`मी छोट्या राजनची बहिण...दहाच्या दहा गोळ्या घालीन`

..
chota rajan sister arrested for exortion
chota rajan sister arrested for exortion

पुणे : कौटुंबिक वादासंदर्भात पोलिस ठाण्यात दाखल तक्रार मागे घेण्यासाठी कुख्यात गुंड छोटा राजन याची पुतणी प्रियदर्शनी निकाळजे हिने एका बांधकाम व्यावसायिकाकडे 50 लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. दरम्यान, या प्रकरणात निकाळजे हिच्यातर्फे बांधकाम व्यावसायिकाकडून 25 लाखांची खंडणी स्विकारण्यासाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लष्कर परिसरातील अरोरा टॉवर्स हॉटेलजवळून अटक केली.

धीरज बाळासाहेब साबळे (वय 26, रा. धानोरे, ता. खेड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रियदर्शनी निकाळजे हिच्यासह
मंदार वाईकर यांच्याविरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कात्रज येथे राहणाऱ्या 48 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने खंडणी व अंमली पदार्थविरोधी पथकाकडे तक्रार अर्ज दिला होता. फिर्यादी यांच्याकडून घटस्फोट घेण्यावरुन त्यांची पत्नी व मेव्हणीचा त्यांच्याशी वाद सुरू होता. दरम्यान, त्या दोघींची वाईकर याच्याशी ओळख झाली. त्यानंतर वाईकरने याप्रकरणामध्ये प्रियदर्शनी निकाळजे ही मध्यस्थी करेल, असे सांगितले. दरम्यान, निकाळजे, वाईकर व साबळे यांनी संगनमत करून निकाळजे हिने तिच्या संघटनेच्या लेटरहेडवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्या अर्जानुसार गुन्हा दाखल होऊ नये व प्रकरण मिटवून घेण्यासाठी निकाळजे हिने फिर्यादीकडे 50 लाखांची मागणी केली होती. फिर्यादीने ते पैसे द्यावेत, यासाठी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे फिर्यादी व त्यांच्यात 25 लाखांची तडजोड झाली. दरम्यान, फिर्यादीने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार, शुक्रवारी रात्री नऊ वाजता लष्कर परिसरातील हॉटेल अरोरा टॉवर्स येथे खंडणीची रक्कम देण्याचे ठरले. ते पैसे स्विकारण्यासाठी आलेल्या साबळे यास पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. साबळेच्या चौकशीअंती हा कट तिघांनी रचल्याचे निष्पन्न झाले. पोलिस उपायुक्त बच्चन सिंग, सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक संजय गायकावाड, निलेशकुमार महाडीक यांच्या पथकाने ही कारवाई केली.


दहाच्या दहा गोळ्या घालेल !
साबळेच्या सांगण्यावरुन फिर्यादीने प्रियदर्शनीची भेट घेतली. तेव्हा तिने "मी छोटा राजनची मी सख्खी पुतणी आहे, आमचा डीएनए एकच आहे. जीव प्यारा असेल तर मी सांगितलेले ऐक. मी सांगितल्याशिवाय भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात जायचे नाही. मला पैसे पोहोच झाले तरच अर्ज मागे घेईल', अशा शब्दात धमकी दिली. त्याचवेळी तिने तिच्याकडील पिस्तूल फिर्यादीवर रोखून "माझे ऐकले नाही, तर पिस्तुलातील दहाच्या दहा गोळ्या घालून संपवेल' असा इशाराही दिला.

"बांधकाम व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडे छोटा राजन टोळीच्या लोकांनी 50 लाखांची खंडणी मागितली होती. त्यापैकी 25 लाख रुपये स्विकारताना एकास अटक केली आहे. या प्रकरणाशी संबंधीत असणाऱ्यांचा पोलिस शोध घेत असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.'' अशोक मोराळे, अतिरीक्त पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com