`नारायण राणेंनी काॅंग्रेस प्रवेशाचा निर्णय हा चिठ्ठी टाकून घेतला...`

`नारायण राणेंनी काॅंग्रेस प्रवेशाचा निर्णय हा चिठ्ठी टाकून घेतला...`

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर कोणत्या पक्षात जायचे, याचा निर्णय चिठ्ठी टाकून घेतला. एका चिठ्ठीवर काॅंग्रेस आणि दुसरीवर राष्ट्रवादी असे लिहिले. चिठ्ठी उचलल्यानंतर ती काॅंग्रेसची निघाली आणि त्यांनी त्या पक्षात प्रवेश केला, अशी माहिती राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. राणे यांनीच आपल्या आत्मचरित्रात हा प्रसंग दिल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

राणे यांच्या झंझावात या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, शिक्षणमंत्री आशिष शेलार आदी उपस्थित होते.

एखाद्या सामान्य घरातून जन्मास आलेली व्यक्ती अभ्यासाने आणि कर्तुत्त्वाने राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचते, हे राणे यांच्य चरित्रातून दिसते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा राणेंवर प्रचंड विश्वास होता. ठाकरे यांना ज्या वेळी अडचण आली त्या वेळी राणे यांनीच सारी जबाबदारी सांभाळली, असे पवार यांनी सांगितले.

राणे यांनी आपली संसदीय कर्तुत्त्वही गाजविले, असे सांगत पवार यांनी राणे यांनी अर्थसंकल्पावरील केलेल्या भाषणाची प्रत मी मागवून घेऊन वाचली होती, अशी आठवण त्यांनी सांगितली. राणे यांची विधिमंडळातील भाषणे आताच्या लोकप्रतिनिधींनी वाचली तरी ते प्रभावी ठरतील, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

राणे यांचा स्वभाव हा अन्याय सहन न करणारा आहे. त्यामुळे शिवसेनेत कोंडी होऊ लागल्यानंतर त्यांनी तो पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी कोणत्या पक्षात जायचे, असा पेच त्यांच्यापुढे निर्माण झाला. त्या वेळी त्यांनी चिठ्ठी टाकून काॅंग्रेसची निवड केली, असे पवार यांनी सांगितले. राणे यांना मुख्यमंत्रिपदासाठी केवळ नऊ महिन्यांचा कालावधी मिळाला. त्यांना पूर्ण टर्म मिळाली असती तर त्यांच्या कामाची वेगळी नोंद नक्की झाली असती, पवार यांनी आवर्जून सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com