I am small person to say somthing on Bapat's claim : MLA Chabukswar | Sarkarnama

मी छोटा माणूस बापटांच्या दाव्यावर बोलू शकत नाही : आ. चाबुकस्वार

उत्तम कुटे
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

बापटांनी आयुक्तालयाचे श्रेय आपल्या आमदाराला  दिल्याच्या केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याचे गौतम चाबुकस्वार यांनी टाळले. मी छोटा माणूस असून त्यावर बोलू शकत नाही, असे ते म्हणाले.

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे उद्‌घाटन होते न होते तोच त्याचे श्रेय कोणाचे यावरून नेत्यांचे दावे प्रतिदावे सुरु झाले आहेत . 

 याबाबत पहिली मागणी आमचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली होती, असे सांगत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज आयुक्तालयाचे श्रेय लगेच घेण्याचा प्रयत्न त्याच्या उद्‌घाटनानंतर केला.

 प्रत्यक्षात त्यासाठी शहरातील सर्वच लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आहे. मात्र, बापट यांनी पहिले श्रेय घेतल्यानंतर आता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या  श्रेयबाजीचे राजकारण रंगणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

पुणे पोलिस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीणचे विभाजन करून हे नवे पोलिस आयुक्तालय निर्माण करण्यात आले आहे. त्याचे उद्‌घाटन आज झाले. त्यानंतर बोलताना बापट यांनी या पोलिस आयुक्तालयाची पहिली मागणी आमच्या शहराध्यक्षांनी केली होती, असे सांगितले. 

तर, आपण त्यासाठी चार वर्षे पाठपुरावा करीत होतो, त्यामुळे ते आपल्या मागणीचे यश असल्याचा दावा यापूर्वीच शिवसेनेचे शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव - पाटील तसेच पिंपरीचे या पक्षाचे आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांनी केलेला आहे.

अर्थसंकल्पी अधिवेशनात पिंपरीसह राज्यातील तीन नव्या पोलिस आयुक्तालयांची घोषणा केली. त्यानंतर 28 मार्च रोजी आढळराव यांनी वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि गुन्हेगारीकरण यामुळे पिंपरीसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय
करावे या आपण केलेल्या मागणीचे हे यश असल्याची पोस्ट फेसबुकवर पोस्ट टाकली होती. त्यासाठी शहरातील तिन्ही आमदारांचे प्रयत्न कारणीभूत असल्याचीही कबुलीही त्यांनी त्यावेळी दिली होती. 

तर, पिंपरी पोलिस आयुक्तालयाची पहिली मागणी आमच्या खासदारांच्या जोडीने माझीही होती. असा पुनरुच्चार आमदार गौतम चाबुकस्वार यांनी आजही केला. त्याला रेकॉर्ड साक्ष आहे, असे ते म्हणाले. या आयुक्तालयासाठी आपले विशेष योगदान आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, बापटांनी आयुक्तालयाचे श्रेय आपल्या आमदाराला  दिल्याच्या केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याचे त्यांनी टाळले. मी छोटा माणूस असून त्यावर बोलू शकत नाही, असे ते म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख