भुकेने व्याकुळ मजूर रेल्वे मार्गाने निघाला पुणे ते जबलपूर - Hungry laborers set out by train from Pune to Jabalpur | Politics Marathi News - Sarkarnama

भुकेने व्याकुळ मजूर रेल्वे मार्गाने निघाला पुणे ते जबलपूर

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 23 एप्रिल 2020

एकीकडे कोरोनाची धास्ती, तर दुसरीकडे भुकेची व्याकुळता असताना रेल्वे मार्गाने पुण्याहून जबलपूर (मध्यप्रदेश) कडे पायी निघालेला एक ३५ वर्षीय मजूर कान्हेगाव परिसरातील रेल्वे मार्गाने पायी जात होता. 

श्रीरामपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन सुरू झाल्यानंतर हातातील काम थांबले आणि उपासमारी सुरु झाली. एकीकडे कोरोनाची धास्ती, तर दुसरीकडे भुकेची व्याकुळता डोळ्यासमोर उभी असताना रेल्वे मार्गाने पुण्याहून जबलपूर (मध्यप्रदेश) कडे पायी निघालेला एक ३५ वर्षीय मजूर कान्हेगाव परिसरातील रेल्वे मार्गाने पायी जात होता. 
शेकडो किलोमीटर पायी प्रवास करुन दमल्यानंतर सायंकाळी तो कान्हेगाव परिसरात विश्रांतीसाठी थांबला.ग्रामस्थांनी त्याची चौकशी केली असता, या मजुरासह त्याचे सहकारी असे तीस मजूर बेंगलोरहून पुण्यात पायी आले होते. पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत क्वारंटाईन केले. दोन दिवस कुठलीही सुविधा न मिळाल्याने त्यांना सोडण्यात आले. त्यानंतर प्रत्येकजण विभागून गावाकडे रवाना झाल्याचे त्याने ग्रामस्थांना सांगितले.

ग्रामस्थांकडून तो पळाला
माजी पोलीस पाटील अर्जुन खरात, अशोक खरात, भीमराज खरात, वसंत खरात, काका खरात यांनी त्यांची जेवणाची व्यवस्था केली. विनायक खरात, बाळासाहेब खरात यांनी अर्थिक मदत केली. सकाळी ग्रामस्थांनी त्याला ग्रामसेवक महेश तायडे यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर मात्र तो पळून गेल्याचे तायडे यांनी सांगितले.

पढेगाव येथे पुन्हा पकडला
हा प्रकार पोलिसांना माहित होताच त्यांनी त्याला पढेगाव येथे त्या मजुराला पकडुन चोप दिला. तेथुन तो दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा रेल्वेमार्गाने पायी निघाल्याने ग्रामस्थांनी प्रशासकीय कारभारावर नाराजी दर्शविली. स्थानिक प्रशासनाने या मजुरांची वैद्यकीय तपासणी करुन क्वारंटाईन करायला हवे होते. लाॅकडाऊननंतर तो गावी परतला असता. तपासणीनतंर ग्रामस्थांनी त्याची व्यवस्था केली असती. ग्रामसेवकाने त्याला पुन्हा शेकडो किलोमीटर पायी प्रवास करण्यास भाग पाडले. त्यामुळे वरिष्ठ अधिकर्यांनी ग्रामसेवकांची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी कान्हेगाव ग्रामस्थांनी केली. 

प्रांताधिकाऱ्यांना कल्पना दिली होती
लाडगाव शिवारात दोन दिवसांपुर्वी आढळलेला मजूर रात्री कान्हेगाव येथे थांबला होता. ग्रामस्थांनी त्याची जेवणाची व्यवस्था केली होती. आपण ही माहिती दुसऱ्या दिवशी सकाळी प्रांताधिकारी अनिल पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यांना दिली होती. वडाळा महादेव येथे त्याला तपासणीला नेण्यासाठी रिक्षाचा शोध घेताना तो नजर चुकवुन पळाला. याची माहिती पोलिसांनाही दिली आहे, असे ग्रामसेवक महेश तायडे यांनी सांगितले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख