`नगरच्या आदिकांनी काॅंग्रेसला कठिण काळात सत्ता मिळवून दिली होती...मी नगरचाच!`

`नगरच्या आदिकांनी काॅंग्रेसला कठिण काळात सत्ता मिळवून दिली होती...मी नगरचाच!`

मुंबई : ``कॉग्रेससमोर कठीण काळ आहे. मात्र 1978 ते 1980 ला देखील कठीण काळ असताना प्रदेशाध्याक्ष रामराव आदिक यांनी कॉग्रेसला सत्ता मिळवून दिली. ते अहमदनगरचे होते. मी पण अहमदनगरचा असून कठीण काळात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे. त्यामुळे पक्षातले गटातटाचे राजकारण संपवून नव्या युवा चेहर्यांसोबत कॉग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी सज्ज व्हा,`` असा निर्धार कॉग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज पदग्रहण समारंभात केला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित या सोहळ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत सर्व कॉग्रेस नेते व पदाधिकार्यांच्या साक्षिने हा सोहळा पार पडला. कॉग्रेस मुक्त महाराष्ट्र करू अशा वल्गना सुरू असल्याची टीका करताना, सामान्य माणसांच्या मनात कॉग्रेस आहे. पराभवाने खचून न जाता आपण आता घरातले पंजाचे बिल्ले बाहेर काढा. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. 

मी पक्षात कधीही गटतट हा विषय मानत नाही. मी सर्वांना समान ठेवणार आहे. पण तुमच्या मानातले गटतट दूर करा. असे सांगत, आगामी विधानसभा निवडणूकीत युवकांना व नव्या चेहर्यांना संधी दिली जाईल, असे त्यांनी जाहिर केले. 

बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार सोपवल्यानंतर मावळते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सत्तेत नसताना पक्ष चालवणे हे कठीण काम असल्याचे म्हणाले. 

लोकसभा निवडणूकीतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा दिला आहे. मला कोणी राजीनामा द्यायला सांगितले नाही. असा खुलासा करत, ज्यांना कुणाला माझा निरोप समारंभ करायचा आहे तो मी होवू देणार नाही. मी निरोप घेणार नाही. कॉग्रेस माझ्या रक्तात आहे. अशा शब्दात चव्हाण यांनी भावना व्यक्त केल्या. 

युवक कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव यांनी कॉग्रेस कधीच नाऊमेद होवू शकत नाही असे स्पष्ट करत गुजरात कॉंग्रेसकडे पहा असा सल्ला दिला. गुजरात मधे कॉंग्रेसने विधानसभा निवडणूकीत भाजपला टक्कर दिली असून भाजपचा पराभव होवू शकतो हे दाखवून दिल्याचे ते म्हणाले. 

यावेळी पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विजय वडेट्टीवार, नसीम खान, रजनी सातव यांचीही भाषणे झाली. महाराष्ट्राचे प्रभारी मल्लीकार्जून खरगे यांनी आगामी निवडणूकांत महाराष्ट्रात सत्तांतर अटळ असल्याचा विश्वास व्यक्त केला. 

 इव्हीएम हटाव ची नारेबाजी..

दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना नाना पटोले यांनी लोकसभा निवडणूकीत कॉग्रेसचा अनपेक्षित पराभव झाल्याचे स्पष्ट केले. जनमानसात भाजपच्या सत्तेविरोधात तीव्र नाराजी असतानाही मते कशी मिळाली याची शंका येते. असे सांगताच कार्यकर्त्यांमधून ईव्हीएम हटाव ची नारेबाजी झाली. यावर येत्या 9 ऑगस्ट ला ईव्हीएम विरोधात देशव्यापी अराजकीय आंदोलन उभे राहणार असून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी यामधे सहभागी व्हावे, असे आवाहन केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com