Highest Number of Candidates in Nanded South Constituency | Sarkarnama

नांदेड दक्षिण मतदारसंघाची राज्यभर चर्चा; राज्यात सर्वात जास्त ३८ उमेदवार निवडणुक रिंगणात

अभय कुळकजाईकर
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नाव राज्यात झळकले आहे. कारणही तसेच आहे या ठिकाणी आमदार होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांची संख्या ही राज्यात सर्वात अधिक आहे. तब्बल ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावत आहेत. त्यामुळे या ठिकाणी बहुरंगी लढत रंगणार आहे.

नांदेड : नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नाव राज्यात झळकले आहे. कारणही तसेच आहे या ठिकाणी आमदार होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांची संख्या ही राज्यात सर्वात अधिक आहे. तब्बल ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावत आहेत. त्यामुळे या ठिकाणी बहुरंगी लढत रंगणार आहे.

२००९ मध्ये मतदारसंघाची पुर्नरचना झाल्यानंतर नांदेड मतदारसंघाचे नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर असे दोन विधानसभा मतदारसंघ तयार झाले. २००९ मध्ये पहिली निवडणुक झाली त्यावेळी आठ उमेदवार रिंगणात होते. कॉंग्रेसचे ओमप्रकाश पोकर्णा यांनी शिवसेनेचे हेमंत पाटील यांचा पराभव केला होता. त्यावेळी अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री होते त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मतदारांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला भरभरून मतदान दिल्याने जिल्ह्यातील नऊही जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी झाले होते.  

त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मात्र नांदेड दक्षिण मतदारसंघातून तब्बल ३९ उमेदवार रिंगणात होते. त्यावेळी युती आणि आघाडी नव्हती सर्व जण स्वबळावर लढले होते. नांदेड दक्षिणमध्ये ओमप्रकाश पोकर्णा (कॉंग्रेस), हेमंत पाटील (शिवसेना),  दिलीप कंदकुर्ते (भाजप), पांडुरंग काकडे (राष्ट्रवादी), अन्वर जावेद (बसपा), प्रकाश मारावार (शिवसेना), सय्यद मोईन (एमआयएम), श्याम निलंगेकर (भारिप बहुजन महासंघ) यांच्यासह तब्बल ३९ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे बहुरंगी लढत झाली आणि त्यात शिवसेनेचे हेमंत पाटील हे ४५ हजार ८३६ मते घेऊन तीन हजार २०६ मतांधिक्यांनी विजयी झाले. भाजपचे कंदकुर्ते यांना ४२ हजार ६२९, एमआयएमचे मोईन यांना ३४ हजार ५९० तर कॉँग्रेसचे पोकर्णा यांना ३१ हजार ७६२ मते पडली होती.

२०१४ मध्ये शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील हे २०१९ मध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून खासदार म्हणून निवडून आले. त्यामुळे त्यांनी नांदेड दक्षिण मतदारसंघावर दावा सांगत महायुतीत शिवसेनेला नांदेड दक्षिणची जागा घेऊन पत्नी राजश्री पाटील यांना शिवसेनेकडून रिंगणात उतरवले आहे. या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेने बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

आता २०१९ मध्ये पुन्हा तब्बल ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामध्ये मोहन हंबर्डे (कॉंग्रेस), राजश्री पाटील (शिवसेना), फारुख अहेमद (वंचित आघाडी), साबेर चाऊस (एमआयएम), विश्वनाथ धोतरे (बसपा), अल्ताफ अहेमद (इंडियन मुस्लिम लिग), बाळासाहेब दगडू जाधव (संभाजी ब्रिगेड पार्टी), माजी आमदार डॉ. डी. आर. देशमुख (अपक्ष), भाजपचे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते (अपक्ष), शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे (अपक्ष) आदींचा समावेश आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी बहुरंगी लढत होणार आहे.

निवडणुक विभागाने दिलेल्या माहितीनुसार सर्वात जास्त उमेदवार पुणे जिल्ह्यातून २४६ उमेदवार तर सर्वात कमी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २३ उमेदवार रिंगणात आहेत. त्याचबरोबर सर्वात जास्त नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ३८ उमेदवार रिंगणात आहेत तर सर्वात कमी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मतदारसंघातून तीन उमेदवार रिंगणात आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख