i had warned ajit pawar be ready to pay price | Sarkarnama

तुला किंमत चुकवावी लागेल, हे मी अजितला बजावलं होत : शरद पवार

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 2 डिसेंबर 2019

अजित पवार यांचा तातडीने मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता मावळली.   

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या धोरणाशी विसंगत भूमिका घेत अजित पवार यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन शपथ घेतली. त्यानंतर तातडीने मी अजित पवारांच्या कृतीला माझा पाठिंबा नाही, हे प्राधान्याने स्पष्ट केले. त्याच दिवशी सायंकाळी अजित पवार सायंकाळी घरी आले. त्या वेळी तुझी चूक झाली. त्याची तुला किंमत चुकवावी लागेल, असे त्याला स्पष्ट बजावले, अशा शब्दांत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष घटनाक्रम सांगितला.

राज्यात सत्ता स्थापनेआधी बऱ्याच घडामोडी घडल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या तीनही पक्षांचे सरकार स्थापन होणे, अजित पवारांचे विसंगत वागणे, मोदी आणि पवार भेट याबाबत शरद पवार यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर सांगितले. 

`पक्षाच्या धोरणाशी विसंगत भूमिका घेतली तर त्या चुकीला माफी करायची नाही, हे मी ठरवलं होतं. अजित पवार यांनी अचानक पहाटे जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मला सकाळी सहा वाजता एकाने फोनवरून सांगितले. मी टिव्ही लावला. माझा विश्वासच बसत नव्हता. मात्र अजित पवार यांच्यासोबत जे आमदार शपथविधीच्या वेळी उपस्थित होते, त्यावरून माझ्या लक्षात आले की हे आमदार माझ्या सांगण्याशिवाय कोठे जाऊ शकत नाही. मी हे आमदार फसवून तेथे गेले असावेत. मी हे सावरू शकतो, असा मला तेव्हाचा विश्वास आला. मात्र अजित पवारांच्या कृतीमागे माझा हात नाही, हे मला पटवून देणे आवश्यक होते. त्यासाठी मी सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांना फोन केला. मला अजितचे वागणे पटले नसल्याचे आणि त्याला पाठिंबा नसल्याचे मी स्पष्ट केले. त्यानंतर आम्ही एकत्र पत्रकार परिषद घेतली. त्यात मी अजित पवारांच्या भूमिकेच्या विरोधात ठामपणे बोललो. त्यानंतर बहुतांश आमदार आम्ही एकत्र करू शकलो,`असे पवारांनी स्पष्ट केले.

शपथ घेतली त्याच दिवशी सायंकाळी अजित पवार माझ्या घरी आले. माझी चूक झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या चुकीची किंमत तुला मोजावी, लागेल असे मी तेव्हा बजावले होते. राज्यात तीन पक्षांचे सरकार सत्तेत आणण्याचे ठरल्यानंतर आम्ही जाणीवपूर्वक मग अजित पवारांना पहिल्या टप्प्यात शपथ दिली नाही. ती संधी आम्ही जयंत पाटील यांना दिली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते अडचणीच्या काळात ठामपणे उभे राहिले होते. म्हणून त्यांचीच आमच्याकडून प्रथम शपथ होईल याकडे लक्ष दिले. पक्षाच्या धोरणाशी विसंगत धोरण घरातल्या मंडळीने घेतले तरी त्याला माफ केले जात नाही, हे आम्हाला दाखवून द्यायचे होते, असे पवार यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांना भविष्यात मंत्री किंवा उपमुख्यमंत्री करणार का, या प्रश्नावर  त्यांनी थेट उत्तर दिले नाही. पक्षाचे कार्यकर्ते, विधीमंडळ सदस्य, नेते यांना अजित पवार सरकारमध्ये हवेत. त्यांच्याशिवाय सरकारचा कारभार चालविणे अवघड होईल, असे त्यांचे मत आहे. मात्र खुद्द अजित पवार यांनीच आपल्या कृतीमुळे तयार झालेले वातावरण स्वच्छ होईपर्यंत सरकारमध्ये सामील न होण्याचे ठरविले असल्याचे शरद पवारांनी जाहीर केले. पवारांच्या या भूमिकेमुळे अजितदादा मंत्रिमंडळात लगेच दिसणार नसल्याचे उघड झाले आहे.

अजितदादांचे मन वळविण्यात शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा यांचाही सहभाग होता का, या प्रश्नालाही शरद पवारांनी नकारार्थी उत्तर दिले.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख