I couldn't disobey Ajit Pawar : Anil Bonde | Sarkarnama

अजितदादांचा 'आदेश' मी मोडू शकलो नाही : कृषीमंत्री अनिल बोंडे  

ज्ञानेश्वर रायते
गुरुवार, 11 जुलै 2019

..

बारामती :  "  पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांनी व सर्व कृषीमंत्र्यांनी या संस्थेस भेट दिली, तेव्हापासून मी बारामतीबद्दल ऐकून होतो. आज अजितदादांमुळे येथे येण्याचा योग आला, अजितदादांनी तुम्हाला येथे भेट द्यायची आहे असा आदेशच दिला, तो मोडू शकलो नाही," असे उदगार  राज्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी बारामती येथे काढले . 

बारामतीच्या दौऱ्यात गुरुवारी  कृषीमंत्र्यांनी शारदानगर येथील अप्पासाहेब पवार सभागृहात कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, डॉ. वसुधा बोंडे, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त राजीव देशपांडे, डॉ. अविनाश बारवकर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, समन्वयक प्रशांत तनपुरे आदी उपस्थित होते.

 ही संस्था कृषी क्षेत्रात खूप काही करते आहे. खूप चांगले संशोधन येथे होत आहे. मी येथे आलो नसतो तर कदाचित हे देखणे चित्र पाहण्यापासून वंचित राहिलो असतो,असे सांगून डॉ. बोंडे पुढे म्हणाले,'' आता शेतीत नवे तंत्रज्ञान येते, मात्र किंमती खूप वाढीव आहेत. आज खते, बियाण्यात सतत वाढ होते, म्हणूनच शेती व शेतकरी आहे, तिथेच राहीला आहे. आज बॅंकांमध्ये उद्योजकाला सन्मान मिळतो, मात्र जगाच्या पोशिंद्याला नाही, हे चित्र का दिसते? तर आपण सारे शेतकऱ्याबाबत तेवढे संवेदनशील नाही. त्याच्याविषयी संवेदनशीलता असेल तर हे सारे चित्र बदलेल. तुमचे फार मोठे भाग्य आहे, राज्यातील सर्वोच्च कृषी क्रांतीच्या ठिकाणी तुम्हाला शिकायची संधी मिळाली.''  

विद्यार्थ्यांनो, तुम्ही लोकसेवेचे काम करणार आहात, पण एक लक्षात घ्या, आज अन्नधान्यात देश स्वयंपूर्ण असला तरी ज्याने यास हातभार लावला, तो शेतकरी मात्र आहे, तिथेच आहे, त्याच्या जीवनशैलीला बदलायचा ध्यास ठेवा. तुम्ही हे चित्र नक्की बदलाल अशी आशा आहे, असेही  डॉ. अनिल बोंडे म्हणाले. 

अजित पवार यावेळी म्हणाले,"आज शेतीच्या बाबतीत अनेक अडचणी असून शेतीबाबत योग्य निर्णय घेणाऱ्या सत्तेतील लोकांमधील मोजक्या नेत्यांमध्ये डॉ. अनिल बोंडे आहेत, त्यांना वेळ कमी असला तरी कमीत कमी वेळेत अधिक काम करण्याची त्यांची हातोटी आहे."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख