`आम्ही किती दिवस शिवाजीराव मोघेंसाठी सतरंज्या उचलायच्या?`

`आम्ही किती दिवस शिवाजीराव मोघेंसाठी सतरंज्या उचलायच्या?`

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघ आदिवासीकरींता राखीव आहे. भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या 58 हजारांच्या मताधिक्‍यांमुळे पक्षाकडे उमेदवारीसाठी ईच्छुकांची भाउगर्दी वाढली. कॉंग्रेसकडेही उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या कमी नाही. असे असले तरी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार राजु तोडसाम तसेच कॉंग्रेसचे माजीमंत्री शिवाजीराव मोघे यांच्याकरीता विधानसभेची निवडणूक नक्कीच सोपी नसल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.

प्रत्येक नवीन कार्यकर्त्याला आमदार होण्याची स्वप्ने पडत आहेत. शिवाजीराव मोघे यांना उमेदवारी न मिळाल्यास ते आपला मुलगा जितेंद्रकरीता उमेदवारीकरीता आग्रह धरण्याची शक्‍यता आहे. "आम्ही घराणेशाही खपवून घेणार नाही. किती दिवस मोघेंच्या सतरंज्या उचलायच्या', असा प्रश्‍न करीत गोंड समाजाच्या तरूणांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मोघे पितापुत्रांकरीता आगामी विधानसभा कठीण जाणार असल्याचे बोलले जाते. 

आर्णी-केळापूर हा विधानसभा मतदारसंघ आदिवासीकरीता राखीव आहे. आर्णी-केळापूर हा विधानसभा मतदारसंघ पूर्वी केळापूर विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जात होता. मध्यंतरी निवडणूक आयोगाने केलेल्या मतदारसंघाच्या फेररचनेमध्ये आर्णी तालुक्‍यात केळापूर व घाटंजी तालुक्‍यापेक्षा अधिक मतदार असल्याकारणाने मतदारसंघाला आर्णी हे नाव देण्यात आले.

केळापूर घाटंजी तालुक्‍यात पारवेकर घराणे इजारदार म्हणून ओळखल्या जात होते. या भागातील जनता पारवेकर घराण्यावर अतोनात प्रेम करायाची. म्हणून गेल्या 50 वर्षांपासून राखीव असलेल्या या विधानसभा मतदारसंघात पारवेकर घराण्याने दिलेल्या कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येत होता. मग ते शिवाजीराव मोघे असो किंवा जनता दलाचे स्व. देवराव गेडाम असो की भाजपचे माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे की, विद्यमान आमदार राजु तोडसाम असो. हे सारेच पारवेकरांच्या सहकार्याशिवाय विधानसभेत पोहचू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

गेल्या 40 वर्षांपासून केळापूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे शिवाजीराव मोघे यांनी गोंड समाजातील नवतरूणांना पुढे करण्याऐवजी मतदारसंघात अल्पसंख्येने असणाऱ्या आदिवासी समजातील लोकांना पुढे केल्याने आता मोघेंच्या विरोधात गोंड समजाने आघाडी उघडली आहे. आमच्या वडिलांनी मोघेकरीता सतरंज्या उचलल्या. आता आणखी किती दिवस आम्ही मोघेकरीता संतरंज्या उचलाच्या, असा प्रश्‍न गोंड समजातील तरूण कार्यकर्ते विचारीत आहेत. एकीकडे कॉंग्रेसमध्ये उमेदवारीकरीता भाऊगर्दी तर भाजपमध्येदेखील ईच्छुकांची मोठी रांग आहे. त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे.

विद्यमान आमदार राजू तोडसाम यांची पाच वर्षांची कारर्कीर्द विविध बाबींमुळे वादग्रस्तच राहिली असल्याचा आरोप विरोधक करतात. त्यामुळे अनेकांना असे वाटते की तोडसाम यांना उमेदवारी मिळणार नाही. हे गृहीत धरूनच भाजपकडून लढण्यासाठी रांग लागली आहे. त्यात माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे, दत्ता सिडाम, मनोहर कनाके, संजय आत्राम इतकेच नव्हे तर आर्णी मतदारसंघात आदिवासींची संख्या कमी आहे म्हणून की काय, यवतमाळ जिल्ह्याबाहेरील उमेदवार भाजपची उमेदवारी मागण्याकरिता या भागातील लोकनेत्यांच्या बंगल्यावर चकरा मारताना दिसत आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार राजु तोडसाम यांनी कॉंग्रेसचे जवळपास तीस वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या माजी मंत्री ऍड. शिवाजीराव मोघेंचा वीस हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता. आता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणकीतही कॉंग्रेसचे नवनियुक्त खासदार बाळू धानोरकर यांना या आर्णी विधानसभा मतदारसंघात सपाटून मार खावा लागला. भाजपचे हंसराज अहीर यांना या मतदार संघात 58 हजारांचे मताधिक्‍य मिळाले आहे. या मताधिक्‍यात केळापूर घाटंजी या तालुक्‍यातील सहा जिल्हा परिषद सर्कलमध्येच भाजपला जवळपास 57 हजाराचे मताधिक्‍य आहे.

या मतदारसंघात जवळपास साडेतीन लाखांवर मतदार असून त्यात सर्वाधिक एक ते सव्वालाख मतदार हे आदिवासी आहेत. त्यातही एक लाखांवर आदिवसींमधील गोंड समाजाचे प्राबल्य आहे. जेव्हा जेव्हा आदिवासी मधील गोंड समाजाचा उमेदवार विरोधकांकडून दिल्या गेला, तेव्हा तेव्हा कॉंग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघेंचा पराभव झालेला पहायला मिळाला. हे जनता दलाचे चिन्हावर निवडून आलेले स्व. देवराव गेडाम असो की भाजपकडून निवडून आलेले डॉ.संदीप धुर्वे असो. त्यामुळे आता कॉंग्रेसमधूनही गोंड समाजाचा उमेदवार दिल्या जावा, याकरीता पक्षश्रेष्ठीकडे गोंड समाजातील कार्यकर्ते जोरदार मागणी करीत आहे.

दरम्यान कॉंग्रेसकडे सात जणांनी उमेदवारीची मागणी केली असून त्यात सत्तर वर्षीय माजीमंत्री ऍड. शिवाजीराव मोघे, नवतरूण पांढरकवडा पंचयात समितीचे माजी सभापती रितेश परचाके, पांढरकवड्याचे माजी नगराध्यक्ष भाऊराव मरापे, बळवंत नैताम, मनोहर मसराम, अजय घोडाम, माणिक तोडसाम आदिंचा समावेश आहे. विशेष म्हणजे मोघेंचे पुत्र जितेंद्र मोघे यांनी कॉंग्रेस पक्षाकडे उमेदवारी अर्ज न केल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार तर घेतली नाही ना, अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com