हिंगोली जिल्हा : वंचितच्या उमेदवारांवर प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीला मतांची मोठी आघाडी मिळाली. मात्र, ही आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत टिकविण्याचे आव्हानदेखील युतीसमोर राहणार आहे. विधानसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांवरच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
हिंगोली जिल्हा : वंचितच्या उमेदवारांवर प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, वसमत आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 मधील निवडणुकीत हिंगोलीमध्ये भाजप, कळमनुरीत कॉंग्रेस; तर वसमतमध्ये शिवसेना विजयी झाली आहे. त्या वेळी आघाडी आणि युती नसताना स्वबळावर हे उमेदवार विजयी झाले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय उलथापालथ झाली. मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत लोकसभेच्या हिंगोली जागेवर कॉंग्रेसने विजय मिळविला होता. मात्र, या वेळी कॉंग्रेसला वरचष्मा राखता आला नाही. शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील तब्बल पावणेतीन लाख मतांनी विजयी झालेत. माजी खासदार आणि शिवसेनेतून भाजपमध्ये आणि निवडणुकीवेळी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करुन हिंगोलीतून लोकसभेसाठी कॉंग्रेसचे तिकीट मिळवले होते; पण सुभाष वानखेडेंना पराभव पत्करावा लागला. 

मागील विधानसभा निवडणुकीत हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे तान्हाजी मुटकुळे यांनी कॉंग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा पराभव केला. या विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये सतत लढत राहिली आहे. या वेळी आमदार मुटकुळे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. कॉंग्रेसकडून गोरेगावकर यांच्यासह सुरेश सराफ, विनायकराव देशमुख इच्छुक आहेत. या शिवाय शिवसेनेकडून राजेश पाटील गोरेगावकर, रामेश्वर शिंदे इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून आमदार रामराव वडकुते तर वंचित बहुजन आघाडीकडून वसीम देशमुख इच्छुक आहेत. 

कळमनुरी मतदारसंघात कॉंग्रेसचे आमदार डॉ. संतोष टारफे यांची उमेदवारी निश्‍चित आहे. भाजपकडून माजी आमदार गजानन घुगे, राष्ट्रवादीकडून दिलीप चव्हाण, शिवसेनेकडून संतोष बांगर, रासपकडून विनायक भिसे, तर वंचितकडून अजित मगर आणि ऍड. रवी शिंदे इच्छुक आहेत. 

वसमत मतदारसंघात शिवसेनेकडून आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा आणि राजू चापके, तर राष्ट्रवादीकडून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर व राजू नवघरे इच्छुक आहेत. भाजपकडून अॅड. शिवाजी जाधव, तर कॉंग्रेसकडून डॉ. एम. आर. क्‍यातमवार, वंचित बहुजन आघाडीकडून फैसल पटेल हे इच्छुक आहेत. 

जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात पक्षीय इच्छुकांचा वैयक्‍तिक संपर्क आहे. लोकसभा निवडणुकीत युतीला तिन्ही मतदारसंघातून मोठी आघाडी मिळाली असली तरी, विधानसभा निवडणुकीत युतीसमोर मतांची आघाडी टिकवण्याचे आव्हान आहे. प्रचारासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते येणार असले तरी, त्याचा फारसा फरक विधानसभेच्या निवडणुकीत पडत नाही. ती वैयक्‍तिक संपर्कावर होणार असल्याचे चित्र आहे. या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचे प्रस्थापित पक्षीय उमेदवारांसमोर आव्हान असणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com