Hingoli Politics Maharashtra Political News | Sarkarnama

दांडेगावकरांच्या पूर्णेच्या पट्ट्यात ॲड. जाधवांची धडक

संजय बर्दापुरे
गुरुवार, 22 जून 2017

राज्यात भाजपची सत्ता आली तसे ॲड. शिवाजी जाधवांचे नेतृत्व विधानसभा निवडणुकीत दांडेगावकरांच्या स्पर्धेत उतरले होते. त्यावेळी त्यांनी जोरदार टक्कर दिली. सहकार कारखानदारीत सेनेचे आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांना देखील दांडेगावकरांनी पूर्णामध्ये एकवेळचा अपवाद सोडला तर कधी संधी दिली नाही. मात्र राज्यात भाजपचे सरकार असल्याने ॲड. जाधवांच्या नेतृत्वाला नवी उभारी मिळाली.

हिंगोली : वसमत तालुक्यातील  पूर्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने अभ्यासपूर्ण व अनुभवी साखर कारखानदारीचे नेतृत्व असलेल्या माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकरांच्या सहकाराच्या क्षेत्रात भाजप नेते ॲड. शिवाजी जाधव यांनी मारलेली धडक चर्चेचा विषय ठरली आहे.

पूर्णा कारखाना म्हणजे जयप्रकाश दांडेगावकर हे समीकरणच बनले आहे. स्वतःच्या अभ्यासपूर्ण नेतृत्वाच्या बळावर दांडेगावकरांना राज्य साखर संघ व नंतर राष्ट्रीय साखर संघावर पदे देऊन त्यांच्या साखर कारखानदारीच्या अभ्यासाचा सन्मान कायमच झाला आहे. पूर्णा कारखाना म्हणजे मराठवाड्यात वैद्यनाथच्या बरोबरीने आर्थिकदृष्ट्या भक्कम व शेतकऱ्यांना साथ देणारा कारखाना अशी ओळख दांडेगावकरांनी बनवली.

कारखान्याचे कार्यक्षेत्र हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यात आहे. राज्यात भाजपची सत्ता आली तसे ॲड. शिवाजी जाधवांचे नेतृत्व विधानसभा निवडणुकीत दांडेगावकरांच्या स्पर्धेत उतरले होते. त्यावेळी त्यांनी जोरदार टक्कर दिली. सहकार कारखानदारीत सेनेचे आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांना देखील दांडेगावकरांनी पूर्णामध्ये एकवेळचा अपवाद सोडला तर कधी संधी दिली नाही. मात्र राज्यात भाजपचे सरकार असल्याने ॲड. जाधवांच्या नेतृत्वाला नवी उभारी मिळाली. विधानसभेनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत चांगली कामगीरी केली. पंचायत समिती त्यांच्या ताब्यात आली.

पूर्णाच्या निवडणुकीत टोकाईची सुरवात व गाळपाचा काही अनुभव असलेले ॲड. जाधवांनी पॅनेलची चांगली बांधणी केली. तसेच चौदा हजार सभासदांच्या नोंदणीचा मुद्दा उचलून दांडेगावकरांवर जोरदार टीका केली. संपूर्ण प्रचारात हाच एक मुद्दा गाजला. मात्र निवडणुकीत दांडेगावकर हे एकतर्फी विजय मिळवतील हा जाणकारांचा अंदाज बऱ्यापैकी खोटा ठरवण्याचे काम ॲड. जाधवांनी केले. दांडेगावकरांनी दिलेल्या उमेदवाराबद्दल काही नाराजी व वर्षानुवर्षे एकाच पद्धतीने संचालकांची निवड या गोष्टी दांडेगावकरासाठी थोड्याफार त्रासदायक ठरल्या. या शिवाय नेते मंडळी निवडून आली तरी त्यांच्या कार्यक्षेत्रातून पॅनेलला मते कमी मिळाली असेही दिसून आले.

विशेषतः चुडावा गटात हा फटका मोठा होता. वसमत गटातील दांडेगावकरांना मिळालेली अपुरी आघाडी आश्‍चर्यजनक मानली पाहिजे. यानिमित्ताने अॅड. शिवाजी जाधवांनी पाच जागा मिळवत पूर्णामध्ये संचालक म्हणून स्थान मिळविले. या निवडणुकीत दांडेगावकर व जाधव पॅनेलमध्ये केवळ दीडशे ते तीनशे मतांचा फरक असल्याने पुढील काळातील राजकारणाची दिशा दाखवणारी ही निवडणूक आहे.

जयप्रकाश दांडेगावकरांना त्यांच्या टीमची पुनर्बांधणी, नवीन नेतृत्व याबाबत फेर विचार करावा लागणार आहे. सेनेचे आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या पॅनेलला फारसे स्थानही मिळाले नाही. वसमत शहरात भाजपचा एक गट फुटल्यानंतर देखील दांडेगावकर पॅनेलला चांगलेच झगडावे लागले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख