महामार्गाची दुरुस्ती करा, अन्यथा टोलनाका बंद करा : शिवेंद्रसिंहराजे

महामार्गाची दुरुस्ती करा, अन्यथा टोलनाका बंद करा : शिवेंद्रसिंहराजे

सातारा :  सातारा- पुणे महामार्गाची दुरुस्ती करावी तसेच टोल नाक्यावर आवश्यक सोयी सुविधा पुरवाव्यात अन्यथा टोलनाका बंद करा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. 

या ज्वलंत प्रश्‍नासंदर्भात लवकरच आपण बैठक घेवू आणि प्रश्‍न मार्गी लावू, असे आश्‍वासन ठाकरे यांनी शिवेंद्रसिंहराजे यांना दिले. 

महामार्गावरील जीवघेणा प्रवास आणि सक्तीची टोल वसुली याविरोधात सातारी जनता पेटून उठली आहे.  भाजपचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनीही आक्रमकपणे या प्रश्‍नाविरोधात सातत्याने आवाज उठवला असून उद्या (बुधवारी) आनेवाडी टोलनाका बंद करण्याचा इशारा दिला आहे.

हा प्रश्‍न काहीही करुन तडीस नेण्यासाठी आग्रही असलेल्या शिवेंद्रसिंहराजे यांनी नागपूर येथे अधिवेशनादरम्यान आज (मंगळवारी) सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून त्यांना महामार्ग दुरुस्ती, टोल नाक्यावरील आवश्यक सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पुरवणे याबाबत चर्चा केली. तसेच संबंधीत प्राधिकरणास हे जमत नसेल तर टोलनाका बंद करावा, अशी मागणी केली आहे.

आनेवाडी व परिसरातील गावकर्‍यांसह महामार्गालगत असलेल्या सातारा तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी गेल्या आहेत. असे असताना आनेवाडी टोल बुथवर स्थानिक भुमिपुत्रांनाही टोलसाठी अरेरावी आणि दमदाटीचे प्रकार सुरु असतात. सातारा शहर आणि सातारा व जावली तालुक्यातील नजीकच्या गावांमधील लोकांना कामानिमीत्त, समारंभानिमीत्त भुईंज, पाचवड, वाई, जोशी विहीर, सुरुर आदी ठिकाणी सातत्याने ये-जा करावी लागते.

 त्यांनाही टोल द्यावा लागतो. भुमिपुत्रांच्या जमिनी घेवून त्यांच्याकडूनही सक्तीने टोलवसुली केली जाते. ही बाब अन्यायकारक आहे. त्यामुळे ज्या कारणांसाठी टोलवसुली केली जाते, त्यातील महामार्ग आणि सेवा रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी. तसेच महामार्गावर सोयी सुविधा पुरवाव्यात अन्यथा टोलनाका बंद करावा, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. 

सविस्तर चर्चेअंती प्रश्‍नाचे गांभिर्य ओळखुन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी लवकरच यासंदर्भात बैठक बोलावून प्रश्‍न सोडवू असे आश्‍वासन शिवेंद्रसिंहराजे यांना दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com