

औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त असतांना समांतर जलवाहिनी योजनेतील गैर व्यवहारासह रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचार प्रकरणात त्यांनी अनेक बड्या अधिकाऱ्यांना निलंबित केले होते.

समांतर जलवाहिनी योजना रद्द करण्याचा धडाकेबाज निर्णय देखील बकोरिया यांनी घेतला होता. 26 फेब्रुवारी 2016 ते 24 एप्रिल 2017 या चौदा महिन्याच्या कार्यकाळात बकोरिया यांनी महापालिके संदर्भात अनेक महत्वाचे निर्णय घेतले होते. 

औरंगाबाद येथून बकोरिया यांची 2 मे 2017 रोजी अकोला येथे महाबीज मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी बदली करण्यात आली होती. परंतु 27 दिवसांतच बकोरिया यांना पुन्हा औरंगाबाद येथे महावितरणमध्ये पाचारण करण्यात आले. 

कामाचा धडाका सुरु 
 
29 मे रोजी बकोरिया यांनी महावितरणचा पदभार हाती घेतला. तेव्हा वीजगळती रोखून थकीत बीलांची वसुली करण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर होते. 15 हजार 594 कोटींची थकबाकी आणि 2 हजार 407 कोटींची वीज गळती रोखण्यासाठी बकोरियांना ऍक्‍शन प्लान तयार केला. 

जनरेशन कडून खरेदी केलेली बहुतांश वीज ग्राहकांपर्यंत पोचवण्याचे उदिष्ट घेऊन बकोरिया कामाला लागले. लाईनमनपासून इंजिनिअर पर्यंत सगळ्यांना या मोहिमेत सहभागी करून घेतले. जानेवारी 2017 ते ऑक्‍टोबर 2017 अखेरपर्यत औरंगाबाद विभागात 7373 (एमयुएस) वीजे पैकी 57 टक्के वीज विक्री करण्यात महावितरणला यश आले आहे. अद्याप 43 टक्के वीज विक्रीचे उदिष्ट साध्य व्हायचे आहे. या शिवाय जून ते डिसेंबर या सहा महिन्यात विभागात एक लाखावर नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. 

अचूक रिडिंगवर भर 

कंपनीकडून विकण्यात आलेली वीज आणि त्याचे अचूक बिलिंग होण्यासाठी बकोरिया यांनी या पध्दतीत बरेच बदल केले. मीटर रिडींगची मॅन्युअल पध्दत पुर्णपणे बंद करण्यात आल्यामुळे खाजगी एजन्सीकडून घेण्यात येणाऱ्या मीटर रिडिंगवरच बील तयार केले जाते. या संदर्भात तक्रारी वाढल्यामुळे पाच टक्के रिडिंगची अचानक तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यातून रिंडिगचे प्रमाण 80 टक्‍यांवर तर पोहचले पण त्यातील चुका देखील घटल्या. 

कर्मशियल मीटरसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत पीसी झिरो मोहिम राबवण्यात आल्यामुळे कंपनीचे कोट्यावधी रूपये वाचले. 20 के.व्ही. वापर करणाऱ्या मोठ्या ग्राहकांचे रिडिंग एमआरआय, एएमआर मार्फत होऊ लागल्याने लाखोंचे नुकसान टळले. मोबाईल रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून वीज ग्राहकांना थेट एसएमएस द्वारे बील पाठवण्याची व्यवस्था झाली. शेतकरी वगळता विभागातील 78 टक्के वीज ग्राहकांचे मोबाईल रजिस्ट्रेशन करण्यात महावितरणला यश आले आहे. 

अबतक 136... 

महावितरणची वीज चोरी आणि गळती रोखण्यासाठी मला लाईनमनपासून इंजिनिअर सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत लागणार आहे. त्याशिवाय हे काम शक्‍यच नाही. पण कामात हलगर्जीपणा, गैरप्रकार मी कदापी खपवून घेत नाही. त्यामुळे आतापर्यंत विभागातील 136 अधिकारी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करत बकोरिया यांनी सर्जिकल स्ट्राईक केला आहे. हिंगोली येथील अधिक्षक अभियंत्यास जालना जिल्ह्यात 4 कोटी 78 लाखांची महावितरणची कामे केवळ कोटेशन मागवून वाटप केल्या प्रकरणी बकोरिया यांनी आधी निलंबित आणि नंतर बडतर्फ करत दणका दिला. या प्रकरणाची चौकशी सुरु असून अहवालानंतर संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख