hingoli zp politics | Sarkarnama

हिंगोलीत शिवसेना- राष्ट्रवादीच्या मदतीला कॉंग्रेसचा हात 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 22 मार्च 2017

कॉंग्रेसने दिलेल्या मदतीच्या हाताच्या बदल्यात त्यांना आता दोन सभापतिपद दिले जाणार आहे. त्यामध्ये समाज कल्याण सभापतिपद व शिक्षण सभापतिपद कॉंग्रेसकडे दिले जाणार असल्याचे विश्‍वसनीय गोटातून सांगण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात शिवसेना-राष्ट्रवादी अन्‌ कॉंग्रेस एकत्र बसणार असल्याने भाजपला आता विरोधकांची भूमिका घ्यावी लागणार आहे. 

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवण्यासाठी शिवसेना - राष्ट्रवादी समीकरणामध्ये कॉंग्रेसनेही मदतीचा "हात' दिला आहे.
दुसरीकडे तीन अपक्षांची मात्र, अडचणीची स्थिती झाली आहे. 

जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे पंधरा, राष्ट्रवादीचे बारा, कॉंग्रेसचे बारा, भाजपचे दहा तर तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे शिवसेना -भाजप युती होऊन दोन अपक्ष मदत करतील, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, पंचायत समिती सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपला बाजूला
करण्यासाठी राष्ट्रवादी व कॉंग्रेसशी हातमिळवणी केली. 

जिल्हा परिषदेमध्येही हेच सूत्र कायम राहणार असल्याचे बोलले जात होते. त्यानुसार, शिवसेना-राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या नेत्यांच्या कधी बैठकांमधून तर कधी दूरध्वनीवरून बोलणे सुरू झाले होते. अखेर शिवसेना - राष्ट्रवादी युती होऊन त्यांना कॉंग्रेसने पाठिंबा देण्याचे निश्‍चित झाले. या समीकरणानंतर मंगळवारी सकाळपासूनच सर्व पक्षांची गडबड सुरू झाली होती. त्यातच पालकमंत्री दिलीप कांबळे देखील हिंगोलीत दाखल झाल्यामुळे काही चमत्कार होणार का? याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र, सभागृहात झालेल्या मतदानामध्ये अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या शिवरानी नरवाडे तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे अनिल पतंगे विजयी
झाले. या दोघांना कॉंग्रेसने मदत दिल्याचे स्पष्ट झाले. तर तीन अपक्षांनी तटस्थतेची भूमिका घेतली होती. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख