पुणे पालिकेतील दोन प्रमुख पदे `कसब्या`त : रासने स्थायीचे अध्यक्ष; घाटे सभागृहनेते
..
पुणे : पुणे महापालिकेच्या तब्बल सात हजार कोटी रुपयांच्या तिजोरिच्या अर्थात, स्थायी समितीच्या किल्ल्या नगरसेवक हेमंत रासने यांच्याकडे आल्या आहेत तर, सभागृह नेतेपदाचा मान नगरसेवक धीरज घाटे यांना मिळाला आहे.
विशेष म्हणजे रासने यांच्याकडे स्थायीचे अध्यक्षपद पुढील तेरा महिन्यांसाठी राहणार आहे. दुसरीकडे, स्थायीचे विद्यमान अध्यक्ष सुनील कांबळे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, "पीएमपी'चे संचालक सिध्दार्थ शिरोळे यांनी मंगळवारी आपल्या पदांचे राजीनामे दिले.
बच्चू कडूंचा राजकीय संघर्ष `गोड` होण्याच्या मार्गावर....पण?https://t.co/B4xqu8T50M
— MySarkarnama (@MySarkarnama) December 3, 2019
भाजपकडे बहुमत असल्याने महापालिकेतील सारीच पदे याच पक्षाकडे असून, सत्ता स्थापनेला पावणेतीन वर्षे झाल्यानंतर महापौर, उपमहापौरपदासह काही पदाधिकारी बदलण्याची भूमिका भाजप नेतृत्वाने घेतली आहे. महापौरपद, उपमहापौरांपाठोपाठ स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृहनेताही बदलण्यात आला आहे. त्यानुसार रासने, घाटेंच्या नावांची घोषणा पक्षाचे सरचिटणीस गणेश बीडकर यांनी मंगळवारी केली असून, दुपारी तीन वाजता नगरसेवकांचया बैठकीत दोनही नावे जाहीर होतील.
महापालिकेत रासने हे तिसऱ्यांदा निवडून आले असून, गेल्या दोन वर्षांपासून ते स्थायीचे अध्यक्षपद पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, गटातटाच्या राजकारणाचा फटका बसल्याने रासनेंना हे पद मिळू शकले नव्हते. आता मात्र, ही जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे. तर, घाटे हे पहिल्यांदाच निवडून आले असले तरी, त्यांच्यातील आक्रमता आणि "फ्लोअर मॅनेजमेंट'मुळे सभागृह सांभाळण्याचे आव्हान पेलण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.
रासने आणि घाटे हे दोघे कसबा विधानसभा मतदारसंघातू आमदारकीसाठी इच्छुक होते. त्यांच्याऐवजी माजी महापौर मुक्ता टिळक यांना संधी मिळाल्याने रासने, घाटे नाराज होते. या पार्श्वभूमीवर या दोघांना ही पदे देण्यात आल्याचे सांगण्यात आले. स्थायी समिती आणि सभागृहनेता ही महत्त्वाची पदे एकाच कसबा मतदारसंघात दिल्याने भाजपच्या वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

