I always travel with the Dumbells in my Car | Sarkarnama

प्रवासात डंबेल्स, कार्यकर्त्यांच्या घरचे जेवण - गिरीश महाजन यांच्या "फिटनेस'चे रहस्य

कैलास शिंदे - सरकारनामा ब्युरो, जळगाव
सोमवार, 20 मार्च 2017

निवडणुकीच्या काळात सर्वच नेत्यांची सकाळपासून धावपळ सुरु होते व रात्री
उशिरापर्यंत प्रचारसभा चालतात. काहीवेळा पहाटेच घरातून निघावे लागते, अशावेळी
गाडीतच व्यायामाचे साहित्य (मुख्यत: डंबेल्स) ठेवून दिलेले असते. मतदारसंघातील प्रचारादरम्यान पहाटे प्रवासात कुठेतरी झाडाखाली थांबून दंड, बैठका मारुनपुढच्या गावी रवाना होतो - गिरीश महाजन

याची पन्नाशी ओलांडल्यानंतरही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही
तंदुरुस्त असलेल्या राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन
यांच्या या फिटनेसबद्दल अनेकांना आश्‍चर्य वाटते. दररोज सकाळी व्यायाम, वेळ
मिळाला तर पोहोणे, रोजच्या भोजनात सात्त्विक आहार हे आपल्या तंदुरुस्तीचे रहस्य
आहे, असे सांगताना ते सर्वांना जीवनात या गोष्टी पाळण्याचा सल्ला आवर्जून
देतात. विशेष म्हणजे प्रवासात ते बाहेरचे खात नाहीत, कार्यकर्त्यांच्या घरून
डबा मागवितात.

गेल्या तीस वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेले गिरीश महाजन हे बालपणापासूनच
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. संघसंस्कारातून शिस्त, व्यायाम या चांगल्या सवयी त्यांच्या अंगी आल्या. त्याचा त्यांच्या एकूणच जडणघडणीवर सकारात्मक परिणाम झाला. गेल्या तीस वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय असून विधानसभेतील ही त्यांची पाचवी टर्म आहे. तालुक्‍याचे लोकप्रिय व मोठा जनसंपर्क असलेला नेता म्हणून त्यांचा लौकिक आहे. सतत कार्यमग्न असतानाही महाजन त्यांच्या तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष देतात.

असा आहे दिनक्रम

मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडताना त्यांची कार्यव्यस्तता वाढली असली तरीही
दररोज सकाळी लवकर उठून नियमितपणे ते व्यायाम करतात. त्यांच्या निवासस्थानी
त्यांनी त्यासाठी "मिनी जीम' तयार केली आहे. व्यायाम केल्यानंतर पुरेसा नाश्‍ता, वेळेत जेवण ते घेतात. जेवणात कधीही बाहेरचे पदार्थ ते खात नाहीत. सात्त्विक आणि तो देखील घरचाच आहार घेण्यावर त्यांचा भर असतो. अगदी प्रवासात अथवा बाहेरगावी असतानाही ते कार्यकर्त्याच्या घरचे जेवण मागवून घेतात. मुंबईत असतानाही सकाळी व्यायाम करणे टाळत नाही, असे महाजन आवर्जून सांगतात.

 

गाडीतही व्यायामाचे साहित्य

निवडणुकीच्या काळात सर्वच नेत्यांची सकाळपासून धावपळ सुरु होते व रात्री
उशिरापर्यंत प्रचारसभा चालतात. काहीवेळा पहाटेच घरातून निघावे लागते, अशावेळी
गाडीतच व्यायामाचे साहित्य (मुख्यत: डंबेल्स) ठेवून दिलेले असते. मतदारसंघातील प्रचारादरम्यान पहाटे प्रवासात कुठेतरी झाडाखाली थांबून दंड, बैठका मारुनपुढच्या गावी रवाना होतो; अनेकदा अशा प्रकारे व्यायाम केल्याचे महाजन सांगतात. व्यायामासाठी वेळ नाही, हे कारण सांगणे त्यांना पटत नाही. म्हणून तरुण कार्यकर्त्यांना ते नेहमीच व्यायाम, सात्त्विक आहार, व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन अगदी अधिकारवाणीने करु शकतात.

 

 

 

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख