देशाच्या सीमांचे रक्षण करत असलेल्या जवानांना व बळीराजाला अभिवादन  : देवेंद्र फडणवीस 

-जलयुक्त शिवारअंतर्गत आतापर्यंत 16 हजार गावे जलपरिपूर्ण- पुढील काळात 25 हजार गावे जलपरिपूर्ण करण्यात येणार- गेल्या तीन वर्षात 8 हजार कोटींची विक्रमी अन्नधान्य खरेदी- देशातील परकीय गुंतवणुकीपैकी 47 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात- संघटित क्षेत्रात 8 लाख रोजगारनिर्मिती-देवेंद्र फडणवीस
cm-devendra-Fadnavis-15-Aug
cm-devendra-Fadnavis-15-Aug

मुंबई : "शेती, पाणी, गुंतवणूक, गृहनिर्माण अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्र देशात अव्वल कामगिरी करत असताना राज्याने आपला पुरोगामी वारसा जोपासणे महत्त्वाचे आहे," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्वातंत्र्यदिनी मंत्रालय येथे ध्वजारोहणप्रसंगी केले.

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालय येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक तसेच हुतात्म्यांना अभिवादन करत असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की," आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करत असलेल्या जवानांना तसेच बळीराजालाही अभिवादन करत आहे.आपले राज्य अनेक क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत पुढे जात आहे. स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ शहरे, राहण्यायोग्य शहरांचा निर्देशांक, परकीय थेट गुंतवणूक आदी वेगवेगळ्या राष्ट्रीय कार्यक्रमात महाराष्ट्र देशात सातत्याने अग्रेसर कामगिरी करीत आहे."

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, "उत्पादकता वाढत असतानाच शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र शासनाने उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा या सूत्रानुसार विविध पिकांच्या हमीभावात वाढ केली आहे. तसेच राज्य शासनानेही मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची खरेदी केली आहे. 1999 ते 2014 या 15 वर्षांतच्या कालावधीत करण्यात आलेल्या 450 कोटी रुपयांच्या अन्नधान्य खरेदीच्या तुलनेत गेल्या 3 वर्षात 8 हजार कोटी रुपयांची अन्नधान्याची विक्रमी खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रती राज्य शासनाची प्रतिबद्धता यातून दिसून येते."

"जागतिक बँकेच्या मदतीने दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यात राबविण्यात येत आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी शेतीचे संपूर्ण परिवर्तन करु शकणारा स्वर्गीय नानाजी देशमुख कृषी प्रकल्प सुरू करण्यात आला असून आता कृषी विपनन तसेच मूल्यवर्धनांतर्गत वेगवेगळे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत."

त्यांनी पुढे माहिती दिली की," आपले राज्य औद्योगिक क्षेत्रात सातत्याने अग्रेसर आहे. राज्यात जास्तीत जास्त उद्योग यावेत, अधिकाधिक परकीय गूंतवणूक यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘व्यवसाय सुलभता’ (इज ऑफ डुईंग बिझनेस)धोरण राबविण्यात येत असल्यामुळे गेल्या 2 वर्षात देशात आलेल्या परकीय गुंतवणुकीपैकी 42 ते 47 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. रोजगार निर्मितीतही राज्याने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. संघटित क्षेत्रात 8 लाख इतका सर्वाधिक रोजगारही महाराष्ट्रात निर्माण झाला आहे."

"अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग अशा सर्व समाजघटकांच्या कल्याणासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या 2022 पर्यंत सर्वांना घरे ही योजना शहरी तसेच ग्रामीण भागात राबविण्यातही महाराष्ट्र अग्रेसर आहे", असेही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले," छत्रपती शाहू- फुले- आंबेडकर यांचा वारसा आपण पुढे  नेत आहोत. राज्याचे पुरोगामित्व अबाधित ठेवण्यासाठी  सर्व समाजघटकांनी प्रयत्नशील राहायचे आहे. जात, धर्म आदी कोणत्याही कारणाने भेदभाव होऊ दिला जाणार नाही. यासाठी सामाजिक सौहार्द टिकून राहणे गरजेचे आहे. सर्वांना सोबत घेऊन आपल्याला महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे."

मनोगतानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस तसेच राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. व्हीजेटीआयच्या (वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट) विद्यार्थ्यांनी खेळातील ठोकळ्यांचा (क्यूब्ज) वापर करुन महात्मा गांधींजींची प्रतिमा मंत्रालय इमारतीमध्ये बनविली होती. मुख्यमंत्री यांनी या विद्यार्थ्यांच्या कलेला दाद दिली.

याप्रसंगी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार राज पुरोहित, आमदार विनायक मेटे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एन. एच. पाटील, मुख्य सचिव डी. के. जैन, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, लोकायुक्त न्या. एम.एल. तहलियानी, राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया, माजी पोलीस महासंचालक ज्युलियस रिबेरो, तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख अधिकारी, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष भगवंतराव मोरे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष चंद्रशेखर ओक,अपर मुख्य  सचिव प्रविणसिंह परदेशी, सुनील पोरवाल, बिजय कुमार, श्रीकांत सिंह,  शामलाल गोयल, संजय कुमार, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंद कुमार विविध मंत्रालयीन विभागांचे  प्रधान सचिव, सचिव आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com