मुंबईची 'श्रीपत भवन' चाळ ते चाळींचा विकास करणारे गृहनिर्माण मंत्रीपद!

महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात गृहनिर्माण खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसचे 'फायरब्रँड' नेत डाॅ. जितेंद्र आव्हाड यांना मिळाले. मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांना आठवली ती आपण पूर्वी रहात असलेली चाळ.
Housing Development Minister JItendra Awhad Reminds Old Chawl
Housing Development Minister JItendra Awhad Reminds Old Chawl

पुणे : महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात गृहनिर्माण खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसचे 'फायरब्रँड' नेत डाॅ. जितेंद्र आव्हाड यांना मिळाले. मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांना आठवली ती आपण पूर्वी रहात असलेली चाळ. एका चाळीत राहणारा मुलगा पुढे याच चाळींचा विकास करु शकणारा गृहनिर्माण मंत्री बनतो याचे अप्रूप आव्हाडांनी आपल्या ट्वीटमधून व्यक्त केले आहे.

आव्हाड आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात.....
लहानपणीचा घरचा पत्ता - 
चाळीचे नाव श्रीपत भवन, 
खोली क्रमांक ६, 
वाडिया स्ट्रीट, 
ताडदेव.
मुंबई..
आणि आज चाळींचा विकास करणारे गृहनिर्माण मंत्री पद. 
ही किमया फक्त आणि फक्त शरद_पवार साहेबच करू शकतात. 

आपल्या चाळीबद्दल आव्हाड सांगतात.....
....ताडदेवच्या श्रीपत भवन  चाळीत आमची खोली होती पाच नंबरची. तीन नंबरच्या खोलीत जानी शेठ रहायचा. पांढरे शुभ्र कपडे, पांढरे बूट, डोक्याला टक्कल आणि गोरापान चेहेरा. जानीशेठचा चोवीस तास चालणारा रमीचा अड्डा होता. हे जानीशेठ कायम चाळीच्या दरवाजात उभे राहिलेले दिसायचे. चाळीच्या बोळासमोरच मोकळं मैदान होतं. तिथं अँटनीचा दारूचा अड्डा होता. या अड्ड्याबाहेर चणे-फुटाणे विकणारे बसलेले असायचे....

....चाळीच्या सुरुवातीला गंगारामचे छोटेसे दुकान होते. तिथं गोळ्या बिस्किटं मिळायची. पाच पैशांना मिळणाऱ्या आंब्याच्या गोळीची चव अफलातून होती. तशीच पारदर्शक कागदात गुंडाळलेली रावळगावची टाॅफी. या कडक टाॅफीची सर आजच्या चाॅकलेटांनाही नाही येणार....

....चाळीत बहुसंख्य पारशी कुटुंबं होती. आम्ही नाशिकहून इथे आलो होतो. माझ्या वडिलांना नोकरी नव्हती. आई शिवणाचे क्लासेस घ्यायची. त्यावेळी या पारशी कुटुंबांनी माझ्या वडिलांना खोलीसमोरच्या वऱ्हांड्यात फुकट झोपण्याची मुभा दिली होती. ही पारशी कुटुंबं आम्हाला सकाळ रात्रीचं जेवण आणि नाष्टाही द्यायची. त्यामुळे आमच्या घरात या पारशी कुटुंबांचं महत्त्व साहजिकच होतं. आमच्या घरच्या प्रत्येक कार्यक्रमात या पारशी कुटुंबांचा कायम सहभाग असायचा. अगदी घरी पुजा असली तरी ती या पारशी कुटुंबातल्या व्यक्तींकडूनच व्हायची........

....मी ज्या चाळीत आठ वर्षे राहिलो त्या 'श्रीपत भवन' चाळीचा आज पुनर्विकास झाला आहे. त्यावेळी तळमजला आणि वर दोन मजले अशी ती चाळ होती.....

...या चाळीतली किंवा कुठल्याही चाळीतली मला सर्वात न आवडलेली गोष्ट म्हणजे सार्वजनिक संडास... हे मात्र आव्हाड यांनी आवर्जून सांगितले. एक चाळीत राहणारा मुलगा पुढे राज्याचा गृहनिर्माण मंत्री बनू शकतो, ही राजकारणाची किमया आहे, असेही आव्हाड 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com