अश्विनी बिद्रे यांच्या पतीचा साक्ष देण्यास नकार

...
ashwini bidre murder case
ashwini bidre murder case

पनवेल : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य संशयित अभय कुरुंदकर याचे वकील विशाल भानुशाली व या हत्या प्रकरणाची सुनावणी घेणारे न्यायाधीश राजेश अस्मर एकाच चेंबरचे असल्यामुळे या खटल्यात आपल्याला न्याय मिळण्याची अपेक्षा नाही. त्यामुळे हा खटला दुसरा न्यायालयात वर्ग करावा, अशी मागणी करणारे या प्रकरणातील मुख्य साक्षीदार राजू गोरे यांनी केली.

गोरे यांनी पनवेल येथील सत्र न्यायालयात न्यायाधीश राजेश अस्मर यांच्यापुढे आपली साक्ष नोंदवून घेण्यास नकार दिला. तशा प्रकारचे पत्रही त्यांनी न्यायाधिशांना सादर केले. मात्र न्यायाधिशांनी राजू गोरे यांचे म्हणणे रेकॉर्डवर घेतले नाही. राजू गोरे यांनी थेट न्यायाधीशांवरच आक्षेप घेतल्याने हा खटला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

अश्विनी बिद्रे खून खटल्यातील पहिले मुख्य साक्षीदार आनंद बिद्रे यांची साक्ष आणि उलट तपासणी नुकतीच पुर्ण झाली आहे. त्यानंतर शुक्रवार 31 जानेवारीपासून दुसरे मुख्य साक्षीदार आणि अश्‍विनी यांचे पती राजू गोरे यांची साक्ष नोंदवून घेतली जाणार होती. त्यानुसार शुक्रवारी राजू गोरे पनवेल सत्र न्यायालयात हजर झाले; मात्र त्यांनी न्यायाधीश राजेश अस्मर यांच्यापुढे साक्ष देण्यास स्पष्ट नकार दिला. याबाबतचे लेखी निवेदन सुद्धा राजू गोरे यांनी न्यायालयाकडे सादर केले.

अश्‍विनी बिद्रे खून खटला आपल्या न्यायालयातून काढून घ्यावा, तसेच तो दुसऱ्या न्यायालयात चालवावा. याबाबत मी मुंबई उच्च न्यायालयाला कळविले आहे; मात्र सर्वोच्च न्यायालयाने याबाबत आपल्याला अद्यापपर्यंत काहीही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे आपण खटल्याचे कामकाज चालवत असल्याचे स्पष्टीकरण न्यायाधीश अस्मर यांनी दिले. त्यानंतर त्यांनी रोजनाम्यावर राजू गोरे साक्ष नोंदवीत नाहीत, असे लिहिले. त्यावर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जोरदार आक्षेप घेत राजू गोरे यांचे लेखी म्हणणे रेकॉर्डवर घेण्यास सांगितले. मात्र न्यायाधीश अस्मर यांनी त्यांचे निवेदन दाखल करुन घेतले नाही. या घटल्याची पुढील सुनावणी येत्या 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com