I am going to join BJP as well as cabinet | Sarkarnama

भाजपमध्ये जाणार आणि शंभर टक्के मंत्रीही होणार : अब्दुल सत्तार 

जगदीश पानसरे 
बुधवार, 12 जून 2019

मी भाजपमध्ये नक्की जाणार, एवढेच नाही तर शंभर टक्के मंत्रीही होणार यात शंका नाही - सत्तार 

औरंगाबादः  मी लवकरच भाजपमध्ये जाणार आणि शंभर टक्के मंत्रीही होणार असा दावा आमदार अब्दुल सत्तार यांनी सरकारनामाशी बोलतांना केला आहे. राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. 

त्या अनुषंगाने कॉंग्रेस आमदारांनी मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या भेटीगाठी देखील सुरू केल्या आहेत. सिल्लोड-सोयगांवचे आमदार अब्दुल सत्तार यांनी देखील मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 

या पार्श्‍वभूमीवर अब्दुल सत्तार यांच्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, येत्या 23 तारखेला सिल्लोड येथे माझ्या मुलीचे लग्न आहे. सध्या मी या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटण्यात व्यस्त आहे. सगळे आमदार, मंत्री, मित्र, आप्तेष्टांनी मुलीला आशिर्वाद देण्यासाठी यावे म्हणून आग्रहाचे निमंत्रण देतो आहे.

 काल मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांची भेट घेऊन त्यांनाही आंमत्रित केले. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे राज्य मंत्रीमंडळ विस्तार आणि माझ्या भाजप प्रवेशाची सांगड घातली जात आहे. मी भाजपमध्ये नक्की जाणार, एवढेच नाही तर शंभर टक्के मंत्रीही होणार यात शंका नाही असेही सत्तार यांनी स्पष्ट केले. 

एकीकडे अब्दुल सत्तार यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नका या मागणीसाठी सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील भाजपमधील निष्ठावान पदाधिकारी, कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, यांच्यासह अनेकांच्या भेटी घेऊन दबाव वाढवत आहेत. 

तर दुसरीकडे मात्र मी भाजपमध्ये जाणार आणि मंत्रीही होणार असा विश्‍वास सत्तार व्यक्त करत आहेत. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा विरोध डावलून सत्तार यांच्या हाती भाजपचे कमळ आणि त्यासोबतच मंत्रीपद देखील येणार या चर्चेला तालुक्‍यात उधाण आले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख