विधानसभेला अजितदादा; पण `सोमेश्वर`ची निवडणूक लढविणार : सतिश काकडे

विधानसभेला अजितदादा; पण `सोमेश्वर`ची निवडणूक लढविणार : सतिश काकडे

सोमेश्वरनगर : उसाला चांगला भाव दिला तर मी सोमेश्वर कारखान्याची निवडणूक लढवणार नाही; असं मी दोन वर्षापूर्वी मी सांगितलं होतं.  पण मी याचा निश्चितपणे फेरविचार करायचं ठरवलं आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कारखान्याची निवडणूक लढवायची हे वैयक्तिक माझ्या डोक्यात आहे, अशी भूमिका शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी स्पष्ट केली. यामुळे कारखान्याची निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरूध्द काकडे गट अशा चुरशीची लढती यापूर्वी गाजल्या आहेत. प्रथमच सतीश काकडे यांनी एप्रिल 2020 च्या कारखाना निवडणुकीत उभा राहणार नाही व पॅनेलही टाकणार नाही अशी भूमिका घेतली होती. तसेच लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना मदत केली होती.

अजित पवार यांना गावात बोलवून येथून पुढच्या निवडणुकांमध्ये मी तुमच्या पाठीशी उभा राहणार असा शब्दही दिला होता. या पार्श्वभूमीवर 'सोमेश्वर' निवडणुक बिनविरोध होणार अशी चर्चा होती. मात्र, भाजपकडून पॅनेल टाकण्यासंदर्भात हालचाली सुरू होत्या. महानंदचे संचालक प्रशासक दिलीप खैरे यासाठी सक्रीयही झाले होते. मात्र, आता काकडे यांनी आज मुरूम (ता. बारामती) येथे माळेगावच्या संचालक मंडळाच्या सत्कार समारंभात आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आता कारखान्याची निवडणूक दुरंगी होते की तिरंगी याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

काकडे म्हणाले, मी निवडणूक लढविणार नसल्याचे बोललो होतो. पण कृती समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवून निवडणूक येताच ती लढविण्याचा निश्चित विचार करत आहे. मागील वेळी आमचा पराभव झाला. सोमेश्वरचा सभासद जागरूक नाही. पण माळेगावचा सभासद सूज्ञ आहे. त्यांना आता चांगला भाव मिळाला. सोमेश्वरमध्ये कृती समितीचे नियंत्रण आहे नाहीतर कारखाना मोडून खाल्ला असता.

विधानसभेला अजितदादाच!
शब्द दिल्याप्रमाणे मी विधानसभा निवडणुकीत अजितदादांचेच काम करणार. तो तालुक्याच्या विषय आहे. काहींची मतं वेगळी असतील पण अजितदादांचे काम चांगले आहे. तसेच मी पंकजा मुंडे व महादेव जानकर या मंत्र्यांना नोव्हेंबरमध्ये गावात उद्घाटनांसाठी आणणार आहे. अजितदादाही 'चालतंय' म्हणाले आहेत. माझ्या गावची कामे होतात. मुंडे यांनी पन्नास लाख रूपयांचे सभागृह मंजूर केले आहे. त्याला माझे आदर्श गोपीनाथराव मुंडे यांचे नाव देणार आहे, असेही सतीश काकडे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com