पक्षातून काढल्यानंतरही, मी मनाने कॉंग्रेसमध्येच होतो : सतीष चतुर्वेदी 

पुत्र दुष्यंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. ही लोकशाही आहे आणि यामध्ये प्रत्येकाला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत कुणी कुणाचा गुलाम नाही. -सतीष चतुर्वेदी
satish chaturvedi
satish chaturvedi

नागपूर :  कॉंग्रेस पक्षातून काढल्यानंतरही मी मनाने पक्षातच होतो. येथे आलेल्या लोकांचा उत्साह सांगतो आहे की, माझ्या परत येण्याने पक्षासाठी त्याचे किती चांगले परीणाम होतील. आता कॉंग्रेसमधील मरगळ दूर होणार आहे. असे राज्याचे माजी मंत्री सतीष चतुर्वेदी म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे निलंबन मागे घेतल्यानंतर आज प्रथमच ते शहरात आले असता विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. येथे कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. 

महापालिकेच्या निवडणुकी दरम्यान प्रचारासाठी आलेले तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर चतुर्वेदी यांच्या समर्थकांनी शाई फेकली होती.

त्यानंतर काही नगरसेवक व कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. याची दखल घेऊन अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निलंबनाची शिफारस केली होती. त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते.

तेव्हापासून शहरात कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उभी फूट पडली होती. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी चव्हाणांना निर्णय फिरवरला. दीडच वर्षात चतुर्वेदी यांचे निलंबन मागे घेण्यात आले. 

निलंबन मागे घेतल्यानंतर आज प्रथमच चतुर्वेदी मुंबईवरून शहरात दाखल झाले. त्यांच्या शेकडो समर्थकांनी स्वागतासाठी विमानतळावर गर्दी केली होती. हार-तुरे देऊन त्यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर साई मंदिराचे दर्शन घेऊन चतुर्वेदी आपल्या निवासस्थानी परतले.

यावेळी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते तानाजी वनवे, नगरसेवक किशोर जिचकर, कमलेश चौधरी, दीपक कापसे, यशवंत कुंभलकर, माजी नगरसेवक प्रशांत चोपडा, अनिल वाघमारे आदी उपस्थित होते. 

दुष्यंतचा निर्णय वैयक्तिक 
पुत्र दुष्यंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. ही लोकशाही आहे आणि यामध्ये प्रत्येकाला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत कुणी कुणाचा गुलाम नाही. जो व्यक्ती मतदान करतो, त्याने कुठल्या पक्षात जायचे, हे त्याचे त्याने ठरवायचे असते. दुष्यंतने आपला मार्ग निवडला आहे. त्याला आपण कुठलाही अटकाव करणार नाही, असे चतुर्वेदी म्हणाले. आणि आमच्यात कुठलेच मतभेद नाहीत. तो त्याचे काम करेल मी माझे. त्याच्यावर कुठलेच बंधने लादणार नाही. आपण पक्के कॉंग्रेसी आहोत आणि राहणार असल्याचे चतुर्वेदी म्हणाले. 

कॉंग्रेसमध्ये चैतन्य परत आणू 
पक्षविरोधी कुठलीच कारवाई केली नाही. कॉंग्रेसचे नेते व पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या सोबतच होते. त्यांच्याशी भेटीगाठी नियमित सुरू होत्या. मी परत येताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. येथे उसळलेल्या गर्दीवरून ते दिसून येते. आपण परतल्याने कॉंग्रेसमधील मरगळ दूर होऊन चैतन्य येईल. त्यांचे सकारात्मक परिणाही दिसतील, असे यावेळी चतुर्वेदी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com