`मी घरीच राहणार; पण मोदींचा हा निर्णय विचित्रच` #JantaCurfew

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केल्यानुसार देशात जनता कर्फ्यू रविवारी होणार आहे. त्यावर राजकीय नेत्यांनी व्यक्त केलेलही ही मते.
imtiyaz-zalil on curfew
imtiyaz-zalil on curfew

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या सकाळी सात ते रात्री नऊच्या दरम्यान कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन जनतेचा कर्फ्यू या माध्यमातून केले आहे.  मी त्याचे पालन करणार असून घरातच थांबणार आहे. लोकांनीही बाहेर पडू नये असे आवाहन यापूर्वीच मी केले आहे. परंतु पंतप्रधानांचा हा निर्णय मला विचित्र वाटतो, अशा शब्दांत एमआयएमचे खासदार इमतियाज जलील यांनी मोदींच्या जनता कर्फ्यूवर टीका केली आहे.

देशात व राज्यात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यावर खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी टाळणे, एकमेकांच्या संपर्कात न येणे, दिवसभरात हात स्वच्छ धुणे आणि स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे आहे .राज्य व केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणा यासाठी झटत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या 22 मार्च रोजी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत जनता कर्फ्यूची संकल्पना मांडली .

देशभरातून या निर्णयाचे स्वागत होत असताना एमआयएमचे खासदार इमतियाज जलील यांनी मात्र पंतप्रधानांचा हा निर्णय आपल्याला विचित्र वाटत असून एका दिवसाच्या जनता कर्फ्यूने काहीही साध्य होणार नाही , उलट लोकांमध्ये भीती पसरेल असे मत व्यक्त केले आहे .

`सरकारनामा`शी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, उद्या मी औरंगाबादेतील माझ्या घरीच राहणार आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर लोकांनी गर्दी टाळावी , घराबाहेर पडू नये असे देखील आवाहन  मी केले आहे. कोरोनाच्या विरोधात खंबीरपणे लढणाऱ्या आरोग्य यंत्रणा, प्रशासनातील अधिकारी ,डॉक्टर, नर्स महापालिकेचे कर्मचारी या सगळ्यांच्या सन्मानार्थ उद्या मी देखील टाळ्या वाजवणार आहे .या सगळ्यांचे चोविस तास कौतुक केले तरी ते अपुरे ठरेल एवढी चांगली आणि मोठी कामगिरी ते सर्व करत आहेत .

असे असले तरी जनता कर्फ्यूचा निर्णय हा विचित्रपणा असल्याचे माझे ठाम मत आहे. देशाच्या संसदेत कायदे करणाऱ्यांनी अशा पद्धतीचे निर्णय घेणे आश्चर्यकारक आहेत. एकीकडे गर्दी टाळण्यासाठी जनतेच्या कर्फ्यूचे आवाहन केले जाते, तर दुसरीकडे मात्र संसदेचे अधिवेशन घेऊन दोन्ही सभागृहाच्या सातशे  खासदारांचे जीव धोक्यात टाकले जात आहेत .

संसदेत आम्ही एकमेकांच्या शेजारी बसतो तिथे स्वतंत्र अशी कुठलीच यंत्रणा किंवा व्यवस्था नाही .मग गर्दीमुळे होणारा धोका संसदेत बसणाऱ्या खासदारांना किंवा लोकप्रतिनिधींना नाही का? असा सवालही इमतियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.

मलाही भीती वाटते 

मी आजच सकाळी दिल्लीहून परतलो आहे .संसदेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे देशभरातील खासदार सभागृहात उपस्थित असतात. भाजपचे खासदार दुष्यंत सिंग यांच्या बाबतीत नुकतीच एक बाब समोर आली आहे .कोरोना पॉझिटिव्ह महिलेशी त्यांचा संपर्क आल्यानंतर ते सभागृहात आले होते. दोन दिवसांपूर्वी माझी आणि त्यांची देखील भेट झाली .त्यामुळे कोरोना आता संसदेपर्यंत पोहोचला की काय अशी भिती प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे. मी तर स्वतःला घरातच कॉरोंटीईन करून घेतले आहे. जनतेचा कर्फ्यू झाल्यानंतर म्हणजेच सोमवारी संसदेचे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. दुपारी दोन वाजेपासून कामकाजाला सुरुवात होणार आहे.एकीकडे गर्दी टाळण्यासाठी लॉक आऊट करायचे, नागरिकांना घराबाहेर पडू नका असे आवाहन करायचे ,आणि दुसरीकडे मात्र अधिवेशन भरवत गर्दी जमवायची .अशाने लोक आमच्या आवाहनाला कसा प्रतिसाद देतील असा उलट सवालही इमतियाज जलील यांनी केला .

संसदेत अर्थव्यवस्थेविषयीचे विधेयक संमत करून घ्या, अशी मागणी आम्ही वारंवार करत आहोत, मात्र भाजपचे खासदार व सरकार आयुर्वेदिक व इतर विधेयकांच्या मंजुरीत वेळ खर्ची घालत आहेत. महत्त्वाची विधेयके संमत करून अधिवेशन संपवले तर दोन्ही सभागृहातील सातशे खासदारांचा जीवही सुरक्षित राहील, असा टोलाही इमतियाज जलील यांनी लगावला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com