I am with Shivsena : Vijay Chaugule | Sarkarnama

मी शिवसेनेचाच, पण फडणवीसांनी दिलेल्या संधीचे सोने करणार : विजय चौगुले 

सुजित गायकवाड 
बुधवार, 19 डिसेंबर 2018

मी शिवसेनेचा आहे, शिवसेनेतच राहणार आहे, फक्त माझ्या वडार समाजाच्या उद्धाराकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर सोपवलेल्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करेन. 

-विजय चौगुले

नवी मुंबई  : "मी शिवसेनेचा आहे, शिवसेनेतच राहणार आहे, फक्त माझ्या वडार समाजाच्या उद्धाराकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर सोपवलेल्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करेन", असे स्पष्टीकरण शिवसेनेचे नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी   दिले.

राज्यभरात विखुरलेल्या वडार समाजाला एकत्र करण्यासाठी 17 डिसेंबरला सोलापूर येथे चौगुले यांनी महामेळावा आयोजित केला होता. या महामेळाव्यात फडणवीस यांच्यासहित शिवसेनेचे वरिष्ठ नेते मंडळींनाही आमंत्रित केले होते. 

या मेळाव्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून चौगुले यांनी राज्यव्यापी दौरा करून वडार समाजातील समस्या जाणून घेतल्या. या समस्या सोडवण्यासाठी एक निवेदन चौगुले यांनी फडणवीस यांना दिले होते; परंतु निवेदनात दिलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी व वडार समाजाच्या विकासासाठी एक महामंडळ स्थापन करून त्यावर चौगुले यांची अध्यक्ष म्हणून निवड केली जाईल. तसेच त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला जाईल, अशी घोषणा केली. 

या घोषणेमुळे चौगुले भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरुवात झाली आहे; मात्र आपण आजही शिवसेनेतच आहोत आणि यापुढेही राहू, असे स्पष्टीकरण चौगुले यांनी दिले आहे. महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला समाजाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी एक संधी मिळणार आहे. तिचे सोने करण्याचा प्रयत्न करू, असे चौगुले यांनी सांगितले.

विजय चौगुले यांनी यापूर्वी शिवसेनेतर्फे ठाणे लोकसभा आणि ऐरोली विधानसभा निवडणूक लढविलेली आहे . नवी मुंबई महापालिकेत त्यांचे सुमारे १५ नगरसेवक समर्थक आहेत . विजय चौगुले हे एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात . त्यांनी जिल्हा प्रमुख पदही भूषविलेले आहे . शिवसेनेत बाहेरून आलेल्या मंडळींच्या वाढत्या प्रस्थामुळे ते  नाराज असल्याचे बोलले जाते . 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख