तलाठ्यांना `साहेब' म्हणणारे आयएएस अधिकारी बनले मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव

तलाठ्यापासून ते अधिकाऱ्यांपर्यत सर्वांना `साहेब' म्हणून संबोधणारे व्यक्तिमत्व म्हणजे नुकतेच मुख्यमंत्र्यांचे मुख्यसचिव बनलेले विकास खारगे. त्यांची ही आठवण जिल्हा प्रशासनात अजूनही कायम आहे.
तलाठ्यांना `साहेब' म्हणणारे आयएएस अधिकारी बनले मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव

यवतमाळ : साहेब आणि कर्मचारी, यांच्यातील नाते तसे दुराव्याचेच. साहेब हे साहेबच म्हणून कर्मचारीही साहेबांच्या चार हात लांब राहणेच पसंत करतात. कनिष्ठ कर्मचाऱ्यांशी साहेब म्हणून संवाद साधणारे अधिकारी मोजकेच. यातही एखाद्या आयएएस अधिकाऱ्याच्या मुखातून कर्मचाऱ्यासाठी `साहेब' हा शब्द निघणे कठीणच. मात्र, तलाठ्यापासून ते अधिकाऱ्यांपर्यत सर्वांना `साहेब' म्हणून संबोधणारे व्यक्तिमत्व म्हणजे नुकतेच मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव बनलेले विकास खारगे. त्यांची ही आठवण जिल्हा प्रशासनात अजूनही कायम आहे.

प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले अधिकारी म्हणून विकास खारगे यांचा राज्यभरात लौकीक आहे. 1994 च्या बॅचचे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी विकास खारगे 19 नोव्हेंबर 1999 ते 25 सप्टेंबर 2002 या कालावधीत यवतमाळचे जिल्हाधिकारी होते. 

अधिकारी, कर्मचाऱ्यांना एखादा आयएएस अधिकारी लक्षात राहणे तशी दूर्मीळ बाब. मात्र, विकास खारगे यांच्या बाबतीत वेगळा अनुभव अनेकांना आला आहे. त्यांचा मनमिळावू स्वभाव, काम करून घेण्याची हातोटी, प्रशासनातील प्रत्येक गोष्टीचे ज्ञान अशा अनेक बाबींमुळे विकास खारगे आजही अनेकांना आपल्या जवळचे वाटतात. 

जिल्हाधिकारी असताना त्यांनी जिल्ह्यात साक्षरता अभियान प्रभावीपणे राबविले. ही मोहीम कागदोपत्री राहू नये, याची विशेष दखल घेत गाव, खेडे पिंजून काढले. झपाटल्यागत त्यांनी साक्षरता मिशन हाती घेतले. या काळात गावखेड्यांतील नागरिकांपासून तर कोतवाल, तलाठी ते अधिकारी अशा प्रत्येकांसोबत त्यांचा संपर्क आला. त्यांची नम्रतने बोलण्याची पद्धत शिवाय खेळीमेळीत काम करून घेण्याच्या हतोटीची चर्चा आता अनेकांच्या ओठावर आली आहे. काही अधिकाऱ्यांशी त्यांचे मतभेद झाले. मात्र, मनात कोणताही राग, आकस, सुडबुद्धी न ठेवता प्रत्येकासोबत जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आजही कायम आहेत. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये प्रधान सचिव म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्याचे ते सोने करतील, अशी खात्री यवतमाळातील लोकांना आहे.

यवतमाळातील कार्याची पंतप्रधानांकडून दखल
आदिवासीबहुल भाग म्हणून जिल्ह्याची ओळख. यामुळे साक्षरतेचे प्रमाण तसे कमीच. जिल्हाधिकारी असताना विकास खारगे यांनी जिल्ह्यात साक्षरता मोहीमेला गती दिली. त्यांच्या या कार्याची दखल पंतप्रधानांनी घेतली. साक्षरता मोहिम प्रभावीरित्या राबविल्याबद्दल तत्कालीन पंतप्रधानांच्या हस्ते "सत्येन मित्रा' राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

मतभेदांनंतरही दिला उत्कृष्ट शेरा
तत्कालीन जिल्हाधिकारी विकास खारगे यांना काही बाबतीत मी "क्रॉस' केले होते. आयएएस अधिकारी असल्याने अधिकार त्यांच्या हातात होते. मात्र, त्यांनी कधीही आकस भाव मनात ठेवला नाही. उलट माझ्या सेवापुस्तिकेवर चांगला `रिमार्क' दिला. त्यांच्याकडून मी सुद्धा हा गुण आत्मसात केल्याचे त्यांच्या काळात तहसीलदार पदावर काम केलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com