आयएएस, आयपीएस अधिकारी भाजप सरकारला वैतागले : अजित पवार

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारला जनता वैतागली त्याप्रमाणे नोकरशाही देखील त्रस्त झाल्याचा आरोप केला. राष्ट्रवादी काॅंग्रेसने परत सत्तेवर यावे, असे आता अधिकारीच म्हणू लागल्याचा दावा त्यांनी केला.
आयएएस, आयपीएस अधिकारी भाजप सरकारला वैतागले : अजित पवार

बारामती शहर : गुजरातच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत उघडपणे बोलण्यास टाळणारे आयएएस व आयपीएस अधिकारी आता तुम्ही लवकर सत्तेवर या असे आम्हाला महाराष्ट्रात सांगत आहेत. सत्तेत अधिका-यांनाच बदल हवा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची हवा बदलते आहे, याचेच द्योतक म्हणावे लागेल, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बोलून दाखविले.

बारामती तालुक्यातील सरपंच उपसरपंचांच्या सत्कार समारंभात आज ते बोलत होते. त्यांनी या वेळी राज्य व केंद्र सरकारवर टिकेची झोड उठवली. ते म्हणाले, प्रशासनामध्ये अस्वस्थता दिसते आहे. अनेक वरिष्ठ अधिकारी खाजगीत आता तुम्ही लवकर सत्तेवर या असे सांगतात. अधिका-यांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही, मनमानी कारभार सुरु असून राज्याच्या तिजोरीत खडखडाट करण्याचे काम या सरकारने केले.

हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने मराठवाड्यात तर युवकांनी इतका भरभरुन प्रतिसाद दिला, रॅली व मिरवणूकांच्या निमित्ताने लोकांनी सत्ताबदलासाठी आमच्या मागे शक्ती उभी केल्याचे दिसले. पेट्रोल- डिझेलच्या सततच्या किंमतवाढीने आणि एकूणच महागाईने लोक त्रासून गेलेले आहेत. शेतकरी, युवक, महिला, व्यापारी यांच्यासह समाजाचे सर्वच घटक सरकारच्या धोरणावर नाराज आहेत. पुणे व पिंपरी चिंचवडमध्येही आता अस्वस्थता जाणवू लागली आहे. नाना पटोले मध्यंतरी मला भेटले होते तेव्हा त्यांनीही आपली अस्वस्थता बोलून दाखविली. एकनाथ खडसे आणि नारायण राणे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची आज झालेली अवस्था दयनीय आहे. सर्वच आघाड्यांवर हे सरकार अयशस्वी ठरले आहे, असा आरोप त्यांनी केला. 

..तर गुजरातचे चित्र वेगळे असते

संविधान रॅलीच्या निमित्ताने हार्दिक पटेलशी माझे बोलणे झाले असे सांगून अजित पवार म्हणाले, गुजराथमध्ये समविचारी पक्ष एकजूटीने एकत्र आले असते तर आजचे चित्र वेगळे पाहायला मिळाले असते असे हार्दिकने मला सांगितले. अर्थात या निवडणूकीनंतर सगळेच अनेक गोष्टी शिकले आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com